रिक्षांवर कारवाईचा बडगा ; सिग्नलवर नियम मोडणार्‍यांना दंड

0

नाशिक : शहर पोलीस प्रशासनाने बेशिस्त रिक्षांवर कारवाईचा धडका धरला असून दोन दिवसात सुमारे 500 कारवाई करत सव्वा लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे. यासह सिग्नलवरील झेब्रा क्रॉसिंग ओलांडणार्‍या, तसेच लेन कटिंग आणि सिग्नल तोडणार्‍या बेशिस्त वाहनचालकांना शहर पोलीस व वाहतूक शाखेने चांगलाच धडा शिकवला. सीबीएस, त्र्यंबक नाका सिग्नलवर सकाळच्या सत्रात राबविलेल्या या मोहिमेत तब्बल शंभर बेशिस्त चालकांवर कारवाई करीत पोलिसांनी वीस हजार रुपयांचा वसूल केला.

विशेष मोहिमेअंतर्गत शहर वाहतूक शाखेच्या वतीने रिक्षाचालकांविरोधात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ज्या रिक्षांचालकांकडे रितसर परवाना, फिटनेस दाखला, सर्व कागदपत्र असणार्‍या 1120 रिक्षांना स्टिकर वाटप केले आहे. तर स्टिकर नसणार्‍या व नियम मोडणार्‍या 407 रिक्षा जमा करण्यात आल्या आहेत. 490 रिक्षांचालकांवर दंडात्मक कारवाई करून 1 लाख 15 700 रुपयांचा दंड वसूल करण्याात आला आहे. तर 24 रिक्षांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील अपघात टाळण्याबरोबरच वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शहरात सर्वत्र सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, रिक्षा चालकांची बेफिकीरी सर्रास नियम तोडण्याच्या सवयी, सिग्नलवरच वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पुढे आल्याने पोलिसांनी मिशन सिग्नल हाती घेतले आहे. सिग्नलवरील झेब्रा क्रॉसिंग ओलांडू नये म्हणून आखणी केलेली असते; परंतु वाहनधारक झेब्रावर अथवा त्यापुढे जाऊन थांबतात. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी शहर वाहतूक शाखेस बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त जयंत बजबळे, पोलीस मिलिंद बागुल, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, पोलीस उपनिरीक्षक गणपत जाधव यांच्यासह प्रकाश बोडके, राजू जाधव, राकेश पाटील, जनार्दन ढाकरे आदी पंधरा अधिकारी- कर्मचार्‍यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी ते दीड या कालावधीत त्र्यंबक नाका व सीबीएस सिग्नलवर तळ ठोकत ही कारवाई केली. यावेळी लेन कटिंग, झेब्रा क्रॉसिंग ओलांडणार्‍या आणि सिग्नल वाहनचालकांवर प्रत्येकी 500 रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. त्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकासदेखील झेब्रा क्रॉसिंगचा नियम मोडल्याबद्दल दंड आकारण्यात आला.

यावेळी 100 हून अधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई झाली. या कारवाईमुळे वाहनचालकांमध्ये धास्ती निर्माण झाली व त्यांनी काही वेळ का होईना नियमांचे पालन करण्यातच धन्यता मानली. सुमारे तीन तास ही सुरू होती. यावेळी अनेक वाहनचालकांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना नियमांचे धडे शिकवत त्यांची चूक लक्षात आणून दिल्याने नाईलाजास्तव का होईना मात्र दंड भरावा लागला.

LEAVE A REPLY

*