राष्ट्रीय क्रीडा क्षेत्राला संजीवनी!

0
आपल्या देदीप्यमान कामगिरीने क्रीडा क्षेत्रात राज्याचे नाव जगात उंचावणार्‍या खेळाडूंना सरकारी सेवेत थेट नियुक्ती देण्यात आली आहे. त्यात संजीवनी जाधव, मोनिका आथरे या नाशिकच्या धावपटूंचा समावेश आहे. 23 खेळाडू व 9 दिव्यांग खेळाडूंना सरकारी सेवेत स्थान मिळाले आहे. शासनाने कालसुसंगत भूमिका घेतली आहे. ध्येयप्राप्तीसाठी खेळाडूंना अनेक प्रकारचा त्याग करावा लागतो.

कोणत्याही खेळात यशस्वी होणे आणि पदक मिळवणे सोपे नसते. शिस्त, समर्पण आणि दृढनिश्चयाच्या बळावर खेळाडू यश मिळवू शकतात. विद्यार्थी असतील त्यांना शिक्षण सांभाळून सरावासाठी नियमित वेळ द्यावा लागतो. सातत्य टिकवावे लागते. खेळातील तयारीसाठी वेळ देताना घराकडे दुर्लक्ष होते. हवामान कसेही असो; खेळाडूंना जागरुकपणे आणि नियमित तयारी करावीच लागते.

आहार-विहारावर योग्य नियंत्रण ठेवावे लागते. सायना नेहवाल ही भारताची बॅडमिंटनमधील आघाडीची खेळाडू आहे. ‘तीन-चार वर्षांपासून आपण साखर खाल्लेली नाही’ असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. दर्जेदार खेळाडू बनण्यासाठी या सर्व गोष्टी करणार्‍या खेळाडूंना काहीसे चिंतामुक्त राहता आले पाहिजे. ही गरज सरकारने लक्षात घेतली असावी हे या ताज्या निर्णयातून स्पष्ट होते.

सरकारी नोकरीमुळे खेळाडूंचे कुटुंबिय आर्थिकदृष्ट्या परावलंबी राहणार नाहीत. खेळाडू युवक-युवतींना आपली गुणवत्ता टिकवणे यामुळे बरेच सोपे होणार आहे. जगात कुठल्याही मैदानावर खेळताना ‘देशाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आपण खेळत आहोत’ ही भावना सतत वृद्धिंगत होत राहील. राज्यवर्धन राठोड हे ऑलिम्पिक पदकविजेते सध्या केंद्रीय क्रीडामंत्री आहेत. नेमबाजी खेळात त्यांनी देशाला रौप्यपदक मिळवून दिले आहे.

त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर खेळाडूंच्या समस्या व क्रीडा क्षेत्राच्या विकासातील नोकरशाहीचा संवेदनाशून्य दृष्टिकोन त्यांनीही अनुभवलेला असावा. आशियाई क्रीडा स्पर्धांचा नुकताच समारोप झाला. या स्पर्धांमधील पदकविजेते खेळाडू ‘इकॉनॉमी क्लास’ने तर त्यांच्यासोबत गेलेले काही अधिकारी ‘बिझनेस क्लास’ने विमान प्रवास करीत होते. ही दुटप्पी भूमिका राठोड यांना खटकली असावी.

केंद्र सरकारने 2014 पासून ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ योजना सुरू केली आहे. राठोड यांनी नोकरशहांना या योजनेच्या अंमलबजावणीपासून त्यामुळेच दूर ठेवण्याचा निर्णय घेतला असावा. खेळाडूंसाठी व्यावसायिक तज्ञांची नेमणूक केली आहे. राज्य आणि केंद्र सरकारने समन्वय व परस्पर सहकार्याने क्रीडा धोरणाची अंमलबजावणी केल्यास देशाचे नाव जागतिक क्रीडा क्षेत्रात नव्या तेजाने तळपू लागेल.

LEAVE A REPLY

*