राहुरीच्या खासगी रूग्णालयांचे गुप्त ‘ऑपरेशन’!

0

निम्म्याहून अधिक रूग्णालयांची नोंदणीच नाही; कारवाईच्या ‘इंजेक्शन’मुळे मुन्नाभाई ‘सलाईन’वर

 

राहुरी (प्रतिनिधी)- राहुरी शहरातील खासगी रूग्णालयांची गोपनीय तपासणी करण्यात आली. मंत्रालयातील आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, तालुका आरोग्य विभाग अशा तीन अधिकार्‍यांच्या पथकाने अत्यंत गुप्तता पाळून शहरातील खासगी रूग्णालयांची ‘कुंडली’ गोळा करून ‘ऑपरेशन सक्सेस’ केले आहे. सुमारे आठ दिवस चाललेल्या या गोपनीय मोहिमेचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील निम्म्याहून अधिक रूग्णालयांची महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणीच झाली नसल्याचे चव्हाट्यावर आले आहे. नोंदणी नसतानाही रूग्णालय थाटून बसलेल्या डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 
राहुरी शहरात रूग्णसेवेचा तर बट्ट्याबोळ झाला आहे. आरोग्य सुविधा देण्याबाबत शासकीय यंत्रणाच ‘कोमा’त गेली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उभारलेले प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र केवळ शोभेचे बाहुले बनले आहे. तेथे जाणीवपूर्वक रूग्णांची हेळसांड केली जात असल्याने तेथील गर्दीचा लोंढा खासगी रूग्णालयांकडे वळविला जातो. पर्यायाने सरकारी दवाखाने नेहमीच आजारी तर खासगी रूग्णालयांनी चांगलेच बाळसे धरले आहे. शहरात मोठमोठी खासगी रूग्णालय आहेत. जेवढ्या चढ्या दराची आकारणी केली जाते, त्या तुलनेत कोणतीही सोयी सुविधा रूग्णांना दिली जात नाहीत. मनमानी करून वाटेल तेवढी रक्कम रूग्णांकडून उकळली जाते. रात्रीच्या वेळी रूग्ण दाखल केल्यास सकाळपर्यंत 5 ते 10 हजार रुपयांचे बिल नातेवाईकांच्या माथी मारले जाते.

 
शहरातील आरोग्याच्या ‘दुर्दैवाच्या दशावतारा’वर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. काही दिवसांपूर्वी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून पथक तयार करून विविध खासगी रूग्णालयांची तपासणी करण्यात आली. यामध्ये रूग्णालयातील डॉक्टरांचे प्रमाणपत्र, रूग्णालयात रूग्णांवर केला जाणारा उपचार व प्रत्येक खासगी रूग्णालयात अधिकृत ‘एएनएम’ हा नर्सिंग कोर्स केलेली अधिकृत परिचारिका काम करते की नाही? याची पाहणी पथकाकडून करण्यात आली. पथकाच्या तपासणीचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. पथकाकडून कोणत्या रूग्णालयासंदर्भात कोणता अहवाल सादर करण्यात आला? याबाबत मात्र, अत्यंत गुप्तता पाळण्यात आली आहे.शहरी भागासह ग्रामिण भागातही जिल्हा आरोग्य विभागाने वैद्यकीय क्षेत्रात तपासणी सुरू केल्याने वैद्यकीय सेवेत फसवणूक करणार्‍यांचे धाबे दणाणले असून त्यांचे पितळ उघडे पडणार आहे.

 

काही धनदांडग्यांनी डॉक्टरांनी राहुरीत मजल्यावर मजले चढवून ‘फाईव्हस्टार’ हॉटेलशी स्पर्धा करणारे खासगी रूग्णालय थाटले आहेत. या ‘पंचतारांकित’ रूग्णालयाची संबंधित पथकाने केलेल्या पाहणीत मात्र बहुतेक डॉक्टरांनी या रूग्णालयांची महाराष्ट्र नसिर्ंग कौन्सिलकडे नोंदणीच केली नसल्याची धक्कादायक बाब ऐरणीवर आली आहे. अशा खासगी रूग्णालयांची माहिती वरिष्ठांना सादर करण्यात आली आहे. ज्यांंनी रूग्णालय सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी न करता राहुरीत रूग्णसेवेच्या नावाखाली आपले ‘उखळ पांढरे’ केले असेल अशी राहुरीतील रूग्णालये आता शासकीय यंत्रणेच्या रडारवर आली आहेत. अशा खासगी रूग्णालयांवर कोणत्याही क्षणी कारवाई हाती घेतली जाणार असल्याची माहिती शासकीय यंत्रणेकडून मिळाली आहे. यामुळे शासकीय स्तरावर नोंदणी न केलेल्या डॉक्टरांची ‘तब्येत बिघडली’ असून जिल्हा आरोग्य विभागाकडून कारवाई होण्याची शक्यता असल्याने त्यांनी बचाव करण्यासाठी हालचाल सुरू केली असल्याची चर्चा आहे.

 

राहुरी तालुक्यात काही ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांनी ग्रामिण भागात आपले ‘नेटवर्क’ उघडले असून ग्रामिण भागात रूग्णसेवेच्या नावाखाली ‘गल्लाभरू सेवा’ सुरू केली आहे. जिल्हा विभागाच्या पथकाने मागील आठवड्यात म्हैसगाव भागात एका मुन्नाभाई डॉक्टरवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे राहुरी भागातील इतर खेड्यातही काही ‘मुन्नाभाई’ रूग्णांवर उपचार करीत असून त्यांच्यावरही कठोर कारवाईचे ‘इंजेक्शन’ देण्यात येणार आहे. या कारवाईच्या धास्तीनेच काही मुन्नाभाई ‘सलाईन’वर गेले असल्याची चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

*