नाशिक | दि.१४ प्रतिनिधी- नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ च्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर नाशिक महापालिकेवर पहिल्यांदा भाजपचा झेंडा फडकला आहे. आज महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी यांची आणि उपमहापौरपदी प्रथमेश गिते यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक प्रक्रियेत कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर भानसी व गिते यांनी विरोधकांचे आभार मानले. वचननाम्यातील महत्त्वाचे प्रश्‍न सोडवण्याबरोबर पारदर्शक कारभार करण्याचे आश्‍वासन नवनिर्वाचित महापौर रंजना भानसी यांनी नगरसेवकांना दिले.

नाशिक महापालिकेच्या २०१७ -२०२२ या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ६६ जागा जिंकत बहुमताचा आकडा पार करीत मोठे यश संपादन केले. या निवडणुकीत मागील निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष असलेली मनसेना भुईसपाट झाली, तर राष्ट्रीय पक्ष असलेले कॉंग्रेस व राकॉ.ं यांचे संख्याबळ दोन अंकावरुन एक अंकावर आले.

या एकूणच पार्श्‍वभूमीवर आज विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या सभागृहात झालेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांच्या उमेदवारांनी आश्‍चर्यकारकपणे माघार घेतली. त्यामुळे महापौरपदी रंजना भानसी व उपमहापौरपदी प्रथमेश गिते यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी केली.

यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी महापौर निवास रामायण या ठिकाणी भाजपचा ध्वज फडकावत फटाक्याची आतषबाजी करीत, गुलाल उधळत ढोल ताश्याच्या गजरात मोठा जल्लोष केला. आज महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयातील सभागृहात सकाळी ११ वाजता महापौर निवडणूक प्रक्रियेस पीठासन अधिकारी राधाकृष्णन् बी. यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. ११ वाजता सभागृहात माजी महापौर अशोक मुर्तडक व माजी उपमहापौर गुरमित बग्गा हे दोघेच उपस्थित होते.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीठासन अधिकार्‍यांनी वेळ लक्षात लगेच नगरसेवकांना सभागृहात हजर राहण्याचे आवाहन करीत पाच मिनिटातच निवडणूक प्रक्रिया सुरू केली. नगरसचिव ए. पी. वाघ यांनी निवडणुकीचे नियम सदस्यांना अवगत करुन दिल्यानंतर महापौरपदासाठी  दाखल अर्जाची माहिती पीठासन अधिकार्‍यांना सादर केली. त्यानुसार महापौरपदासाठी आलेल्या अर्जाची माहिती जाहीर करीत पिठासन अधिकार्‍यांनी भाजपच्या भानसी व कॉंग्रेसच्या आशा तडवी यांचे उमेदवारी अर्ज शिल्लक असल्याचे सांगितले.

त्यानंतर अर्ज माघारी घेण्यासाठी १५ मिनिटांंचा वेळ देण्यात आला. या दरम्यान भाजपकडे असलेला बहुमतांचा आकडा पाहता कॉंग्रेस गटनेते शाहु खैरे, राकॉं. गटनेते गजानन शेलार, शिवसेनेचे अजय बोरस्ते, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, गुरमित बग्गा, अशोक मुर्तडक यांनी सभागृहातून बाहेर जाऊन निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात चर्चा केली. सर्वाचे बिनविरोधवर एकमत झाल्यानंतर हे सर्व जण सभागृहात येऊन बसले.

त्यानंतर कॉंग्रेसचे राहुल दिवे यांनी कॉंग्रेसच्या उमेदवार आशा तडवी यांची माघार अर्जावर स्वाक्षरी घेतली. यावेळी महापौरपदाच्या दावेदार भानसी यांनी आपल्या जागेवरुन उठून जाऊन कॉग्रेस गटनेते खैरे यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर आशा तडवी यांचे आभार मानले. तडवी यांनी पीठासन अधिकार्‍यांकडे जाऊन माघारी अर्ज सादर केला. त्यानंतर तडवी यांच्या माघारीनंतर पिठासन अधिकारी यांनी भानसी यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने महापौरपदी भानसी यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

नंतर लगेच उपमहापौरपदाची निवडणूक प्रक्रिया पीठासन अधिकार्‍यांनी सुरू करीत नगरसचिव विभागाकडे दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाचे वाचन केले. यात भाजपचे प्रथमेश गिते व राकॉं. च्या सुषमा पगारे यांचे अर्ज वैध असल्याचे जाहीर करीत पीठासन अधिकार्‍यांनी पुन्हा माघारीसाठी १५ मिनिटांचा वेळ दिला. या दरम्यान पुन्हा राकॉंं.च्या पगारे यांनी आपला माघारी अर्ज पीठासन अधिकारी यांना सादर केला.

त्यानुसार उपमहापौरपदाकरिता गिते यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने प्रथमेश गिते यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे पीठासन अधिकारी यांनी जाहीर केले. या निवडीनंतर नवनिर्वाचित महापौर भानसी व उपमहापौर गिते यांचा राधाकृष्णन् बी. यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर नूतन महापौर व उपमहापौर यांनी आपल्या पदाच्या खचीर्र्वर विराजमान होत विशेष महासभा पुढे सुरू ठेवली. विशेष महासभेवर असलेल्या स्थायी सदस्य निवडीसंदर्भातील विषय महापौर भानसी यांनी तहकूब ठेवला. त्यानंतर महापौरांनी आपल्या निवडीसंदर्भातील भावना व्यक्त केल्यानंतर विशेष महासभेचा समारोप केला.

विकास करणार
पारदर्शी कामकाज करुन शहराचा सर्वांवीगण विकास करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहे. स्मार्ट सिटी करण्याबरोबर स्वच्छता व आरोग्य या विषयांना प्राधान्य देणार आहे. महिला सुरक्षा देखील महत्वाची असून शहरात यासाठी सीसीटिव्ही यंत्रणा लावणार आहे. नाशिककरांच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही. अशी प्रतिक्रीया नवनिर्वाचित उपमहापौर प्रथमेश गिते यांनी दिली.

वडिलांच्या आठवणीने दाटला कंठ…
सभागृहात महापौरपदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर पहिले भाषण महापौर भानसी यांनी आज केले. मालेगांव लोकसभा मतदारसंघातून खासदार व दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून नेतृत्व करणारे कचरुभाऊ राऊत यांची कन्या म्हणून नवनिर्वाचित महापौर रंजना भानसी यांची ओळख नाशिक शहराला आहे. वडील व आईच्या पुण्याईमुळे या पदावर पोहोचता आल्याचे सांगत भानसी यांनी सभागृहात रडू आले. चूल व मूल सांभाळणारी एक गृहिणी म्हणून ओळख असतांना तत्कालीन भाजप नेते बंडोपत जोशी यांनी आपल्याला भाजपत घेऊन राजकारणात आणले. दादासाहेब वडनेरे, गणपत काठे, डॉ. डी. एस. आहेर, विद्यमान आमदार यांच्यामुळे या पदावर पोहोचता आल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

भानसी तिसर्‍या महिला महापौर व भाजपाच्या पहिल्या
नाशिक महापालिकेची स्थापना सन १९८२ मध्ये झाली असली तर याठिकाणी लोकप्रतिनिधींची राजवट १९९२ पासून सुरू झाली. यात दुसर्‍या पंचवार्षिक काळात सन १९९९ – २००२ या काळात पहिल्या महिला महापौर म्हणून तीन वर्ष महापौर राहण्याचा मान डॉ. शोभाताई बच्छाव यांना मिळाला होता. त्यानंतर सन २०१० ते २०१२ या काळात महापौरपदावर विराजमान होण्याचा मान नयना घोलप यांना मिळाला होता. त्यानंतर आता तिसर्‍या महिला महापौर होण्याचा मान भाजपच्या रंजना भानसी यांना मिळाला आहे. सर्वात प्रथम कॉंग्रेस, नंतर शिवसेना आणि आता भाजपला महिला महापौरपदावर संधी मिळाली आहे. तसेच महापालिकेच्या इतिहास भाजपाला प्रथमच सत्ता मिळाली असुन महापौर व उपमहापौर पदाची संधी मिळाली आहे.

किकवी धरणासाठी पाठपुरावा करणार
नाशिक महापालिकेच्या महापौरपदी विराजमान झालेल्या भाजपच्या ज्येष्ठ नरगसेविका रंजना पोपट भानसी यांनी महापौरपदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तळागाळातील कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. पक्षांशी एकनिष्ठ राहिल्यामुळे पक्षाने आपल्याला संधी दिल्याची भावना व्यक्त करताना भानसी म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी नाशिक शहराला दत्तक घेऊन विकास करण्याचा संकल्प केला, मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांना दिलेला शब्द पाळण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असून सर्व पक्षांना सोबत घेऊन विकासकामे केली जाणार आहेत. शहराचा पिण्याचा प्रश्‍न लक्षात घेऊन महापालिकेच्या मालकीचे धरण असावेत म्हणून किकवी धरणासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू.

तसेच घंटागाडी नियमित आणि जास्त फेर्‍या करण्यासाठी प्रयत्न राहणार असून शहराचे क्षेत्रफळ व सफाई कामगारांची संख्या यात मोठी तफावत असल्याने सफाई कामगार वाढविण्यासाठी येणार्‍या काळात प्रयत्न केले जाणार आहे. त्याचबरोबर महापालिकेला निधीची कमतरता भासणार नाही, याकरिता आ. बाळासाहेब सानप यांच्यामार्फत पाठपुरावा केला जाईल. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहराचा विकास केला जाईल, असे नवनिर्वाचित महापौर भानसी यांनी आपल्या पहिल्या भाषणात सांगितले.

अशी झाली निवडणूक प्रक्रिया
* सकाळी ११ वाजता पीठासन अधिकार्‍यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. * ११.०७ वाजता भाजप नगरसेवक सभागृहात * ११.१५ वाजता महापौरपदाची निवड प्रक्रिया सुरू. * ११.२३ वा. सेना, कॉंग्रेस, राकॉं नगरसेवक सभागृहात. * ११.४० वाजता महापौर भानसी यांची निवड जाहीर. * ११.४३ वा. उपमहापौर निवडणूक प्रक्रिया सुरू. * १२.०५ वाजता उपमहापौर गिते यांची निवड जाहीर.

LEAVE A REPLY

*