Type to search

क्रीडा

राजस्थानला १८३ धावांचे आव्हान

Share
मोहाली | मोहालीच्या मैदानावर राजस्थान विरुद्ध पंजाब हा सामना सुरु आहे. सलामीवीर लोकेश राहुलचे अर्धशतक (५२) आणि डेव्हिड मिलरची फटकेबाज खेळी (४०) यांच्या बळावर पंजाबने २० षटकात १८२ धावा केल्या आणि राजस्थानला विजयासाठी १८३ धावांचे आव्हान दिले.

राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तडाखेबाज फलंदाजी करणारा ख्रिस गेल बचावात्मक फटका खेळताना माघारी परतला आणि पंजाबला पहिला धक्का बसला. गेलने २२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकार खेचत ३० धावा केल्या. नव्या दमाचा मयंक अग्रवाल मोठा फटका खेळताना झेलबाद झाला आणि पंजाबला दुसरा धक्का बसला. मयंकने १२ चेंडूत १ चौकार आणि २ षटकार यांच्या साहाय्याने २६ धावा केल्या.

अतिशय शांत आणि संयमी सुरुवात केलेल्या सलामीवीर लोकेश राहुलने चौकार लगावत ४५ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतकानंतर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात लोकेश राहुल माघारी परतला. राहुलने ३ चौकार आणि २ षटकार खेचत ४७ चेंडूत ५२ धावा केल्या. निकोलस पुरन ६ चेंडूत ५ धावा करून माघारी परतला. मनदीप फारसा प्रभाव पाडू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला. मिलरने पंजाबच्या धावसंख्येत भर घालत मोलाचा वाटा उचलला. त्याने ४० धावा केल्या. अखेरच्या षटकात अश्विनने ४ चेंडूत १७ धावा करत पंजाबला १८२ धावांचा पल्ला गाठून दिला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!