राष्ट्रवादीचा सेनेला ‘बाय’

0

सुवर्णा जाधव, सारिका भूतकर सेनेच्या तंबूत! ‘स्थायी-मबाक’ बिनविरोध अटीवर दिली पदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- दोन आमदार असणार्‍या राष्ट्रवादीने महापालिकेच्या स्थायी आणि महिला बालकल्याण समिती सभापती निवडणुकीत सेनेला बाय दिला आहे. पालिकेतील सत्तेत विरोधात असलेल्या राष्ट्रवादी-काँग्रेसकडून एकानेही नामनिर्देशनपत्र दाखल न केल्याने सभापती निवडी बिनविरोध झाल्या असून अनौपचारीक घोषणा होणे फक्त बाकी राहिले आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भक्कम तटबंदीची व्यूहरचना शिवसेना आतापासूनच आखत आहे. दोन विद्यमान नगरसेविकांचा सेना प्रवेश हा त्याचाच एक भाग असून प्रवेशाच्या अटीवरच दोघांनाही महापालिकेत पदे देण्यावर सेनेने तयारी दर्शविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनसेच्या सुवर्णा जाधव यांना स्थायी समिती तर अपक्ष सारिका भूतकर यांना महिला बालकल्याण समितीचे सभापती पद देण्याच्या बदल्यात त्यांना प्रवेशाची अट टाकण्यात आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. भूतकर यांनी आजच महापालिकेत सेनेत प्रवेश केला. जाधव नंतर प्रवेश करतील असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
महापालिकेत सत्ता स्थापन करतेवेळी मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, अपक्ष नगरसेवकांचे पाठबळ लाभले होते. त्याबदल्यात प्रत्येकाला दिलेला शब्द सेनेकडून पाळला जात आहे. शब्द पाळताना त्यांना प्रवेशाची ऑफरही देण्यात आली आहे. बाळासाहेब बोराटे यांना विरोधी पक्षनेता पद देत सेनेने त्यांचे पुर्नवसन केले. आता जाधव, भूतकर यांचीही राजकीय सोय केली जात आहे.
सुवर्णा जाधव या मनसेच्या नगरसेविका असल्या तरी त्यांच्या विजयात सेनेचा मोठा वाटा आहे. त्यांचे सहकारी नगरसेवक अनिल शिंदे यांनी जाधव यांना 2013 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठी मदत केली. भूतकर अपक्ष असल्या तरी त्यांचा वावर युतीच्या गोटात कायमच असतो. दोघीनाही महापालिकेत पद हवे होते. सेनेच्या नगरसेवकांनी त्यास विरोध केला, मात्र स्थानिक नेत्यांनी दोघांशीही यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेत प्रवेशाची अट टाकली. ही अट दोघांनीही मान्य केली. सारिका भूतकर यांनी महिला बालकल्याण समिती सभापतीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर लगेचच सेना प्रवेश केला. जाधव यांच्या प्रवेशाचा मुर्हूत लवकरच निघणार आहे.
दरम्यान स्थायी समिती सभापती पदासाठी मनसेच्या सुवर्णा दत्ता जाधव यांनी तर महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी सारिका भूतकर व उपसभापती पदासाठी सुनीता मुदगल यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यांच्यासोबत सेनेचे नगरसेवक उपस्थित होते.
राष्ट्रवादी, काँग्रेसच्या एकाही सदस्याने नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही. त्यामुळे आघाडीने ही निवडणूक सोडून दिल्याचे स्पष्ट झाले. आता उद्या होणार्‍या विशेष सभेत दोघांच्या सभापती पदाची अनौपचारीक घोषणा होणे बाकी आहे.

सुवर्णा जाधव या पहिल्यापासूनच सेनेसोबत आहेत. यापुढेही त्या सेनेसोबत राहतील. तांत्रिक कारणामुळे त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला आहे. सारिका भूतकर यांना अडचण नसल्याने त्यांचा प्रवेश झाला.
– अनिल राठोड, उपनेते, सेना.

ऐनवेळी राष्ट्रवादीची गुगली…
राष्ट्रवादीने स्थायी किंवा मबाक समितीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही किंवा सेनेकडून दाखल केलेल्या अर्जावरही आक्षेप घेतला नाही. त्याअर्थी राष्ट्रवादीत शांतता नक्कीच नाही. त्यांच्याकडून डावपेच टाकले गेले आहेत. आता ऐनवेळी राष्ट्रवादी कोणती गुगली टाकणार याची उत्सुकता लागून आहे. दरम्यान न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने ती संपल्यावर विशेष सभा घ्यायची की त्यापूर्वीच याबाबत जिल्हाधिकार्‍यांनीही विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागविले आहे.

LEAVE A REPLY

*