राज्यातील प्राथमिक शिक्षणाची अवस्था : एक ना धड भाराभर चिंध्या !

0

सरकारी शाळांमधील गुरुजनांची अवस्था बिकट झालीय, ते म्हणतात, सरकार आमचं ऐकत नाही, पालकांनो तुम्हीच आता जागरूक व्हा व शिक्षकांना साथ द्या… आम्हाला फक्त शिकवू द्या! शैक्षणिक परंतु असंबंधी लेखनप्रपंचाचा फाफटपसारा आणि अशैक्षणिक कामाचा बोजा… यामुळे प्रत्यक्ष अध्यापनास वेळही देता येत नाही आणि मानसिकताही नीट राहत नाही. ढिसाळ शिक्षण व्यवस्थेमुळे काम चुकार शिक्षकांना मजा वाटत असली. तरी होतकरु शिक्षकांची घुसमट वाढली आहे. प्रत्यक्ष विविधांगी अध्यापनासाठी शिक्षकांची नियुक्ती असली तरी प्रशासन त्यांना सैरावैरा पळावला लावत असल्याने, जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमधील पोरं बौध्दीक पोषणात मागे पडली आहेत. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अवस्था झालेल्या गुरूजी अन् पोरांच्या हवालदिलतेवर आज चावडीतून प्रहार!

’एर्वीलरींळेप’ या शब्दाचा अर्थ सुंदर विशद केला आहे. ’ढे शर्वीलश’ म्हणजे… बाहेर काढणे! निरुपयोगी गोष्टी काढून उपयुक्त गोष्टींचे संवर्धन करणे ज्याप्रमाणे एखादा शिल्पकार एखाद्या दगडात असलेली मूर्ती पाहतो. आणि त्या मूर्तीला अवतीर्ण करण्यासाठी दगडातील निरूपयोगी भाग काढून टाकतो. आणि सरतेशेवटी त्याचे रुपांतर एका अप्रतिम मूर्तीत होते… हीच बाब विद्यार्थी घडविण्याच्या शिक्षण प्रक्रियेतही व्हावी, म्हणून गुरूजी-शिक्षक नावाचा शिल्पकार निरागस बालकांमधील निरूपयोगी संस्कार, सवयी काढून उपयुक्त, व्यक्तीमत्व विकासाला साधक अशी शक्ती अंतर्भुत करून, विद्यार्थ्याला आदर्श नागरीक निर्माण करण्यासाठी क्षमता त्या शिल्पकारात म्हणजे शिक्षकामध्ये असते. मात्र शिक्षकांमधील ही क्षमता अशैक्षणीक कामे किंवा इतरत्र वापरून प्रत्यक्ष अध्यापनाची वानवा निर्माण करण्याची प्रवृत्ती प्रशासनाने आणि सरकारने सुरू केली आहे. त्यामुळे ‘एक ना धड भाराभर चिंध्या!’ या म्हणीचा प्रत्यय राज्यातील प्राथमिक सरकारी शाळांच्या कारभाराकडे पाहुन आल्याशिवाय राहात नाही.

एखादा देश मागासलेला ठेवायचा असेल, तर त्या देशातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था गोंधळयुक्त करून ठेवा, म्हणजे आपोआपच त्या देशातील बेरोजगारी वाढून देश प्रगतीपथावरून नष्ट होईल. हे हिटलरचे विचार महाराष्ट्रातील शिक्षण पध्दतीकडे पाहून, सत्यात उतरतील की काय…? अशीही भिती वाटू लागली आहे. आजची ढिसाळ शिक्षणपध्दती कामचुकार शिक्षकांच्या पथ्थ्यावर पडत आहे. आणि होतकरू, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील ऊर्जावान शिक्षकांचा कोंडमारा होत आहे. अशैक्षणीक कामे सोपविली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी बाधा निर्माण होत आहे. ही कामे बंद करण्यासाठी अनेक शिक्षक आमदारांनी विधीमंडळात, तारांकीत प्रश्न उपस्थित केलेत. शालेय शिक्षणमंत्र्यांनी बोलघेवडेपणा करून आश्वासन दिल, पण अशैक्षणिक कामे सपशेल बंद करण्यासंदर्भात कोणतेही अधिकृत अध्यादेश काढले नाहीत.

समाजाची शिक्षकांप्रती मानसिकता
राज्यातील विशेषत: जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक आणि तत्सम सर्व गुरुजन मंडळीविषयी अलीकडे अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. याला कारणीभूत शिक्षक जमातीतील कामचुकार आणि ऐतखाऊ शिक्षक मंडळी आहे. मात्र अशा शेखचिल्लींची संख्या कमी आहे. आजही ग्रामीण भागात जीवाचं रान करून शिकविणारी गुरूजन मंडळी आहे. मात्र ‘शितावरून भाताची परीक्षा’ करतांना या ठिकाणी गल्लत होत आहे. वाममार्गी शिक्षकांबद्दल भरभरून बोलणार्‍या समाजाने चांगले काम करणार्‍या शिक्षकांचेही कौतुक करणे गरजेचे आहे. वेळप्रसंगी त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे काम समाजाने केले पाहिजे. क्षेत्र कुठलेही असो, त्यात ‘उन्सीस बीस’ असणारच… म्हणून चांगल्याकडून अपेक्षा ठेवून समाजाने शाळेसोबत राहणे हितावह ठरणार आहे.

अशाच कामसू, होतकरू आणि प्रामाणिक गुरुजींवर सध्या सरकारने अशैक्षणीक कामाचा एवढा प्रचंड मोठा बोजा टाकलाय, की त्यातून त्यांना अध्यापनाचा श्वास घेण्यास उसंत मिळत नाही.

राज्यात दोन शिक्षकी शाळांची संख्या लक्षणीय म्हणजे पन्नास टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. अशा स्थितीत याच शिक्षकांकडे अनावश्यक लेखनप्रपंच आणि अशैक्षणिक कामांचा बोजा वाढला आहे, त्यातून शिकविण्यासाठी थोडा वेळ मिळाला तरी प्रत्येकाची मानसिकता टिकून राहील याची खात्री नाही. शिक्षकांकडे अध्यापन सोडून किती कामे दिली आहे, ते जरा बघा….

शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, माता-पालक संघ, शालेय परिवहन समिती, शालेय पोषण आहार समिती, गुणवत्ता सनियंत्रण समिती अशा वेगवेगळ्या दहाहून जास्त समित्यांच्या महिनावार बैठका घ्या, इतिवृत्त लिहा.

वेगवेगळे विशेष दिवस, सप्ताह, पंधरवाडे, महिने साजरे करा उपक्रमांचे फोटो काढा, इतिवृत्त लिहा, हार्ड कॉपीत अहवाल पाठवा, ऑनलाइन रिपोर्ट करा.

एवढे करुन साधारण पन्नासेक रजिस्टर वर्षभर लिहायचे असतात. बँकेचे सगळे व्यवहार बघायचे असतात. रोज किर्द, खतावणी अशा गोष्टी असतातच मागे.

गोष्ट इथे संपत नाही. गाव ते तालुक्यातल्या वेगवेगळ्या बैठका, प्रशिक्षण, आणखी इव्हेंट असतात…
1) तंबाखूमुक्त शाळा, त्याचे रेकॉर्ड , त्याचे डिजीटल बोर्ड करणे
2) रूबेला व गोवर ची लसीकरणची जबाबदारी गुरुजींच्याच खांदयावर, त्याचे रेकॉर्ड , प्रभात फेरी काढून गाव दवंडी दया.
3) निवडणुकामध्ये निवडणूक अधिकारी व्हा व निवडणुका घ्या मग त्याचे ट्रेनिंग करा व नंतर वर्षभर इङज म्हणून घरोघरी फिरून नवीन मतदार नोंदवा मग त्याचे ट्रेनिंग करा व काम नाकारल्यास तहसिलदार गुन्हे दाखल करणार.
4) तेवढयात हात धुवा दिन साजरा करुन अहवाल फोटोसह पाठवा असे परिपत्रक शाळेत पोहोच होते.
5) तोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी शाळेची जागा मोजून उतारे काढून विहित नमुन्यात माहिती सादर करायला सांगतात.
6) इतक्यात वरुन निरोप येतो ऑडिट आहे सगळी रजिस्टरे व कीर्द घेऊन या ऑडिटला या.
7) तेवढयात जंतनाशक गोळ्या ट्रेनिंग व वाटप साठी झकउमध्ये शिक्षकांना आमत्रंण आणि मग गोळ्या वाटपचे रजिस्टर त्यात दिल्या गोळ्या ,शिल्लक गोळ्या नोंद करुन यादी ठेवायची.
8) शालेय पोषण आहार रेकॉर्ड (आज कोणती डाळ , किती हळद, किती मीठ, किती तेल, किती तांदूळ, किती तिखट , किती मोहरी, किती जिरे) व सँपल जेवण रोजचे रोज ठेवायचे व ऑनलाईन नोंदी रोजच्या रोज करा.
9) धोकादायक शाळा खोली दुरुस्ती व निर्लेखन प्रस्ताव फोटोसह तयार करा.
10) शैक्षणिक उठावासाठी गावभर फिरा व लोकांची बोलणी ऐका.
11) शाळेत भौतिक सोईसुविधा निर्माण करा.
12) ण-ऊ।एड ट्रेनिंग करा व तो फॉर्म ऑनलाईन भरा.
13) शाळा सिद्धी प्रशिक्षण करुन कच्ची माहिती आराखडे बनवा व ऑनलाईन भरा.
14) झाडे लावा, त्यासाठी गावफेरी काढा, लावलेल्या झाडांना पाणी घालून जगवा व या सर्वाचा फोटोसह अहवाल पाठवा व ऑनलाईन वृक्षारोपन रिपोर्ट करा.
15) मुलांचे मार्क ऑनलाईन भरा .
16) सर्व मुलांची आधार कार्डझेरॉक्स घेऊन आधारकार्ड नोंद करा .
17) शाळेत ग्रामस्थ किंवा इतर कोणी बोनाफाईड /दाखला मागायला आले की दाखला काढून दया.
18) वर्ग व शाळा सजावट, बागबगिचा करा.
19) सर्व मुलांची वजन व उंची घेऊन रजिस्टर मध्ये यादी करुन नोंदवा.
20) तेवढयात जणगणना येते मग महिन्याभर शिक्षक गावातच .
21) गणवेश वाटप व पावत्या संग्रह करा.
22) शाळेच्या इमारती, नविन बांधकामे, मुतारी, संडास बांधकामे व देखरेख सगळी जबाबदारी
मुख्याध्यापक व शिक्षकांच्या डोक्यावरच
23) अधिकारी व केंद्रप्रमुख शाळा भेटी व तपासण्या अहवाल तयार करणे
24) शाळेत रिकामी पोती(बारदाने) गोळा करुन, मोजून, हिशेब ठेवणे.
25) इंग्रजी/खाजगी शाळेतून आलेल्या मुलांची माहिती गोळा करुन स्वतंत्र अहवाल देणे.
26) प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती रेकॉर्ड ठेवणे.
27) उपस्थिती भत्ता, दारिद्ररेषेखालील लाभार्थी भत्ता यादी व रेकॉर्ड ठेवणे.
28) ग्रामस्वच्छता अभियान राबवणे.
29) किशोर वयीन मुलांमुलीसाठी कार्यशाळात उपस्थित राहून अहवाल तयार करणे.
30) शाळा व्यवस्थापन कमिटी ट्रेनिंग ला उपस्थित रहाणे.
31) ग्रामसभांना ग्रामसेवक नसल्यास सचिव म्हणून उपस्थित राहून ग्रामसभा पार पाडणे.
32) मासिक कामे प्रत्येक महिना अखेर केंद्रशाळेत नेऊन देणे.
33) केंद्रप्रमुख पद रिक्त ठिकाणी केंद्रसमन्वयक म्हणून फिरस्ती चे काम करणे.
34) शाळेतील जीर्ण व गरज नसलेले साहित्य गटशिक्षणाधिकारी परवानगीने कमी करुन त्याचा घसारा रक्कम चलनाने राष्ट्रीय बँकेत भरणे(त्यासाठी तालुक्याला 2/3 फेर्‍या)
35) सगळेच एका वेळी सुरू असते. अंगावर येते हे. त्यात ढिगभर म्हणजे सुमारे सव्वाशे अशैक्षणिक (ऑनलाइन) कामे पाचवीला पूजलेली असतातच! त्यात ते लोकसहभागाचे नाटक आहेच सुरू…
शिक्षक भूमिकावादाच्या चक्रव्यूहात गुरफटलेला अभिमन्यू झालाय! सोबत वाटयाला आलेल्या दोन वर्गाचे शैक्षणिक कामकाज बघायचे असतेच. महत्त्वाच्या शिकवण्याच्या कामाला अनेकदा पुरेसा वेळच मिळत नाही.
इतकी प्रचंड अशैक्षणिक कामे लावता आणि कोणत्या तोंडाने शैक्षणिक गुणवत्ता मागता?गुरुजींना अशैक्षणिक कामाला जुंपून शासनाला सरकारी शाळा तर बंद करून टाकायच्या नाहीत ना? असाही सवाल सत्यात उतरण्याची स्थिती निर्माण झाली, तर नवल वाटू देऊ नका….या सर्व घोळात नुकसान मात्र ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे होत आहे, ही मोठी शोकांतिका आहे…!
भ्रमणध्वनी -9545465455
पुरूषोत्तम गड्डम

LEAVE A REPLY

*