Type to search

क्रीडा

राहुल-रहाणेच्या भागीदारीने डाव सावरला

Share

अँटिग्वा| भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या सामन्यात अगोदर पहाटे पडलेल्या पावसामुळे मैदान निसरडे झालेले होते. मैदानात बर्‍याच ठिकाणी पाणी साचले असल्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला. नाणेफेक जिंकून जेसन होल्डरचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरला. मयांक अग्रवाल, चेतेश्‍वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांना झटपट बाद करण्यात विंडीजचे गोलंदाज यशस्वी ठरले. सलामीवीर लोकेश राहुल आणि मधल्या फळीत अजिंक्य रहाणेने केलेल्या भागीदारीच्या जोरावर, विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा डाव सावरला आहे. मात्र यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे यांनी विंडीजच्या मार्‍याचा समर्थपणे सामना करत भारताचा डाव सावरला. पहिल्या दिवशी उपहाराच्या सत्रापर्यंत भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात ६८ धावांपर्यंत मजल मारली आहे.

सलामीवीर मयांक अग्रवाल पहिल्याच सामन्यात पुरता अपयशी ठरला. केमार रोचच्या गोलंदाजीवर चेंडू मयांकच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक शाई होपच्या ग्लोव्हजमध्ये जाऊन विसावला. पंचांनी विंडीजचे अपिल फेटाळून लावल्यानंतर, कर्णधार जेसन होल्डरने डिआरएस घेण्याचा निर्णय घेतला. तिसर्‍या पंचांच्या पाहणीत मयांक स्पष्टपणे बाद असल्याचे दिसत होता. यानंतर त्याच षटकात केमार रोचने चेतेश्‍वर पुजालाही माघारी धाडले. यानंतर विराट कोहलीने लोकेश राहुलच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र गॅब्रिअलचा उसळता चेंडू खेळताना विराटही माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेने पहिले सत्र खेळून काढत संघाची पडझड थांबवली.

आश्‍चर्यकारक बदल
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने काही आश्‍चर्यकारक बदल केले आहेत. फॉर्ममध्ये असलेल्या रोहितला टीममध्ये स्थान मिळालेले नाही. तर अश्‍विनलाही संधी देण्यात आलेली नाही. सहा फलंदाज, एक यष्टीरक्षक आणि चार गोलंदाजांना भारतीय संघाने मैदानात उतरवले आहे. रोहित शर्माऐवजी हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे. हनुमा विहारी हा फलंदाजीसोबत उपयुक्त ऑफ स्पिन गोलंदाजीही करतो. त्यामुळे अश्‍विन आणि रोहितऐवजी विहारीला संधी दिल्याचे समजते.

भारताची कारकीर्द
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ७१ वर्षांत ९६ कसोटी सामने झाले. यात वेस्ट इंडिजने ३० आणि भारताने २० सामने जिंकले. उरलेले ४६ सामने रद्द झाले. पण मागच्या १७ वर्षांमध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध एकही कसोटी सामना गमावला नाही. मागच्या १७ वर्षांत भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये २३ सामन्यांपैकी १२ भारताने जिंकले तर ११ सामने रद्द झाले.

विराटने दादाचा सल्ला नाकारला
कसोटी सामन्याआधी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीला रोहित शर्माला सलामीला खेळवण्याचा सल्ला दिला होता. पण विराटने मात्र दादाचा हा सल्ला ऐकला नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रोहित शर्माला संधीच दिली नाही. रोहितला फॉर्म कायम ठेवण्यासाठी कसोटीतही त्याला सलामीला संधी द्यावी आणि रहाणेने मधली फळी भक्कम ठेवण्याचे काम कायम ठेवावे, असे मत सौरव गांगुलीने मांडले होते.

भारतीय संघ जर्सी नंबर घालून मैदानात
विश्‍व कसोटी चॅम्पियनशिप असल्यामुळे कसोटी खेळणार्‍या सगळ्या संघाच्या जर्सीमध्ये बदल करण्यात आले आहे. प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवर नंबर दिसत आहेत. याआधी फक्त एकदिवसीय आणि टी-२०मध्येच खेळाडूच्या जर्सीवर नंबर असायचे. कर्णधार विराट कोहलीने आपल्या नावासह १८ नंबरची तर रोहित शर्माने ४५ नंबरची तर अजिंक्य रहाणेने ३ नंबरची जर्सी घातली आहे. या नव्या जर्सीवर भारतीय खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. जर नव्या जर्सीमुळे प्रेक्षक कसोटी क्रिकेटकडे आकर्षित होणार असतील, तर आम्हाला ही जर्सी घालायला काहीच अडचण नाही, असे अश्‍विन म्हणाला. तसेच नवीन जर्सी चांगली दिसत आहे, अशी प्रतिक्रिया बुमराहने दिली. चेतेश्‍वर पुजारा बराच कालावधी काऊंटी क्रिकेट खेळत असल्यामुळे त्याला अशा जर्सीची सवय आहे. प्रेक्षकांना खेळाडू ओळखण्यात यामुळे मदत होते. खेळाडूंसाठीही हे चांगले आहे, कारण प्रत्येक खेळाडूकडे आता जर्सी नंबर असेल, असे वक्तव्य चेतेश्‍वर पुजाराने केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!