राष्ट्रीय सत्संग महामेळाव्यासाठी 22 समित्यांची स्थापना

0

सकाळी 10.30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी 3 वाजता
गुरूमाउलींचे हितगूज

 

राहुरी ़(प्रतिनिधी) – श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील श्रीस्वामी समर्थ गुरूकुल विद्यापीठाचे पीठाधीश गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांचा राहुरी येथे मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी कोरडेमळा येथे होणार्‍या राष्ट्रीय सत्संग महामेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सेवेकर्‍यांच्या विविध 22 समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

 

 

मेळाव्यानिमित्त सकाळी 10.30 च्या आरतीनंतर दुर्गा सप्तशती पाठ, स्वामी चरित्र पारायण व बालसंस्कार विभागाचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या मेळाव्यात अण्णासाहेब मोरे आपल्या अमृततूल्य वाणीतून हितगूज करणार आहेत. यामध्ये धर्म, देश, प्रांत, सीमा यांच्या भेदाच्याही पलिकडे उद्बोधन करणारे, मानवी जीवनाचा सर्वांगीण परिपूर्ण विकास करणार्‍या क्लूप्त्या सांगणारे, वास्तवातील ग्रामअभियानातून संस्कृती जपून राष्ट्रीय विकासाची वृद्धी कशी वाढीस लावावी? तसेच शेतीशास्त्र, आयुर्वेद, अध्यात्म, वास्तूशास्त्र, मानवाच्या विविध समस्या आदी विषयांवर दुपारी 3 वाजता मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व्यवस्थापन समिती, प्रचार, प्रसार समिती, स्थानिक देवता सन्मान समिती, स्वागत कक्ष व बॅच वाटप, प.पू. गुरुमाउली विश्रांती व्यवस्था, कार्यक्रम सूत्रसंचालन, व्यासपीठ व्यवस्था, मंडप सजावट व वीजव्यवस्था, आरोग्य व्यवस्था, प्रश्‍नोत्तरे, मराठी अस्मिता निधी संकलन, सांस्कृतिक कार्यक्रम, अन्नदान व आचारी, प्रसाद वाटप, पाणी वाटप, स्वच्छतागृह, पादत्राणे, वाहनतळ, सडा-रांगोळी, मुद्रण व स्वयंरोजगार, आयुर्वेद स्टॉल, छायाचित्रीकरण, आदी 22 समित्यांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक समितीमध्ये 11 सदस्य कार्यरत राहणार आहेत.
मेळाव्यासाठी 2 लाख भाविक बसतील असा 60 हजार चौरस फुटाचा भव्य मंडप व अत्यंत सुशोभित करण्यात आलेले व्यासपीठ बनविण्यात आले आहे.

 

अहमदनगरहून येणार्‍या भाविकांसाठी राहुरी न्यायालयाजवळ तर श्रीरामपूर, शिर्डी, नेवासा, कोपरगाव, शेवगाव, राहाता, संगमनेरहून येणार्‍या भाविकांसाठी हॉटेल भाग्यश्रीसमोर व राहुरी महाविद्यालय रोडवरील डॉ. कोरडे रूग्णालयासमोरील जागेत वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी असंख्य सेवेकरी कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

*