‘रयत’च्या उपाध्यक्षपदी कोल्हे, कडू

0

उत्तर विभाग प्रमुखपदी दादाभाऊ कळमकर; सचिवपदी प्राचार्य भाऊसाहेब कराळे

शंकरराव कोल्हे
अरुण कडू

अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेवर नगरकरांनी पुन्हा एकदा वर्चस्व मिळवले आहे. राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांची सचिवपदी वर्णी लागली आहे. शंकरराव कोल्हे, अरूण कडूपाटील यांना उपाध्यक्षपद मिळाले आहे.

मॅनेजमेंट कौन्सिलमध्ये बबनराव पाचपुते, राजेंद्र फाळके यांना संधी देण्यात आली आहे. उत्तर विभागाच्या अध्यक्षपदी माजी आमदार दादा कळमकर यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे शरद पवार यांची फेरनिवड झाली.
संस्थेच्या सदस्यांच्या सर्वसाधारण सभेत या निवडी झाल्या. सचिवपदासाठी पतंगराव कदम यांनी प्राचार्य विजयसिंह सावंत तर ए.डी. पाटील यांनी वाशिममधील प्राचार्य विठ्ठल शिवणकर यांचे नाव लावून धरले होते. एकमत न झाल्याने पवार यांनी नगरच्या कराळे यांची निवड केली. त्याला सर्वांनी संमती दर्शवली. त्यांचे प्रतिस्पर्धी सावंत यांना सहसचिवपद देण्यात आले.

नूतन सदस्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे. उपाध्यक्षपदी गणपतराव देशमुख, जयश्री चौगुले,एस.एम. पाटील, गोपीकिसन पाटील हे उपाध्यक्ष आहेत. माध्यमिक विभागाचे उपसचिवपद आष्टा येथील महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास महाडिक यांना देण्यात आले.

  माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, बबनराव पाचपुते, राजेंद्र फाळके यांची मॅनेजिंग कौन्सिलमध्ये संधी देण्यात आली. कार्याध्यक्षपदी डॉ. अनिल पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, ज्येष्ठ नेते डॉ.एन.डी. पाटील, अ‍ॅड. रवींद्र पवार, अ‍ॅड. भागिरथी शिंदे, मीनाताई जगधने, रामशेठ ठाकूर यांनाही मॅनेजिंग कौन्सिलमध्ये स्थान देण्यासाठी ठराव करण्यात आला.

 

कोपरगाव,राहुरीत जल्लोष

कोपरगाव/सात्रळ (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी आगामी तीन वर्षासाठी माजीमंत्री व संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक शंकरराव कोल्हे यांची व राहुरी येथील अरुण कडू यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या निवडीचा कोपरगाव व राहुरी तालुक्यांत जल्लोष करण्यात आला.
माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सहकार शिक्षण सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रांत अलौकिक काम केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. ग्रामीण भागात राहणारा व रयत शिक्षण संस्थेत शिकणारा विद्यार्थी त्या स्पर्धेला पात्र व्हावा. ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या घोषवाक्याला अधिकाधिक मजबुती मिळावी, इंग्रजी, सेमी इंग्रजी गुणवत्ता वाढ, अभियांत्रिकी, तांत्रिक सैनिकी, आदिवासी आश्रमशाळा सुरू करून त्यातून रयतेचा विस्तार मोठ्या प्रमाणांत वाढावा.

 

गुणवत्तापूर्ण शिक्षण येथे मिळावे, मुलामुलींची स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करवून घेतली जावी, जुन्या मोडकळीस आलेल्या शाळा खोल्या इमारतींची दुरूस्ती रयत निधी स्थापन करून केली जावी आदी उपाययोजना सुचवून त्याच्या परिपूर्ण अंमलबजावणीसाठी शंकरराव कोल्हे यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आहेत. वयाची 88 वर्षे होऊनही त्यांचा या कामात खंड पडलेला नाही. शताब्दी वर्षात शंकरराव कोल्हे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यांने त्यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील व कॉ. पी. बी. कडू पाटील यांनी नगर जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचे मोठे जाळे निर्माण केले. यात स्व. कॉ. पी. बी कडू पाटील यांचा मोठा वाटा आहे. तसेच त्यांचा वारसा अरुण कडू यांनी पुढे चालविला आहे. कष्टकरी, कामगार, शेतमजूर यांची मुले-मुली शिकावीत, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अरुण कडू यांनी उत्तर विभागीय सल्लागार कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा अनेक वर्ष सांभाळली.

 

या काळात त्यांनी आर्थिक, दुर्बल शाखांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न केले. यात कर्मवीरनिधी, शिक्षणप्रेमी लोकांकडून देणग्या गोळा करून व कमी असेल तेथे स्वत:चा निधी वापरून अनेक शाखांना आर्थिक साहाय्य मिळविण्यात त्यांचा सिहाचा वाटा आहे. कडू यांच्या निवडीचे वृत्त नगर जिल्ह्यात समजताच ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला आहे. तर सात्रळ येथेही त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

LEAVE A REPLY

*