Type to search

ब्लॉग

राज्यातील प्राथमिक शिक्षण आणि टी.ई.टी.पात्र गुरुजनांची घालमेल..!

Share

महाराष्ट्र सरकार शिक्षणातून अंग काढून घेत आहे का? असा प्रश्न निर्माण होण्यास वाव निर्माण झाला आहे. त्याला कारणही तसेच आहे. ‘नूपा’ नॅशनल एज्युकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनीस्ट्रेशन ही एक संस्था आहे. ही संस्था ‘डिस्ट्रीक इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन’ (डी.आय.एस.ई.) या संस्थेच्या सहाय्याने प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात सर्व्हेक्षण करून राज्यवार शिक्षण विकास निर्देशांक प्रसिध्द करते. सदरचे निर्देशांक आणि क्रमवारी डीआयएसईच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नुकताच इयत्ता दहावीचा निकाल लागला आणि या निकालात मराठी विषयाचा भयंकर निकाल लागला. राज्यातील एकूण 11 लाख 93 हजार 591 नापास विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 57 हजार 627 एवढे विद्यार्थी केवळ मराठी या विषयात नापास झाले आहेत. असे पहिल्यांदाच घडले. माय मराठी मायबोलीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी नापास का झाले? या प्रश्नावर पुन्हा वांझ चर्चा सुरू झाल्या. या अवनितीला अनेक घटक जबाबदार असले तरी त्यातला सर्वात महत्वाचा जबाबदार घटक म्हणजे, राज्यातील प्राथमिक शिक्षणाची अवस्था होय. पाया म्हणून ज्या प्राथमिक शिक्षणाकडे पालक डोळस म्हणून बघतात, तेवढे माय मराठीकडे बघत नाही. सरकारही याबाबत उदासीनच असते. राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या अवस्थेबाबत आणखी जाणून घेण्याची इच्छा चाळवली आणि सर्वात प्रथम डी.आय.एस.ई.च्या वेबसाईटवर एक नजर फिरविली. त्या ठिकाणी धक्कादायक आकडेवारी समोर आली. जरा बारकाईने अभ्यास केला असता असे दिसून आले की, सन 2005-06 ते 2013-14 या दरम्यान महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रगतीपुस्तक बर्‍यापैकी होते. मात्र 2013-14 नंतर महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षणाची क्रमवारी 2005-06 च्या तुलनेत घसरलेली दिसली. विशेष म्हणजे ‘पायाभूत सोयी’ या निकषात महाराष्ट्राचे स्थान इतर राज्यांच्या तुलनेत अव्वल दिसत असले तरी प्रत्यक्ष गुणवत्तेमध्ये मात्र महाराष्ट्राने तळ गाठलेला आहे. याला कारण म्हणजे दर्जेदार शिक्षणाचा अभाव होय. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरातील सरकारी नियंत्रणाखाली शालेय विभागात गुरूजींद्वारा अध्यापनाचा टक्का घसरला आहे. त्याला कारण केवळ गुरूजीच आहेत, असेही नाही. तर महत्त्वाचे कारण म्हणजे अनेक शाळा एक किंवा दोन शिक्षकी आहेत. गुरूजींची पुरेसी संख्या शाळेत नसल्याने अध्यापनाचा टक्का घसरणार नाही तर काय होणार?

फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणाची ही अवस्था गांभीर्याने घेतली पाहिजे. पण सरकार याकडे लक्ष देत नाही. गेल्या नऊ वर्षापासून शिक्षक भरती रखडली आहे. आताचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 24 हजार शिक्षकांची पदे भरण्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात केवळ 10 हजार 1 जागांच्या भरतीबाबतची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिध्द झाली आहे. या पवित्र पोर्टलमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणावर घोळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खर्‍याला न्याय नाही अन् खोट्याला शिक्षा नाही
सन 2011-12 मध्ये शासनाने विशेष पडताळणी मोहिम राबविली होती. या मोहिमेच्या माध्यमातून काही संस्था चालकांनी अधिकार्‍यांच्या संगनमताने हातचलाखी करून घेतली. शालेय वर्गातील पटावर बोगस विद्यार्थी टाकून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती करवून घेतली. दरवर्षी तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत पडताळणी केली जाते. या पडताळणीच्या माध्यमातून संचमान्यता दिली जाते. बोगस विद्यार्थी संख्या दाखवून वाढीव पदे मिळवून शिक्षक-शिक्षकेत्तरांची भरती होण्याचे अनेक प्रकार उघडकीस आलेत. या शैक्षणिक अनागोंदीत वर्गशिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, गटशिक्षण अधिकारी, शिक्षणाधिकारी… अशी सगळी मंडळी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशा प्रकारे भ्रष्टाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई झाल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही. त्यामुळे संस्थाचालक व अधिकार्‍यांची हिंमत वाढली व शिक्षक भरती बंदच्या काळात सुध्दा शिक्षक भरून मोकळे झाले. हे नियुक्त केलेले शिक्षक, मर्जीतले व वशिल्यातले असल्याने यांच्याकडूनही आदर्श अध्यापनाची अपेक्षा करणे चुकीचेच ठरेल.

बोगस भरती करतांना 2 मे 2012 आधीची नियुक्ती तारीख दाखवून अनेक शिक्षकांची पदे भरण्यात आली. काही संस्थांनी तर सरकारी परवानगी न घेता शिक्षक भरती केली आहे. काहींनी विनाअनुदानीत तुकड्यांवर भरती केल्याचे दाखवून नंतर त्यांची अनुदानीत तुकड्यांवर मान्यता मिळविली आहे. हे सरकारच्या आधी ध्यानात आले नसावे, म्हणून त्यांनी 24 हजार शिक्षकपदे भरती करण्याची घोषणा केली होती. मात्र बोगस शिक्षक भरती झाल्यामुळे ही रिक्त संख्या घटली आणि म्हणून आता 10 हजार 1 एवढ्या रिक्त पदांसाठी पवित्र पोर्टलवर जाहीरात काढण्यात आली. दरम्यान बोगस पटसंख्या दाखवून भरती केलेल्या शिक्षकांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर आणि परिणामी विद्यार्थी संख्या घटल्यानंतर त्यांना सोईस्करपणे अतिरिक्त ठरविण्यात आले. 2 मे 2012 पासून अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविल्यानेही प्रत्यक्ष शिक्षक भरतीच्या संख्येवर परिणाम झाला आणि गुरूजींची बेकारी वाढतच गेली.

टी.ई.टी.उत्तीर्णांचे हाल
शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी.ई.टी. ही परीक्षा 2013 मध्ये प्रथम घेण्यात आली. तेव्हापासून ही परीक्षा शिक्षक भरतीसाठी अनिवार्य करण्यात आली. त्यानंतर 2017 पासून अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी सुध्दा अनिवार्य करण्यात आली. हे सगळे प्रयत्न प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढावी म्हणून होत आहेत. पारदर्शकता यावी म्हणून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीचा घाट रचला. मात्र यामध्येही संस्था चालकांनाच मुलाखतीचे अधिकार दिल्यामुळे ‘नव्या बाटलीत जुनेच औषध’ अशी अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी टी.ई.टी. प्राविण्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना डावलून संस्था चालकांनी आपल्या मर्जीप्रमाणे शिक्षक भरती केली आहे. त्यामुळे जे विद्यार्थी मुळात हुशार आहेत, पात्रता व अभियोग्यता चाचण्यांमध्ये अव्वल आहेत ते घरी बसून आहेत. पात्रता नसलेले उमेदवार सरकारी पगारांवर डल्ला मारत आहेत.

रिक्त जागांमध्येही घोळ…?
पवित्र पोर्टलमध्ये केवळ 10 हजार पदांची जाहिरात प्रसिध्द आहे. त्यात जिल्हा परिषद शाळांच्या अवघ्या 5 हजार 152 जागा आहेत. खाजगी माध्यमिकसाठी 3 हजार 764 जागा आहेत. उर्वरीत जागा नगरपरिषद, महापालिका यांच्या आहेत. त्यातही अनेक तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी जी रिक्तपदे दाखविली आहेत. त्यात मराठी माध्यमांच्या शिक्षक पदांना ‘खो’ देण्यात आलाय, तर उर्दू माध्यमांच्या शिक्षक पदांना स्थान देण्यात आले आहे. दोन्ही माध्यमांच्या रिक्त पदांसाठी समतोल राखण्याची गरज असतांना, अनेक तालुक्यांमध्ये असा खोडसाळपणा दिसून येत आहे. त्यामुळे याकडे सरकारने लक्ष वेधणे गरजेचे आहे.

पण सरकारचे शिक्षणविषयक निर्णय आणि त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा यामध्ये कुठेही ताळमेळ दिसत नाही. भरीस भर काही संस्था चालकांची मनमानी आणि काही गुरूजनांची अनास्था या सर्वांमुळे प्राथमिक शिक्षणाची दैना उडाली आहे. केवळ दप्तराच्या ओझ्याखाली दबलेल्या प्राथमिक शिक्षणाचे काय होणार…? ते राज्यकर्तेच जाणो…!
जाता जाता कवि संदीप खरे यांच्या कवितेतील चार ओळी आठवल्या, त्या मांडाव्याशा वाटल्या…
काय म्हणू थट्टा, की आयुष्याचा दट्टा,
नाजुक-साजुक फुलांवरती, पडतो आहे घट्टा…
इवली-इवली पाठ अन् लटलटणारे पाय,
तुझ्यापेक्षा जड तुझे, ज्ञान होऊन जाय…
पुरुषोत्तम गड्डम-भ्रमणध्वनी 9545465455

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!