Type to search

अग्रलेख संपादकीय

रुग्णस्वास्थ्याला प्राधान्य!

Share
मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात पक्षाघाताच्या रुग्णांसाठी अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज ‘पक्षाघात उपचार केंद्र’ सुरू झाले आहे. पक्षाघाताचा झटका आल्यानंतर पहिल्या चार तासांत उपचार सुरू झाले तर ते गंभीर दुखणे बर्‍याच प्रमाणात आटोक्यात येऊ शकते.

अन्यथा शरीरातील पक्षाघात पूर्णपणे बरा होण्याची शक्यता कमी होते. तथापि केईएममधील नवीन उपचार केंद्रामुळे झटका आल्यानंतर पहिल्या चोवीस तासांत उपचार झाले तरी रुग्णाला जीवनदान मिळणे शक्य होईल. रुग्ण दाखल झाल्यानंतरच्या पहिल्या तासात त्याच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया केली जाईल. यासाठी अत्याधुनिक यंत्रणा या केंद्रात कार्यान्वित झाली आहे. अशी यंत्रणा कार्यान्वित करणारे देशातील हे पहिलेच केंद्र आहे.

इतर रुग्णालयांत अशी सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होईल. ही यंत्रणा वापरण्याचे आवश्यक प्रशिक्षण वैद्यकीय अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. शासकीय आरोग्यसेवा नेहमीच वादाच्या भोवर्‍यात सापडते. जनतेच्या मनात या सेवेविषयी नकारात्मक भावना आहेत. तथापि मुंबईतील सरकारी रुग्णालयांची प्रतिमा पुष्कळ उजळ आहे.

अनेक नामांकित खासगी रुग्णालयांच्या स्पर्धेतसुद्धा मुंबईतील सरकारी रुग्णालये लौकिक टिकवून आहेत. केईएम रुग्णालयातील पक्षाघात उपचार केंद्र हाही त्यादृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. मेंदूला ऑक्सिजन व पोषणमूल्यांचा पुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांत गाठ तयार झाली तर किंवा एखादी वाहिनी फुटल्याने पक्षाघात होतो.

पक्षाघात बरा न झाल्यास परावलंबित्व येते. झटका तीव्र असल्यास अशा व्यक्ती कायमच्या अंथरुणाला खिळतात. आयुष्यावर विपरित परिणाम करणार्‍या या आजाराविषयी सामान्यांना दुर्दैवाने फारशी माहिती नाही. केईएम रुग्णालयात गेल्या दोन वर्षांत या आजाराचे साडेतीन हजार रुग्ण दाखल झाले. मात्र त्यापैकी चार तासांतच दाखल झालेल्या पन्नास रुग्णांवरचे उपचार पूर्णत: यशस्वी झाले, अशी माहिती रुग्णालयाच्या मज्जातंतू शल्यचिकित्सा विभागप्रमुखांनी दिली आहे. या आजाराविषयी जनजागृती व्हायला हवी.

रुग्णालयाच्या केंद्राविषयी अधिक तपशील जनतेपर्यंत पोहोचले तर या गंभीर दुखण्यातून रुग्ण पार पडण्याची शक्यता वाढेल. अशा यंत्रसामुग्रीच्या उद्घाटनाप्रसंगी नेतेमंडळींना प्राधान्य देण्याऐवजी त्या विषयातील तज्ञांना बोलावल्यास ते पक्षाघात पीडितांना त्या आजाराची व त्याबाबत घ्यायच्या काळजीविषयक उपयुक्त माहिती सांगू शकतील.

जनतेची जागरुकता वाढली तर या नवनव्या साधनांचा जास्त फायदा रुग्णांना मिळू शकेल. रुग्णसेवेला प्राधान्य देण्याचा हेतू त्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!