राहुरीच्या पश्‍चिम तर संगमनेरच्या पूर्व भागात गारपीट

0

कोकणगावात वीज पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 

 

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यात पूर्वहंगामी अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांचा गडगडाट व विजेचा कडकडाटासह सायंकाळी 4.30 वाजता अवकाळी पावसाचे आगमन झाले. त्यामुळे उन्हाळ्यात होरपळलेल्यांना दिलासा मिळाला असला तरी कांदा व कैर्‍यांचे नुकसान झाले. वादळी वार्‍यासह पाऊस पडल्याने कांदा उत्पादकांची चांगलीच धांदल उडाली. कानडगाव, तुळापूर, निंभेरे, तांभेरे परिसरात सुमारे 20 मिनिटे गारांचा पाऊस झाला. तर सुमारे तासभर पाऊस पडल्याने जमिनीतून पाणी वाहू लागले होते. पहिल्याच पावसाने रस्ते मात्र, ओलेचिंब होऊन न्हाऊन निघाले होते.

 
काल रविवारी दुुपारपासूनच वातावरणात बदल झाला. कडक उन्हाळ्याच्या झळा बंद होऊन ढगाळ हवामानामुळे वातावरणात दमटपणा आला होता. दुपारी 4 वाजल्यापासून वादळ वार्‍याला सुरुवात झाली. पाठोपाठ विजेचाही लखलखाट सुरू होता. त्यानंतर अवकाळी पावसाने काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. सध्या तालुक्यात बहुतांशी ठिकाणी कांदा काढणीचे काम सुरू आहे. तर काही ठिकाणी काढलेला कांदा रानातच पडलेला असून काही शेतकर्‍यांनी काढणी केलेला कांदा चाळीत भरून ठेवण्यास सुरुवात केली आहे.

 
तालुक्याच्या पूर्व भागात कोंढवड,  आरडगाव, केंदळ, तांदूळवाडी, राहुरी स्टेशन, मानोरी, मांजरी, मुसळवाडी या भागांत हलक्याशा सरी पडल्या. तर माहेगाव, महाडूक सेंटर, मालुंजे खुर्द, टाकळीमिया येथेही तुरळक पाऊस पडला. देवळाली प्रवरा येथे वादळी वार्‍यासह सुमारे 15 मिनिटे चांगला पाऊस झाला.

 
तालुक्याच्या पश्‍चिमेकडील मुळा धरणाच्या पट्ट्यातील बारागाव नांदूर परिसरात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रानात काढणी केलेला कांदा भिजून नुकसान झाले. तर कैर्‍या गळून पडल्याने आंबा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. वांबोरी, उंबरे, ब्राह्मणी, कुक्कडवेढे, सडे, खडांबे, गोटुंबा आखाडा भागात तुरळक पाऊस झाला. या पावसाने कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. देवळाली प्रवरा परिसरात काल सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या दरम्यानवादळी वार्‍यासह व मेघगर्जनेसह पावसाचा शिडकावा झाला.

 

सध्या परिसरात कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकर्‍यांचा कांदा शेतात काढून पडला आहे. अवकाळी पावसाने हा कांदा भिजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आठ-दहा दिवसांपासून दिवसाचे सरासरी तापमान 40 ते 44 अंशावर जाऊन पोहोचल्याने अंगाची लाहीलाही होत होती. काल अचानकपणे कोसळलेल्या पावसाच्या सरीने काही प्रमाणात उष्णतेपासून सुटका होऊन हवेत गारवा निर्माण झाला. मात्र, या पावसाने अनेक शेतकर्‍यांचा कांदा भिजला आहे.

 
सध्या आंब्याला पण चांगल्या प्रकारे कैर्‍या लागल्या होत्या. वादळाने आंब्याच्या झाडाखाली कैर्‍यांचा सडा पडला होता. हीच अवस्था जांभळाची झाली. कांद्यासह आंबा, जांभूळ या फळांचे नुकसान झाल्याने ‘कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती परिसरात निर्माण झाली आहे. सायंकाळीच अवकाळी पाऊस आल्याने सर्वांची तारांबळ उडाली. लग्नतिथी असल्याने लग्नावाल्यांची पावसाने दाणादाण उडवून दिली. नेहमीप्रमाणेच वीज गायब झाल्याने यात आणखीनच भर पडली.

 
राहुरी शहरात वादळी वार्‍यासह दुपारी 4 वाजता पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी हलक्याशा सरी पडल्या. मात्र, साडेपाचच्या सुमारास 15 मिनिटे पावसाचा जोर वाढून दमदार पाऊस पडला. राहुरी तालुक्याच्या पश्‍चिमेकडील कानडगाव, निंभेरे, तांभेरे, तुळापूर येथे सुमारे एक तासभर मुसळधार पाऊस पडल्याने जमिनीवरून पाणी वाहू लागले होते. तर अनेक गावात गारांचा सुमारे 20 मिनिटे पाऊस झाला. वादळही झाल्याने कांद्याचे व कैर्‍याचे नुकसान झाले. रामपूर भागातही वादळी वार्‍याचा चांगलाच तडाखा बसला. म्हैसगाव, कोळेवाडी, ताहाराबादला तुरळक पाऊस पडला. वादळी वार्‍यामुळे झाडाच्या फांद्या पडल्या. तर कांद्याचेही नुकसान झाले. रात्री उशिरापयर्ंत काही ठिकाणी विजेचा कडकडाट सुरूच होता. तर तुरळक पाऊसही पडत होता.

 

कांदा उत्पादकांची धावपळ
अनेकांनी यंदा उशिरा कांद्याची लागवड केल्याने आता हा कांदा निघू लागलेला आहे. अनेक ठिकाणी कांदा शेतात पडून असल्याने पाऊस सुरू झाल्यानंतर तो ताडपत्रीने झाकण्यासाठी शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. तर काहींनी हा कांदा चाळीमध्ये आणून टाकला.

 

संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील पूर्व भागात काल रविवारी अवकाळी पावसाने जोरदार थैमान घातले. सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह पावसाने सुरुवात केली. गारांसह बरसलेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, कोकणगावात वीज पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आश्‍वी खुर्द, आश्‍वी बुद्रुक, दाढ खुर्द, खळी, झरेकाठी, शिबलापूर, पिंप्री लौकी, निमगावजाळी, कोकणगाव या परिसरात काल सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. सुरुवातीला वादळी वारे सुरू झाले. त्यानंतर वीजपुरवठा खंडित झाला. काही क्षणांत पावसाने सुरुवात केली. अचानक आलेल्या पावसाने सर्वत्र पाणीचपाणी केले. सुमारे दीड तास चाललेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या कांदा, डाळिंब आदी पिकांचे मोठे नुकसान केले.
वडगावपानसह परिसरात गारांच्या पावसाचा तडाखा
तळेगाव दिघे प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील वडगावपान, माळेगाव हवेली परिसरात रविवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास गारांसह वादळी पावसाने अर्धा तास हजेरी लावली. निळवंडे, करुले परिसरात वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाला. वादळी पावसाने डाळिंब बागांना फूलगळतीचा तडाखा बसला.
या पावसाने शेतकर्‍यांची चांगलीच धांदल उडाली. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांचा शेतातील चारा व कांदा भिजला. अर्धा तास झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र पाणीच पाणी साचले. डांबरी रस्ते ओलेचिंब झाले. पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. लहान मुलांनी गारा गोळा करण्याचा आंनद लुटला.

 

डाळिंबाची मोठी फूलगळती
या पावसाने डाळिंब बागांची मोठ्या प्रमाणात फूलगळती झाली आहे. त्यामुळे डाळिंब बागाधारक शेतकर्‍यांनी मात्र अवकाळी पावसाचा चांगलाच धसका घेतला आहे. रविवारी सायंकाळी परिसरात सर्वत्र ढगाळ व पावसाळी वातावरण कायम होते.

 

श्रीगोंद्यात वादळाचा दणका, काही ठिकाणी गारा
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्याच्या काही भागांत विजेच्या प्रचंड कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी पावसाचा जोर कमी आणि वादळ जास्त असल्याने शेतकर्‍यांचे हाल झाले. तालुक्यातील हिंगणी, गव्हाणेवाडी, विसापूर, कोळगाव, कोरेगव्हाण, श्रीगोंदा, पारगाव, काष्टी, आढळगाव, हिरडगाव, मांडवगण पारिसरात वादळासह काही प्रमाणात पाऊस पडला. यामुळे सध्या अनेक शेतकर्‍यांनी काढून टाकलेले कांदा झाकण्यासाठी धावपळ झाली. तर पारगाव, लोणी पारिसरात अजून काही द्राक्ष बागांची तोडणी झाली नसल्याने या वादळाचा फटका द्राक्ष बागांना बसला. काही प्रमाणात डाळिंब बागांचे आणि आंबा झाडांचे नुकसान झाले. देवदैठण, येवती, पाडळी पारिसरात गारांचा पाऊस पडल्याने आणि वादळाने फळबागांचे नुकसान नुकसान झाले.

 

शेवगावात तीन म्हशी दगावल्या

शेवगाव तालुक्यात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यात अंतरवली येथील मनोहर बापूराव विघ्ने यांच्या जनावरांच्या गोठ्यावर  नारळाचे एक झाड पडले. त्याचवेळी तेथे असलेल्या दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाला. झाड पत्र्यावर पडल्याने पत्र्याने या म्हशींचे पोट व गळे कापले गेला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अन्य ठिकाणीही वादळ झाले. पण नुकसान झाल्याचे वृत्त नाही. 

 

जवळा परिसरात गारपीट

निघोज (वार्ताहर) – निघोज परिसरात वादळी पावसासह गारा झाल्याने  डाळिंब, द्राक्षे, कांदा, संत्रा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आजच्या वादळी वार्‍याने लहान फळे व नवीन धरलेल्या बागांची फुले गळून पडली. एक तासानंतर वादळी पाऊस शांत झाला. निघोज, वडनेर, जवळा, देवीभोयरे, कोहकडी, म्हसे परिसरात वादळी वारा, गारांच्या  पावसाने शेतकर्‍यांचे नुकसान झाले. ‘

 

राळेगण सिद्धी, पारनेर, टाकळीढोकेश्‍वर, सुपा येथे पाऊस झाला. शेवटच्या टप्प्यात लावलेल्या कांद्याची काढणी चालू असल्यामुळे शेतकर्‍यांची कांदा झाकून ठेवण्यासाठी एकच धावपळ उडाली. त्यातच बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. काल वादळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे, जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई वराळ, पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, पठारे, सांस्कृतिक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास हारदे, माउली वरखडे, शंकर वराळ व कृषी अधिकारी बनकर यांनी पाहणी केली.

 

तीन दिवस संकट
रविवारी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार दुपारी तीन वाजेपर्यंत सूर्य आग ओकत असल्याने अंगाची लाहीलाही होत होती. पण त्यानंतर जिल्ह्यातील नूर बदलला. सर्वत्र ढगाळ हवामान तयार झाले नि काही ठिकाणी पावसाच्या सरी कमी अधिक प्रमाणात कोसळल्या. 8, 9, 11 आणि 12 मे रोजी मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हे संकट लक्षात घेता शेतकर्‍यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*