Type to search

क्रीडा नंदुरबार

राज्यस्तरीय ऍथलेटीक्स स्पर्धेत रिंकी पावरा राज्यात अव्वल

Share

शहादा | ता.प्र.- चिपळूण (रत्नागिरी) येथे पार पडलेल्या ३५ व्या महाराष्ट्र ज्युनियर ऍथलेटिक चॅम्पियन २०१९ या स्पर्धेत धडगाव तालुक्यातील खर्डी येथील रिंकी पावरा ही ३ हजार मीटर स्पर्धेत राज्यात अव्वल ठरली आहे. तिने भोसला स्कुल नाशिक येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा शिक्षक विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले आहे. तिच्या यशात सेवानिवृत्त अभियंता जेलसिंग पावरा यांचे मोठे योगदान राहिले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे नुकतीच ३५ व्या महाराष्ट्र ज्युनियर ऍथलेटिक चॅम्पियन २०१९ ही राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाली. १४ ते १८ वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत पंधराशे व ३ हजार मीटर धावण्याची ऍथलेटिक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील खर्डी (ता.धडगाव) येथील रिंकी धन्या पावरा हिनेही सहभाग घेतला होता. ३ हजार मीटरच्या ऍथलेटिक्स स्पर्धेत रिंकी पावरा ही राज्यात अव्वल ठरली आहे. तर पंधराशे मीटरच्या स्पर्धेत गंगापूर जि.नाशिक येथील ताई बामणे ही राज्यात पहिली आली.

रिंकी पावरा ही यापूर्वी धडगाव तालुक्यातील मुंगबारी येथे २४ फेब्रुवारी २०१८ मध्ये सेवानिवृत्त अभियंता जेलसिंग पावरा यांच्या ढोरक्या ते इंजिनिअर या आत्मकथनाच्या प्रकाशनानिमित्त भागीबाई बिजला पावरा यांच्या स्मरणार्थ आयोजित सहा मीटर सातपुडा भव्य मॅरेथॉन स्पर्धेतही शेकडो स्पर्धकांमध्ये अव्वल ठरली होती. तिच्यातील जिद्द व आत्मविश्वास पाहून इंजिनीयर जेलसिंग पावरा यांनी तिला पुढील प्रशिक्षणासाठी नाशिक येथील भोसला स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्याकरिता स्वतः नेले. सोबत रिंकी पावराचे आई वडील व भाऊदेखील होता. विजेंदर सिंग यांनी भारताच्या रिओ ऑलिम्पिक प्रतिनिधी कविता राऊत व राष्ट्रीय चॅम्पियन दिनेश भिल यांना घडविले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रिंकी पावरा हिने ३५ व्या महाराष्ट्र ज्युनियर ऍथलेटिक चॅम्पियन २०१९ या स्पर्धेत राज्यात अव्वल यश मिळविले आहे. तिच्या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. इंजिनीयर जेलसिंग पावरा हे रिंकी पावरा हिला सतत प्रोत्साहन देत सर्वतोपरी सहकार्य करीत आहेत.

रिंकी पावरा हीच्यातील सुप्त गुण जिद्द व आत्मविश्वास पाहून तिच्या पुढील प्रशिक्षणाची जबाबदारी भोसला स्कूलमध्ये विजेंदर सिंग यांनी स्वीकारली असून कविता राऊत व दिनेश भिल हेदेखील दिला मार्गदर्शन करणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!