रब्बीची पैसेवारी ५० पैशांहून जास्त

अंतिम पैसेवारी जाहीर; जिल्ह्यातील एकही गाव सवलतीस पात्र नाही

0
नाशिक | दि. १३ प्रतिनिधी – रब्बी हंगामातील ५० पैशांपेक्षा कमी अंतिम पैसेवारी असलेल्या गावांसाठी शासनाने २०१६-२०१७ सालातील रब्बी हंगामातील पैसेवारी जाहीर करत सवलतीही दिल्या आहेत. यात नाशिक जिल्हयातील एकाही गावाचा समावेश नसून १ हजार १८ गावातील पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

राज्यातील रब्बी हंगामातील सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या गावांमध्ये जमीन महसुलात सवलत, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीज देयकात ३३.५ टक्के सूट, परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे आदी उपाययोजना आधीच लागू करण्यात आल्या आहेत.

.रब्बी हंगामातील अंतिम पैसेवारी ५० टक्कयांपेक्षा कमी आलेल्या गावांमध्ये सर्वाधिक दुष्काळी गावे ही पुणे विभागात असून ती १४० आहेत. तर नागपूर विभागातील १६ गावे आहेत. यात नाशिक,अमरावती आणि औरंगाबाद विभागातील एकाही गावाचा समावेश नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या विभागातील गावांना शासनाच्या सवलतींना मुकावे लागणार आहे.

शासनाने रब्बी हंगामातील पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांतील शेतकर्‍यांचे पीककर्ज पुनर्गठन करण्याचे आणि पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश जिल्हा बँकेला दिले आहेत. हंगामातील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या पुणे विभागातील १४० गावांचा सामावेश आहे. रब्बी हंगामात नाशिक विभागातील १ हजार १८ गावांचा समावेश होता.

यात अंतिम पैसेवारीत ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेले एकही गाव आढळून आले नाही. सर्वच गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. नाशिकसारखीच परिस्थिती अमरावती आणि औरंगाबाद विभागात दिसून आली. नागपूरमध्येही १६ गावांतील पैसेवारी ५० पैशांमेक्षा कमी असल्याचे दिसून आले. राज्यातील एकूण १९ हजार ११६ गावांपैकी अवघ्या १५६ गावांतच ही पैसेवारी कमी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या गावांमध्येच केवळ दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने मिळणारे फायदे दिले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

*