राहुरीच्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

0

राहुरी (प्रतिनिधी)- राहुरी पोलिसांनी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांपैकी चार दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. उर्वरित तिघे पसार झाले. हे सातही दरोडेखोर राहुरी तालुक्यातीलच असल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली. या सोनेरी टोळीच्या मुसक्या आवळल्याने आता आणखी काही रस्तालुटीच्या घटना उजेडात येणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

 

 

राहुरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून रस्तालुटीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला होता. संबंधित दरोडेखोरांची टोळी बाहेरील असल्याची चर्चा होत होती. मात्र, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी अत्यंत शिताफीने सापळा लावून राहुरी भागात दरोडा घालणार्‍यांची टोळी पकडण्यासाठी विशेष मोहिम राबविली.

 

परिणामी गुरूवारी दि. 15 जूनच्या रात्री दरोडेखोरांची टोळी शनीशिंगणापूर रस्त्यावरील पिंप्री अवघड शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वाघ यांना मिळाली. ते स्वतः तसेच, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण भोसले, पोलीस लाला पटेल, बंडू बहिर, नवनाथ वाघमोडे, यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांचा ताफा घेऊन रात्री 12.15 च्या सुमारास शनी शिंगणापूर रस्त्यावर पिंप्री शिवारात सापळा लावला.

 

 

दरम्यान पोलिसांनी पिंप्री अवघड शिवारातील रस्त्याच्या आडोशाला रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली काही दरोडेखोर असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलीस निरीक्षक वाघ यांनी तत्काळ आपल्या पोलीस ताफ्याला दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्याचा आदेश देताच 7 जणांपैकी तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, त्यापैकी आरीफ गफूर शेख, रा. पिंप्री अवघड, अविनाश श्रीधर साळवे रा. बारागाव नांदूर ता. राहुरी, यांना दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. तर बालम बशिर शेख, रा. पिंप्री अवघड ता. राहुरी, समीर बशिर शेख, रा. पिंप्री अवघड ता. राहुरी, लखन थोरात, रा. बारागाव नांदूर ता. राहुरी, सुरज उर्फ गोट्या नाना पवार रा. डिग्रस, ता. राहुरी यांनी मात्र पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून पळ काढला.

 

 

पकडलेल्या दरोडेखोरांकडे मिरचीची पूड, चाकू, लोखंडी गज, नायलॉन दोरी आदी दरोडा टाकण्यासाठी उपयुक्त असणारे साहित्य आढळून आले. पोलिसांनी साहित्यांसह तिघांना ताब्यात घेत आपला पोलिसी खाक्या दाखविताच तिघांनी आपल्या साथीदारांची नावे सांगीतली. त्यानुसार राहुरी पोलिस ठाण्यात राहुरी भागातील पिंप्री अवघड, डिग्रस, बारागाव नांदूर गावातील 7 जणांवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पकडल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*