येसोजी महाराज वीर मिरवणूक

0

नाशिक : दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या येसोजी महाराज ऊर्फ दाजीबा वीराची मिरवणूक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात आली. घनकर गल्लीतील तुळजाभवानी मंदिरापासून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती.

घनकर गल्लीमधील मानाचा वीर म्हणून ओळखल्या जाणार्‍या येसोजी महाराज ऊर्फ दाजीबा वीराची मिरवणूक दरवर्षी धूलिवंदनाच्या दिवशी काढण्यात येते. मात्र काही कारणास्तव यंदा धूलिवंदनाच्या दिवशी ही मिरवणूक न काढता ती पाडव्याच्या दिवशी काढण्यात आली. यावेळी महिलांसह पुरुष भाविकांनीही वीराचे दर्शन घेतले. मानाचा येसोजी महाराज यांचा चांदीचा मुखवटा परिधान करून वीराने नृत्य करत मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला.

मिरवणुकीने रामकुंड येथे वीराने पोहोचून गोदापात्रात पाय धुवून परंपरेप्रमाणे वाजतगाजत पुन्हा घनकर लेन येथील मंदिराजवळ प्रस्थान केले. सुमारे दीडशे वर्षे जुन्या प्राचीन परंपरेनुसार येसोजी महाराज वीराच्या मिरवणुकीमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. येसोजी महाराजांना साल्हेर-मुल्हेर किल्ल्यावर वीरगती प्राप्त झाली.

त्यांचा वारसा जतन करण्यासाठी त्यांचे वशंज मोरे कुटुंबियांनी त्यांचा चांदीचा मुखवटा तयार करून वीराची स्थापना केली. मोरे कुटुंबियातील पुरुषांच्या तोंडावर येसोजी महाराजांचा मुखवटा बांधला जातो. तसेच राजेशाही पोषाख चढवला जातो. यावर्षी मिरणुकीत वीराच्या भूमिकेत विशाल मोरे हे होते.

युवकांनी वीरासोबत नृत्य करत घनकर गल्ली, रविवार कारंजा, सराफ बाजारमार्गे रामकुंडावर पोहोचून गोदापात्रात परंपरेनुसार पाय धुतले. मिरवणुकीत संभाजी मोरे, केशव मोरे, दिलीप मोरे, बापू मोरे, माधव मोरे, शरद मोरे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*