Type to search

अग्रलेख संपादकीय

राजकीय इच्छाशक्ती हवी!

Share
जलस्त्रोत कोरडे पडणे व जलाशयांमधील पाण्याचे बाष्पीभवन यामुळे दुष्काळाच्या तीव्रतेत भर पडत आहे. राज्यातील जलाशयांमधून वर्षभरात 4428 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. वॉटर ऑडिट अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. बाष्पीभवनाचे अचूक मोजमाप होत नाही.

त्यामुळे नेमके किती पाणी उडून जाते याचा अंदाज बांधता येत नाही. परंतु पाण्याच्या बाष्पीभवनाची वेळीच काळजी न घेतल्यास भविष्यात पाणीसंकट अधिक गंभीर होईल असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे. 2003-04 सालापासून राज्यात वॉटर ऑडिटला सुुरुवात झाली आहे. राज्यात उन्हाचा पारा वाढत आहे. त्याचा विपरित परिणाम जलस्त्रोतांवर होत आहे. भूजल पातळी खाली गेल्यामुळे एकाच आठवड्यात राज्यातील पाचशे गावांमधील जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. टँकरने पाणीपुरवठा कराव्या लागणार्‍या गावांची संख्या अकरा हजारांपेक्षा जास्त झाली आहे. दुष्काळामुळे जनावरांच्या पाण्याची समस्या गंभीर असून दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. दुष्काळ माणसाला शहाणपणा शिकवतो असे म्हणतात.

दुष्काळ पडला की माणसे पाण्याचा नेमका वापर सुरू करतात. उधळपट्टी करत नाहीत. तथापि पाऊस पडला की परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. उपलब्ध पाण्याचा नियोजनपूर्वक वापर न करणे व मनमानी पद्धतीने पाण्याची उधळपट्टी करणे समाजाला आता परवडणार नाही. दरवर्षीच कमी अधिक फरकाने राज्यातील कोणत्या ना कोणत्या भागाला दुष्काळाचा सामना करावा लागत आहेत. जलसंवर्धन आणि पाण्याचा कटाक्षाने वापर हेच त्यावरचे शाश्वत उपाय आहेत. पाईपच्या सहाय्याने सडा न मारणे, नळ सुरू ठेवून दाढी न करणे, बादलीत पाणी घेऊन चारचाकी वाहने धुणे, नळाखाली भांडी न धुणे अशा अनेक छोट्या सवयी बदलल्या तरी मोठ्या प्रमाणात जलसंवर्धन होईल.

जलाशयांमधील पाण्याचे वेगाने होणारे बाष्पीभवन ही गंभीर समस्या आहे. ते रोखण्यासाठी जलतज्ञांनी उपाय सुचवायला हवेत. तोपर्यंत पाण्याचे वहन करण्यासाठी त्वरित पाईपलाईनचा उपयोग सुरू करायला हवा. सध्या यासाठी कालव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पाईपद्वारे पाणीपुरवठा झाल्यास पाण्याचे बाष्पीभवन टाळता आणि पाण्याची चोरी रोखता येईल. तथापि यासाठी निधीची आणि तो योग्य पद्धतीने खर्ची पडावा यासाठी जबरदस्त राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!