राजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल?

0

वेेळच्या वेळी जेवण आणि पुरेशी झोप घेण्यासाठी पोलिसांना वेळ मिळावा, त्यांचे आरोग्य सुदृढ राहील याची काळजी घेतली जावी, अशी मागणी पोलीस बॉईज संघटनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे. देशात निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. पोलिसांना अनेकवेळा सलग अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त काळ सेवा बजवावी लागत आहे. संवेदनशील मतदारसंघांमध्ये जबाबदारीत जास्तच वाढ होते.

याची दखल निवडणूक आयोगाने घ्यावी, असेही या संघटनेने म्हटले आहे. पोलीस बॉईज संघटनेने उपस्थित केलेल्या मुद्याची चर्चा फक्त निवडणूक काळापुरती मर्यादित ठेवणे अन्यायकारक ठरेल. कारण पोलिसांच्या कामाच्या तासांची कालमर्यादा निश्चित केलेली असली तरी ती पाळली जात नाही. पोलीस बॉईजने उपस्थित केलेल्या मुद्याची व्यापकता मोठी आहे. पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण असतो. कायदा-सुव्यवस्था राखणे पोलिसांचे मुख्य कर्तव्य आहे, पण याव्यतिरिक्त पोलिसांना अनेक कामे करावी लागतात.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना चोवीस तास संरक्षण पुरवावे लागते. यात्रा-जत्रा, महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे, मंत्र्यांच्या बैठका, सभा अशा अनेक प्रसंगी बंदोबस्त ठेवावा लागतो. बंदोबस्ताचा हा कालावधी प्रसंगी कितीही तासांचा होऊ शकतो. पोलिसांना त्या काळात सतत रस्त्यावर उभेच राहावे लागते. बंदोबस्तावरील पोलिसांना जेवणासाठीही सवड मिळत नाही. माणसाच्या काही नैसर्गिक गरजा आहेत, पण पोलिसांच्या बाबतीत हा मुद्दा सहसा दुर्लक्षितच राहतो.

मग कुटुंबियांसाठी काही ठराविक वेळ देण्याची गोष्टच दूर! या ताणाचा परिणाम पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. पोलिसांना निरनिराळ्या व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. मुंबईतील काही पोलीस ठाण्यांत पोलिसांचे कामाचे तास निश्चित करण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राज्याच्या पोलीस महासंचालकांनी हाती घेतला होता. तो थोडाफार यशस्वीही झाला. नियोजन केले तर पोलिसांना आठच तास काम करणे शक्य आहे, हे मुंबईच्या प्रयोगाने सिद्ध झाले आहे.

तथापि पोलीस खात्यातील मनुष्यबळाअभावी हा प्रयोग राज्यभर राबवणे शक्य नाही, असे पोलीस महासंचालकांनीच स्पष्ट केले आहे. ही उणीव भरुन काढण्यासाठी जबरदस्त राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. ती कोण व कधी दाखवणार? तात्पर्य, पोलिसांचे ‘अच्छे दिन’ येण्यासाठी अजून किती काळ जावा लागेल, ते देवच जाणे!

LEAVE A REPLY

*