युवा पिढीला जखडणारे सापळे?

0
तरुणाईला योग्य मार्गावरून विचलित करणारे, त्यांना अयोग्य वळण लावणारे आणि त्यांच्यातील उर्मी व इच्छा-आकांक्षांना भरकटवणारे सापळे समाजात ठिकठिकाणी तयार होत आहेत. हे सापळे (की सापळे लावणारे?) तरुणाईला आपल्या जाळ्यात अडकवण्यात यशस्वी होत आहेत हे समाजाचे दुर्दैव आहे. सध्या ‘पबजी’ या गेमचे सर्वांना व्यसन लागले आहे. हा खेळ हिंसक तर आहेच;

पण तज्ञांच्या मते हा खेळ खेळताना प्रत्यक्ष संवादाच्या (लाईव्ह चॅट) पर्यायामुळे मुले अनोळखी माणसांच्या संपर्कात येतात. याच खेळामुुळे भरकटलेल्या तरुणाला पोलिसांनी नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात ताब्यात घेतले. तो तरुण ‘एम टेक’ शिकत आहे. मूळचा तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. आपण न्यायडोंगरी येथे कसे आलो याविषयी त्याला काहीही सांगता आलेले नाही. या व्यसानाधीनतेची ही पहिलीच घटना नाही.

जालंदर येथील पंधरा वर्षांच्या मुलाने या खेळासाठी घरातून पन्नास हजार रुपये चोरले. मध्य प्रदेश, छिंदवाडा येथील एक युवक खेळ खेळण्याच्या नादात पाण्याऐवजी अ‍ॅसिड पिऊन गंभीर जखमी झाला. कल्याण येथील एका युवकाने सख्ख्या दाजीचा खून केला. या व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम दिवसेंदिवस वाढत आहेत. समाज माध्यमे आणि स्मार्टफोनने तर कहरच केला आहे. इंटरनेटचा वापर अमर्याद वाढला आहे. तरुणाईची एकाग्रता हरवली आहे. गैरकृत्यांचे प्रमाण वाढत आहे.

सामाजिक विद्वेष पसरवण्यासाठी आणि धर्म व जातींच्या नावाखाली तरुणाईची विचारशक्ती नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा सगळ्या खेळांमुळे तरुणाईच्या आयुष्याचा मात्र खेळ होत आहे. तरुण मुले-मुली केवळ कुटुंबाचेच नव्हे तर देशाचेही आशास्थान असतात. याच तरुणाईच्या बळावर आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न डॉ. कलामांसारख्या द्रष्ट्या माणसांनी पाहिले. ते साध्य होण्याचा उत्तम मार्ग ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी नुकताच सुचवला आहे. ‘भारत बलशाली बनवण्याचे सामर्थ्य देशातील युवा पिढीत आहे.

युवा पिढी विलक्षण हुशार आहे. त्यांनी ठरवले तर संधीचे सोनेच होईल. तथापि त्यासाठी तरुणांनी आपल्या भोवतालच्या नको त्या सापळ्यात अडकून पडू नये’ असा सल्ला माशेलकर यांनी दिला आहे. तो सल्ला युवा पिढीने आणि विशेष करून पालकांनी मनावर घ्यायला हवा. पालकांनी मुलांना वेळ दिला तर मुलांच्या स्वभावातील बदल त्यांच्या लक्षात येतील. चुकीच्या बदलांना वेळीच अटकाव करण्यासाठी प्रयत्न करता येतील. देशाचे, समाजाचे आणि कुटुंबाचे भले होण्यासाठी तरी अशा प्रयत्नांची गरज समाजाला जाणवेल का?

LEAVE A REPLY

*