राहुरीच्या 96 पैकी 70 गावांतील रस्ते ‘कोमा’त

0
सार्वजनिक बांधकाम खाते साखरझोपेत; लोकप्रतिनिधींची मनमानी; मुख्य गावातील रस्त्यावर धोक्याची घंटा
राहुरी (प्रतिनिधी) –
निवडणूक आल्यानंतर तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्‍न ऐरणीवर येतो. रस्त्यासाठी आश्‍वासनांची खैरात दिली जाते. मात्र, नंतर ‘येरे माझ्या मागल्या’ होऊन सर्वाधिक कळीचा मुद्दा बनलेल्या राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची दुरवस्था वाढत चालली आहे.
दरम्यान, राहुरी तालुक्यातील 96 गावांपैकी 60 ते 70 गावांना शहरांकडे जोडणारे रस्ते ‘कोमा’त गेले आहेत. त्यामुळे झोपी गेलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींना जाग येणार कधी? असा संभ्रम नागरिकांना पडला आहे. बांधकाम विभागाच्या सावळ्यागोंधळाचा फटका प्रवाशांना बसत असून नव्याने तयार झालेले रस्ते महिनाभरातच गायब होत असल्याने कामकाजासंदर्भातही शंका व्यक्त केली जात आहे.
गेल्या 15 वर्षांच्या कालावधीत राहुरी तालुक्याला आलेली मरगळ विकास कामांबाबत कायम असून लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झालेली आहे. परिणामी ठिकठिकाणी अपघातांच्या घटना वाढत चालल्या आहेत. तर दुसरीकडे रस्त्याच्या तंदुरुस्तीची जबाबदारी असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग राहुरीत कार्यरत आहे की नाही? अशी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.
रस्त्यांच्या समस्या घेऊन नागरिक या कार्यालयात गेले तर सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी व कर्मचारी सदैव बाहेर दौर्‍यावर गेले असल्याचे उत्तर मिळते.
आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे रस्त्याच्या बाबतीत गर्‍हाणे मांडूनही त्याचा काहीही उपयोग होत नाही. मतदानाची आकडेवारी गावोगावच्या ग्रामस्थांपुढे फेकून मिळालेल्या कमी मतदानाविषयी ते फेरसवाल करतात. त्यामुळे परिणामी निवडून दिलेल्यांकडून अपमान तर शासकीय अधिकार्‍यांकडून टोलवाटोलवीने त्रस्त झालेले शेतकरी व ग्रामस्थ ‘भीक नको पण कुत्रे आवर’ असे म्हणून मौनात जात आहेत.
गेल्या 5 वर्षांपासून राहुरी ते बारागाव नांदूर रस्ता, कोंढवड रस्ता, कोंढवड ते शिलेगाव रस्ता, केंदळ, ब्राह्मणी, उंबरे-वांबोरी रस्ता, खडांबे ते राहुरी रस्ता, राहुरी ते म्हैसगाव रस्ता, देवळाली ते आंबी रस्ता, लाख, त्रिंबकपूर, जातप रस्ता, देसवंडी, सडे, धामोरी, खडांबे, मुळानगर, वरवंडी, डिग्रस, कानडगाव, निंभेरे, तांभेरे, वडनेर, कनगर, आदी गावांसह अनेक गावांतील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी होऊन त्याचा अहवाल प्रसिद्ध करणे गरजेचे बनले आहे. गेल्या 10 वर्षांत विविध भागांतील रस्त्यांच्या कामाबद्दल फार्स करून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी धन्यता मानली आहे. प्रत्यक्षात विविध गावांतील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे हेळसांड होत आहे.
राहुरी तालुक्यातील रस्त्यांचा बोजवारा उडालेला अससताना साखरझोपेत असलेेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांविरोधात चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.

 तालुक्यातील रस्ते दुरुस्तीसाठी संबंधित खाते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचे घोंगडे भिजत पडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने तीव्र उभारणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सतीश सौदागर यांनी दिली आहे. शासनाकडून मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून निधी उपलब्ध होत असताना राहुरी तालुका विकास कामांपासून वंचित राहत असल्याने शासना विरोधातही राहुरी भागातील सर्वसामान्य जनतेत तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

*