रंगांची उधळण करण्यासाठी सजली बाजारपेठ

0

नाशिक । दि. 13 प्रतिनिधी – रंगपंचमीनिमित्त शहरातील बाजारपेठा विविध रंगांनी फुलल्या आहेत. रंगांची उधळण करणारी विविध साहित्यांची आवक बाजारात झाली असून ग्राहकांकडून रंग साहित्य खरेदी होऊ लागले आहे.

होळीनंतर येणारे धूलिवंदन व रंगपंचमी (दि.17) हे दोन दिवस रंगांची उधळण करीत नागरिक रंग खेळण्याचा आनंद घेतात. या दिवसांची तयारी म्हणून बाजारामध्ये रंगांची खरेदी करण्यात ग्राहक मग्न आहेत.

शहरातील रविवार कारंजा, बोहोरपट्टी, फूलबाजार, भद्रकाली, दहिपूल चौकातील दुकाने रंगपंचमीच्या विविध साहित्यांनी सजली आहेत. निळ्या, पिवळा, लाल, गुलाबी रंग बाजारात दाखल झाले आहेत. दरम्यान, रंगातील रसायनामुळे डोळ्यांना इजा होण्याचे प्रकार होतात. त्यासाठी काही कंपन्यांनी रसायनविरहित रंगही बाजारात आणले आहेत.

यंदाच्या वर्षी विविध रंगांच्या प्लॅस्टिकच्या नावीन्यपूर्ण पिचकार्‍या बालगोपाळांचे आकर्षण ठरत आहेत. रंगांतील काही घटकांमुळे त्वचेवर परिणाम होतात.

डोक्यात आणि डोळ्यांत रंग गेल्यानंतर अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी नैसर्गिक रंगांची उधळण करावी, असे आवाहन विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत किमतीमध्ये कोणताही फरक नाही. मागच्या वर्षी रंगपंचमीवर दुष्काळाचे सावट होते.

यंदा मात्र परिस्थिती चांगली आहे. जिल्ह्यातील काही भागात धूलिवंदन व काही भागात रंगपंचमीला रंग खेळले जातात.

त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांमध्ये जनजागृती झाल्याने नैसर्गिक रंगांना अधिक मागणी आहे.

LEAVE A REPLY

*