रावसाहेब दानवे, शाम जाजूंना डावलून पालकमंत्र्यांचा मतदारसंघात कार्यक्रम

0

ना. शिंदे, खा. गांधी यांच्यातील गटबाजीचे आज प्रदर्शन

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरात भाजप अधिक बळकट करण्यासोबतच, पक्ष संघटना वाढीच्यादृष्टीने खा. दिलीप गांधी यांनी कंबर कसली आहे. मात्र, आज सोमवारी (दि.8) प्रदेशाध्यक्षा रावसाहेब दानवे व राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमाकडे पालकमंत्री शिंदे यांनी उघडपणे पाठ फिरविली आहे. नगरशहरात होणार्‍या भाजप प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम डावलून ते मतदारसंघातील तरडगाव व नान्नज (ता. जामखेड) येथील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष दानवे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्यासमोर भाजपमधील पालकमंत्री शिंदे, खा. गांधी यांच्यातील गटबाजी समोर येणार आहे.

 
शहर भाजपातील खा. गांधी व माजी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अयभ आगरकर यांच्यातील गटबाजी सर्वश्रृत आहेच. शहरजिल्हाध्यक्ष असलेले खा. गांधी यांनी या गटबाजीकडे दुर्लक्ष करत किशोर डागवाले यांना पक्षप्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी थेट राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना निमंत्रित केले आहे. जाजू, दानवे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.8) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भाजप कार्यालयासमोर पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शासकीय विश्रामगृह ते भाजप कार्यालयापर्यंत दानवे यांची उघड्या जीपमधून मिरवणूकही काढली जाणार आहे. थोडक्यात दानवे यांच्यासमोर गांधी (डागवालेंसह) शक्तीप्रदर्शन करणार आहेत. अर्थात पक्षांतर्गत कलहामुळे आगरकर गट या कार्यक्रमाला हजेरी लावणार नाहीत. ते कार्यक्रमापूर्वीच दानवे यांची भेट घेतील असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

 
कोल्हारचा कार्यक्रम संपल्यानंतर दानवे थेट नगर शहरात येणार आहेत. पालकमंत्र्यांचा तरडगाव येथील कार्यक्रम व डागवाले यांचा पक्ष प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम एकाच वेळी आहे. यामुळे पालकमंत्री शिंदे आणि खा. गांधी यांच्यातील गटबाजीचे जाहीर प्रदर्शन होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर दानवे नगरमध्ये काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

 

पालकमंत्री शिंदे व जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनाही कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आल्याचे गांधी यांनी सांगितले असले तरी पालकमंत्री मात्र, गांधी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत. कोल्हार येथे सकाळी होणार्‍या कार्यक्रमात पालकमंत्री शिंदे व प्रदेशाध्यक्ष दानवे हे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. तेथून शिंदे राहुरी विद्यापीठात जाणार असून तेथे जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट गावांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर शिंदे जामखेड मतदार संघात जातील. तरडगाव वीज उपकेंद्राचे उद्घाटन व नान्नज येथील विकास कामांचे उद्घाटनाला पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. 

LEAVE A REPLY

*