Type to search

क्रीडा

राजस्थान विजयी मार्गावर

Share
मुंबई । सलामीवीर जोस बटलरचं धडाकेबाज अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर राजस्थान रॉयल्सने, बाराव्या हंगामात आपल्या पराभवाची मालिका अखेर खंडीत केली आहे. घरच्या मैदानावर खेळणार्‍या मुंबई इंडियन्सला राजस्थानने 4 गडी राखून पराभूत केलंय. मुंबईने विजयासाठी दिलेलं 188 धावांचं आव्हान राजस्थानने बटलरच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. बटलरने 43 चेंडूत 89 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. मुंबईकडून कृणाल पांड्याने 3, जसप्रीत बुमराहने 2 तर राहुल चहरने 1 बळी घेतला.

कर्णधार अजिंक्य रहाणे आणि बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. मुंबईच्या गोलंजांचा नेटाने सामना करत दोन्ही फलंदाजांनी संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. कृणाल पांड्याने अजिंक्य रहाणेचा अडसर दूर केल्यानंतर बटलरने संजू सॅमसनच्या साथीने संघाचा डाव सावरला. बटलरने यादरम्यान आपलं अर्धशतक पूर्ण करत मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. राजस्थानचा संघ विजयाच्या जवळ आलेला असतानाच, सॅमसन, बटलर, राहुल त्रिपाठी, लिव्हींगस्टोन, स्मिथ हे फलंदाज माघारी परतले. यामुळे राजस्थानच्या गोटात चिंतेच वातावरण पसरलं होतं. मात्र तळातल्या फलंदाजांनी राजस्थानचा विजय सुनिश्चीत केला.

त्याआधी, सलामीवीर क्विंटन डी कॉकचे अर्धशतक (81) आणि रोहित शर्माची (46) फटकेबाज खेळी याच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करत 5 बाद 187 धावा केल्या. नाणेफेक जिंकून राजस्थानने मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मुंबईचे सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांनी संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्यामुळे 4.2 षटकातच म्हणजे केवळ 26 चेंडूत मुंबईने अर्धशतकी मजल मारली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा फटकेबाजी करत होता. मात्र त्याच फटकेबाजीच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला आणि मुंबईला पहिला धक्का बसला. त्याने 32 चेंडूत 47 धावा केल्या.

रोहितला अर्धशतकाने हुलकावणी दिली असली, तरी सलामीवीर क्विंटन डी कॉक याने फटकेबाजी सुरु ठेवली आणि अर्धशतक पूर्ण केले. या बरोबरच मुंबईनेही शतकी मजल मारली. चांगल्या लयीत असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव या सामन्यात फारशी छाप पाडू शकला नाही. धवल कुलकर्णीच्या गोइलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला आणि मुंबईला दुसरा धक्का बसला. यादवने 16 धावा केल्या. धोकादायक खेळी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला कायरन पोलार्ड स्वस्तात माघारी परतला. त्याने 12 चेंडूत 6 धावा केल्या. सलामीवीर क्विंटन डी कॉकने एक बाजू लावून धरत दमदार 81 धावांची खेळी केली. पण फटकेबाजी करताना तो झेलबाद झाला. त्याने या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार लगावले. इशान किशन 5 धावांवर माघारी परतला. शेवटच्या टप्प्यात हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत नाबाद 28 धावा केल्या. त्यामुळे मुंबईला 187 धावांपर्यंत मजल मारता आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!