रामायण सर्किटमध्ये नाशिकचा समावेश – खा. गोडसे ; केंद्राच्या स्वदेश योजनेतून साकारणार प्रकल्प

0

नाशिक : केंद्र सरकारने प्रभू श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वाचा इतिहास उलगडवून दाखवण्याच्या उद्देशाने रामायण सर्किट विकसित करण्याचा निर्णय केंंद्रीय पर्यटन मंत्रालयाने घेतला आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यटन महामंडळाकडून नाशिकमधूनही सविस्तर प्रकल्प अहवाल मागवण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास खा. हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला.

केंद्रीय पर्यटन विभागामार्फत स्वदेश योजनेंतर्गत रामायण सर्किट विकसित करण्याचे ठरवले आहे. संपूर्ण विश्वात प्रभू श्रीरामचंद्रांचा रामायणाच्या माध्यमातून इतिहास सर्वांना माहीत आहे. भारतातील असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा इतिहास या माध्यमातून उलगडावा याकरता हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे.

यात उत्तर प्रदेशमधील अयोध्या, नंदिग्राम, श्रींग्वेरपूर, चित्रकुट, बिहारमधील सीतामढी, बक्सर, दरभंगा, मध्य प्रदेशातील चित्रकुट, ओडिशामधील महेंद्रगिरी, छत्तीसगडमध्ये जगदलपूर तसेच महाराष्ट्रातील नाशिक आणि नागपूर, तेलंगणामधील भ्रदचालम, कर्नाटकमधील हम्पी तसेच तामिळनाडूमधील रामेश्वरम अशा ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.

यात नाशिकचाही समावेश असल्याने सविस्तर अहवाल केंद्रीय पर्यटन विभागाने मागवला आहे. नॅशनल स्टिरींग कमिटीकडे अहवाल सादर केला जाईल. त्या समितीचे अध्यक्ष स्वतः पर्यटनमंत्री असणार आहेत. मंजुरीनंतर केंद्रीय मंजुरी व देखरेख कमिटीकडे सादर करून त्यास मंजुरी दिली जाईल. या प्रकल्पाला शंभर टक्के निधी केंद्र सरकार देणार आहे.

LEAVE A REPLY

*