रस्तालूट करणार्‍या टोळीला राहुरी पोलिसांच्या बेड्या

0

राहुरी (प्रतिनिधी)- नगर-मनमाड महामार्गावर वाहने अडवून लुटमार करणार्‍या सोनेरी टोळीतील चार जणांना राहुरी पोलिसांनी रातोरात बेड्या ठोकल्या. या टोळीतील दोनजण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले. गेल्या अनेक दिवसांपासून राहुरी पोलिसांच्या ही टोळी रडारवर होती. त्यातील एक आरोपी राहुरी शहरातील असून तीन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 
शुक्रवार दि. 12 मे रोजी सुरेश दगडू पडघलमल (वय 35, कानिफनाथ चौक, राहुरी) हे कोल्हारहून मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मालवाहतूक अ‍ॅपे क्रमांक एमएच 16 एई 370 मधून राहुरीच्या दिशेने जात असताना नगर-मनमाड महामार्गावरील चिंचोली शिवारात एका पेट्रोल पंपाच्या जवळ आले असता पाठीमागून दुचाकी क्रमांक एमएच 17 एएच 1295 वाहनावरून तीन जणांनी येऊन अ‍ॅपेला आडवी घातली.

 

पडघलमल यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांना गाडीच्या खाली ओढले व लाकडी दांडक्याने मारहाण केली. खिशातील 25 हजाराची रोकड, मोबाईलसह अन्य वस्तू असा 26 हजार 800 रुपयांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुरनं. 169/2017 भादंवि कलम 394, 341, 34 नुसार रस्त्यात लुटमार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पोलीस पथक तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना केले असता पथकाला गणेश बाळासाहेब शेटे (वय 19, रा. खळवाडी, राहुरी) व इतर तीन अल्पवयीन आरोपींना जेरबंद करण्यात आले. आरोपींना पोलिसी खाक्या दाखविताच ते पोपटासारखे बोलू लागले. त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक चोरलेली चारचाकी, ताब्यात घेण्यात आली असून पडघलमल यांना लुटल्याची कबुली दिली आहे. ही टोळी पकडल्याने नगर-मनमाड महामार्गावर घडलेल्या अनेक रस्तालुटीचा पर्दाफाश होणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

*