Type to search

राजकीय धूळवडीचे ‘बुरा न मानो…’

ब्लॉग

राजकीय धूळवडीचे ‘बुरा न मानो…’

Share

यंदाच्या निवडणुकीत नेमके काय होणार? स्वत:च्या वेगळ्या सुभेदार्‍या मांडणार्‍या पक्षांची कोणाला मदत होणार? कारण तूर्तास तरी भाजपविरोधात सगळे हा फार्स ठरला आहे.

भाजपच्या पाच वर्षांच्या सत्तेला पर्याय मिळणार असे वातावरण असल्याचे सांगितले जात असतानाच ही निवडणूक वेगळ्याच दिशेने जाताना दिसत आहे. भाजपविरोधात सगळे एक असे म्हणणार्‍या कथित पुरोगामी पक्षांचे महाआघाडीचे मनसुबे पुसले जाऊन त्यांनी आपापल्या छोट्या छोट्या छत्र्या घेऊनच हा पावसाळा काढायचे ठरवले आहे. म्हणजे खूप आधी झालेल्या प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्या दलित मुस्लीम मतांच्या आघाडीला जागा देता देता वंचित ठेवण्यात आले. त्यानंतर आता झालेली सप-बसप यांची दलित मुस्लीम ओबीसी मतांची दुसरी आघाडी! त्यांना काँग्रेसने झुलवल्याचा नेहमीचा आरोप आणि सवता सुभा! राहता राहिले स्वाभिमानी शेतकरीचे राजू शेट्टी! त्यांनी तीनऐवजी दोन जागा घेत समाधान मानले. जनता दल, सीपीएम, रिपब्लिकनचे उर्वरित गट-तट यांचे तर या महाआघाडीत पानही हलताना दिसत नाही. त्यामुळे भाजपविरोधात सगळे हा फार्स ठरला आहे.

दुसरीकडे भाजपने दुसर्‍यांची मुले, नातवंडे आपल्या पाळण्यात घालण्याचा जोरात गुजरात पॅटर्न सुरू केला आहे. मनसेना अध्यक्षांनी स्पष्टपणे राजकीय कार्यक्रम तलवार म्यान केला आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे. मोदी आणि शहा यांना हरवण्यासाठी त्यांच्या विरोधात जी जी माहिती मिळेल ती ती जमा करा, सरकारचे अपयश लोकांसमोर मांडा. त्यासाठी स्वत: इंटरनेटवर जाऊन माहितीची खात्री करून घ्या. अभ्यास करा. त्या गोष्टी व्यापक प्रमाणात समाजात पसरवा. तुमच्या मित्रांना तर सांगाच पण त्याही पलीकडे जा. ज्यांनी मागच्या निवडणुकीला मोदींना मतदान केले होते ते लोक कोण आहेत त्यांना शोधा. त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी माहितीचा वापर करा. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्अ‍ॅप आहेच पण त्यांचे अल्गोरिदम्स किंवा त्यांची रचना अशी असते की त्यांचे तेच ते संदेश तुमच्या तुमच्यातच फिरत राहतात. तुमच्याच राजकीय विचारांच्या माणसांना, जे तुमच्या बाजूचे आहेत त्यांनाही तुम्ही तेच तेच सांगत राहता. त्याचा उपयोग नाही. त्या वर्तुळाच्या पुढे जा. मी तर म्हणेन ज्यांनी मागच्या निवडणुकीत मोदींना मत दिले आहे अशा किमान तीन लोकांना रोज प्रत्यक्ष भेटा. नुसता व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक संदेश नको. जे थोडे वेगळा विचार ऐकू शकतात, चर्चा करू शकतात त्यांना तुमचा राजकीय विचार पटवून द्या. आपण आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. परंतु आपल्याला निवडणुकीत कुणाला हरवायचे आहे हे आपल्याला नक्की माहीत आहे, असे छातीठोक आवाहन मनसेनापतींनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. राजकीय इतिहासात असे कदाचित पहिल्यांदा झाले असावे की एखाद्या पक्षाचा एकही उमेदवार नाही परंतु पक्षाला स्वत:चे राजकीय ध्येय आहे, असल्याची समजूत पक्षाने करून घेतली आहे.

दुसरीकडे वंचित आघाडी कुणासाठी बिघाडी ठरणार, असा प्रश्न आता विचारला जात आहे. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांनी वंचित आघाडी स्थापन करून लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या स्वतंत्र लढण्याने भाजपलाच फायदा होईल अशीच सगळीकडे चर्चा आहे आणि राजकीय तज्ञांचेही तेच मत आहे; पण मूळ विषय असा आहे की, काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विखे- पाटील हे युतीचा प्रस्ताव घेऊन प्रकाश आंबेडकरांच्या घरी गेले होते. सहा जागा देण्याचे महाआघाडीने मान्य केले होते. तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी सुनावले होते, आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलची भूमिका स्पष्ट करा. मुळात वंचितांनी स्वतंत्र लढावे, असे भाजप वा काँग्रेस यांना वाटत नाही. कारण भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही वंचित आघाडीची धास्ती आहे. स्वतंत्र चूल मांडलेला प्रकाश आंबेडकरांचा व ओवेसींचा हा सांस्कृतिक, राजकीय लढा किती यशस्वी होतो हे दिसेलच. होळीच्या वातावरणात रंगलेल्या या राजकीय धूळवडीत मग ‘ज्यांना आम्ही नाकारले, हाकलले त्यांनाच तुम्ही स्वीकारले, गोंजारले… आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरे मांडीवर घेणार?’ असा सवाल करत मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसने भाजपविरोधात मुंबईभर पोस्टरबाजी केली. दादर येथील शिवसेना भवनासमोर लावलेले पोस्टरही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘बुरा न मानो होली है!’ असे म्हणत भाजपची फिरकी घेतली आहे.
किशोर आपटे, मो. 9869397255

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!