राजकारणात कोणीही मित्र-शत्रू नसतो – महापौर अशोक मर्तडक

0

नाशिक | दि.२८ प्रतिनिधी –नाशिक महापालिकेचा महापौर या नात्याने आपण गेली अडीच वर्षे पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी यांच्या सहकार्याने शहरात विकासकामे करू शकलो. सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी केला. ही कामे राज्य शासनाच्या सहकार्यामुळे महापालिकेकडून झाली. राजकारणात कोणीच कोणाचा मित्र अथवा शत्रू नसतो. सत्ता येते आणि जाते, अशी कबुली देत महापौर अशोक मुर्तडक यांनी आपल्या भावना आज अखेरच्या महासभेत व्यक्त केल्या.

येत्या १५ मार्च रोजी मुदत संपत असलेल्या महापालिकेच्या सन २०१२-२०१७ या पंचवार्षिक कालावधीतील पदाधिकारी, नगरसेवकांची अखेरची महासभा आज महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी केवळ २३ नगरसेवक हजर होते. यात पुन्हा निवडून आलेले दोन- तीन नगरसेवक वगळता बहुतांशी पराभूत झालेले आणि काही निवडणूक न लढलेले नगरसेवक या शेवटच्या महासभेला हजर होते. सभेच्या प्रारंभी श्रद्धांजली प्रस्तावांवर महासभेत सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर नगरसेवकांनी आपल्या गत पाच वर्षातील कार्यकाळात केलेली कामगिरी, सहकारी पक्षांकडून व अधिकार्‍यांकडून मिळालेल्या सहकार्याची माहिती देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

आपल्या अखेरच्या भाषणाच्या प्रारंभी महापौरांनी विषयपत्रिकेवरील १२ महासभांचे इतिवृत्त मंजूर करण्यासंदर्भातील विषयांना मंजुरी दिली. त्यानंतर जादा विषयांना नियमानुसार महापौरांनी मंजुरी दिली. आपल्या भावना व्यक्त करताना महापौर म्हणाले, नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत जुन्या नगरसेवकांना मतदारांकडून बायपास मिळाला आहे. हे नगरसेवक सभागृहाबाहेर गेले असले तरी त्यांनी महापालिकेत येऊन हक्काने काम करून घ्यावे. पुढच्या निवडणुकीत ही मंडळी पुन्हा निवडून येतील. मात्र महापालिकेत नवीन पिढीलादेखील संधी मिळाली पाहिजे. गेल्या पंचवार्षिक काळात आ. सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, आ. अपूर्व हिरे हे आमदार झाले. त्यांनी महापालिकेसाठी चांगले काम केले असून यापुढेही भाजपचे आमदार महापालिकेच्या अपेक्षा पूर्ण करतील, अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली.

जादा विषय नियमानुसार मंजूर
मनपा माध्यमिक शाळांतील रिक्त मुख्याध्यापकांची पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरावी. महापालिका सेवेतील अर्टिजन टू टेक्नॉक्रॅट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कोर्स उत्तीर्ण झालेले मेसन, गवंड व मिस्तरी यांचे शैक्षणिक अर्हतेनसार त्या पदाचे कामकाज देणे. सन २०१६-२०१७ चे सुधारित व सन २०१७-२०१८ चा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक कार्यक्रम जाहीर करणे. महापालिका मालकीची घंटागाडी वाहने लिलाव करून विक्री करणे.

पाणीपुरवठा विभागातील कामासाठी एकूण ३० व्हॉल्व्हमनची कामे आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून दोन वर्षासाठी करून घेणे. पाथर्डी शिवार स. नं. २६३ व २६४ मधील दफनभूमी संरक्षक भिंत उभारणे व या कामाच्या ९९ लाख ४०,०८० रु. खर्चास प्रशासकीय मंजुरी मिळणे.

सातपूर कॉलनी येथील छ. शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे नूतनीकरण करून पूर्णाकृती पुतळा बसवणे व चबुतरा सुशोभिकरण कामासाठी ६५ लाख ८६,९४३ रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मंजुरी मिळणे. मविप्र नाशिक यांना फावडे लेन शाळा क्र. २ व सातपूर येथील शाळा क्र. ७४ इमारती वर्ग चालवण्यासाठी मनपा अटी-शर्तीनुसार भाडेतत्त्वावर देणे आदी विषयांना नियमानुसार मंजुरी देण्यात आली.

आजच्या सभेला आ. सानप, आ. फरांदे, आ. अपूर्व हिरे या तीन आमदारांनी हजेरी लावली. तर नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले, निवडणूक न लढलेले बहुतांशी नगरसेवक हजर होते.

१८ प्रस्तावांना मंजुरी
आजच्या महासभेत विविध नगरसेवकांनी चौक, मार्ग, सभागृह व अभ्यासिका अशांना नवीन नावे देण्यासंदर्भातील १८ प्रस्ताव नगरसेवकांनी जादा विषयात दिले होते. यास महापौरांनी नियमानुसार मंजुरी दिली.

कौतुकांचा वर्षाव अन् सूचना
* माजी महापौर विनायक पांडे – महापौर अशोक मुर्तडक यांचा नाशिक शहर विकासपुरुष म्हणून उल्लेख करील. शहरातील विकासकामे व सिंहस्थ कुंभमेळ्यातील कामांमुळे शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम महापौरांनी केले. त्यांनी शहराला वेगळी दिशा देण्याचे काम केले.

* आरपीआय गटनेते प्रकाश लोंढे – महापालिका कर्मचार्‍यांसाठी विमा योजना, झोपडपट्टी सर्वे आणि महासभा तहबुकीचे नियम हे निर्णय आपल्या सूचनांवरून झाले. सर्वांच्या सहकार्यामुळे चांगले काम करता आले. ‘काही कोंबडीचोर’ सोडले तर आपल्यावर आरोप झालेले नाही. अनुकंपावरील वारसांना नोकरीचा प्रश्‍न सुटला नाही.

* विक्रांत मते – आम्हाला महापालिका समजावून सांगणार्‍या सर्व घटकांचे आभार. महापालिकेचे कामकाज, अधिकारी व नगरसेवकांचे अधिकार यासंदर्भातील माहिती नवीन नगरसेवकांना देण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला जावा. यामुळे नवीन नगरसेवकांचे काही वर्ष वाया जाणार नाही. महासभेच्या अगोदर विषयांची माहिती नगरसेवकांना मिळावी याकरिता नगरसेवकांसाठी सादरीकरण ठेवावे आणि सभागृहात नागरिकांच्या काही सूचना व नगरसेवकांनी काही माहिती देण्यासाठी ऑडिओ-व्हिडीओची व्यवस्था करावी.

* शिक्षण सभापती संजय चव्हाण – गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात महापालिकेने मोठे काम करीत हा महाउत्सव जगाच्या नकाशावर नेण्याचे काम महापौरांनी केले. येणार्‍या काळात सत्तेत आलेल्या भाजपने शहर विकासासाठी केंद्र, राज्य यांच्याकडून जास्तीत जास्त निधी आणावा.

* रंजना पवार – महापालिका आस्थापनातून मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळे कर्मचार्‍यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. याकरिता सत्तेतील भाजप आणि आमदारांनी महापालिकेत नोकर भरती करावी. यात स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्यावा.

* संभाजी मोरुस्कर – महासभेत अनेकदा भाजप विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसले होते. पण हे चित्र निवडणुकीतून बदलले आहे. आता सत्तेत आमच्याबरोबर पूर्वीचे विरोधकदेखील आले आहेत. यापुढे महापालिकेत चांगला विकास केला जाईल.

* आ. बाळासाहेब सानप – लोकप्रतिनिधी म्हणून आपण शहरात विविध विकासकामे केली आहेत. कुंभमेळा यशस्वी केला. साधुग्रामसाठी आरक्षित जागा, शाहीमार्ग बदलण्याचे काम आणि कुंभमेळ्यासाठी मोठा निधी मिळवून देण्याचे काम आपण केले. आता नाशिककरांनी भाजपवर विश्‍वास टाकला असून यापुढे पक्षभेद न पाहता शहराचा विकास केला जाईल. चुकीचे काम करणार्‍यांना नागरिक निवडणुकीच्या माध्यमातून थांबवत असतात.

* मनसेना गटनेते अनिल मटाले – मागील १५ वर्षांत जे झाले नाही ती विकासकामे मनसेनेने ५ वर्षांत केली. मात्र या कामांचा प्रचार-प्रसार करण्यास आम्ही कमी पडलो. सर्व पातळीवर जाहिरातीत आम्ही कमी पडलो तरी नागरिकांच्या सेवेत आम्ही कमी पडलो नाही. सर्व कॉलनीत रस्ते करण्याचे काम केले असून आज शहर खड्डामुक्त झाले आहे.

LEAVE A REPLY

*