Type to search

आवर्जून वाचाच जळगाव विशेष लेख

युवकांचं भावविश्व समृध्द करणारं ‘खिडकी बाहेरचं जग’

Share

वाढत्या शहरीकरणामुळे जंगलं, प्राणी, पक्षी नष्ट होत आहेत. त्यांना निसर्गाचे दर्शन दुर्लभ होत आहे. अश्या वातावरणात राहणार्‍या मुलांना गावाकडे नेणारा. त्यांना नद्या, नाले, जंगल, झाडे, डोंगर, दर्‍या आणि पक्ष्यांच्या राज्यात नेणारा, तिथला अनुभव देणारं साहित्य ही काळाची गरज झाली आहे. साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असली तरी बाल आणि युवकांसाठीचं साहित्य मोजकीच मंडळी लिहतात. हा वसा निष्ठेने एक जेष्ठ साहित्यिक खान्देशात चालवित आहेत. मुलांनी खेळावं, बागडावं, आनंदात चिंब भिजावं, जाणिवा आणि संवेदना जिवंत ठेवाव्यात आणि वेळोवेळी माणुसकी दाखवावी असा सल्ला देणारा एक नवा युवा काव्यसंग्रह नुकताच बाजारात दाखल झाला आहे.

शब्दांच्या बागेत, अक्षरांची फुले,
वृद्धांच्या कडेवर, जणू छोटी मुले.
मातृहृदयी शिक्षक प.पू.सानेगुरुजी यांच्या मुले ही देवा घरची फुले या ब्रीदवाक्याशी नाते सांगणार्‍या या ओळी आहेत खान्देशातील जेष्ठ कवी अशोक नीळकंठ सोनवणे (चोपडा) यांच्या खिडकी बाहेरचं जग या युवकांसाठी असलेला काव्यसंग्रहातील. संग्रहाच्या नावाप्रमाणेच सोनवणे यांनी युवकांना चार भिंती पलिकडे असलेल्या जगाची खूप सुंदर ओळख या संग्रहात करुन दिली आहे. विज्ञानाची प्रगती, औद्योगिक क्रांती विकसाकडील आपली वाटचाल यामुळे मुलांना निसर्ग, त्यातील प्राणी, पक्षी, नद्या, नाले दुर्मिळ झाली आहेत. चार भिंतीआडच्या शाळा त्यांना आनंददायी न वाटता कैदखाने वाटू लागल्या आहेत. अश्या मुलांना ते बाहेर पडण्याची साद घालत आहेत. निसर्गाचं निरीक्षण करायला, त्यातील परस्पर संबंध जोखायला आणि त्यांच्यातील भावबंध उलगडायला सांगत आहेत. मुलं, फुलं, आई आणि झाड यांच्यातील अनुबंध मांडताना ते म्हणतात…..

मांडीवरती मुले आईच्या,
तशी झाडावरती फुले.
कुणी गोमय कुणी सावळा,
कळी कुणाची खुले.

निसर्गातल्या अनेकविध किमया कोण करतो? असे अनेक प्रश्न कवी युवकांपुढे उभे करतो. त्याची उत्तरे त्यानेच निसर्गात शोधावीत असं सूचक विधानही करतो.
तूच होतो वारा नेतो पतंग खेचून
वेचतात गारा पोरी परकर खोचून
तुझ्या फुंकरीने येते कळी उमलून,
उलगुज वाजविशी उंच साळीतून.

फळा, वर्ग आणि धडा जेव्हा मुलांना रटाळ वाटतील आणि युवकांची उत्सुकता ताणली गेली तर त्यांनाच खिडकी बाहेरचं जग खुणावेल हा त्यांचा कयास असा शब्दबध्द होतो.
खिडकी बाहेरचे जग,
मला खुणावते,
वर्ग तोच फळा तोच
आणि तोच धडा,
काहीही यातले आता
नकोसे वाटते.

निसर्गात गेलात म्हणजे तो तुमच्याशी बोलेल. सवंगड्यांनाही बोलवून घेईल. एक नवा संवाद सुरु होईल. असे कवीला वाटते.
वनराईतील झाड सांगते,
निट ऐकरे मुला.
सखे सवंगडी घेवून ये तू,
ये सहलीला मुला.

कवीची शब्दांशी चांगलीच गट्टी जमली आहे. लडिवाळ शब्दात ते निसर्गाचं सुंदर शब्दचित्र रेखाटतात. त्यांच्या कवितेतून निसर्ग डोळ्यासमोर उभा ठाकतो. मलमली हिरवळ, राखाडी डोंगर, केळीचं पान, रानफूल, उस, तांबडं आभाळ यातून रंगांच्या विविध छटा एकमेकांत हरवतात.
मंदिर भगवे तिरावरती,
वाकून आपुले स्वरुप पाहे.
रेघ धुराची येते कोठून,
पक्षी करडा शोधीत आहे.

पाऊस हा लहरी वागायला लागलाय असं कवीला वाटतं. त्याचं बरसणं अवकाळी झाली आहे. तो कुठे भेटेल हे सांगणं कठीण होवून बसलंय. तश्यात तो कवीला भेटतो. त्याचं मस्तीत राहणं, माणसात येणं, वरमून जाणं त्याला जिवंत करतं. प्रवाही करतं. ही कवीची यशस्वीता आहे.
पाऊस मला वस्तीत भेटला,
आपल्याच तो मस्तीत भेटला.
मी ही त्याला मुळी न हटकले,
त्याने ही मज न ओळखले.

गुढीपाडवा म्हणजे चैतन्याचा, नववर्षाचा सण. या सणाला सारेच संकल्प करतात. कवी मात्र हार, कंगणांची रुढी परंपरा जपत असतांंना वह्यापुस्तकांच्या पुजनाचा अभिनव संकल्प करतो. ज्ञानाची गुढी उभारून युवकांना शिक्षणाचा महामंत्र देतो.
चला पुजूया वह्या पुस्तके,
पाटीवरच्या सरस्वतीने.
नव वर्षाचे संकल्प गोड,
बांधू गुढीस हार कंगणे.

हळूवार शब्दातून सारा निसर्ग, परीसर फिरवून आणण्याचं कसब कवीकडे आहे. हे फिरणं निव्वळ उंडारणं नाही. ते समृध्द करणारं आहे. अभ्यासाला लावून प्रगती साधणारं आहे. मायबाप, राष्ट्राचं नांव मोठं करायला लावणारा संस्कार पेरणारं आहे. माध्यमांच्या भडीमारात हरवलेल्या युवकाला नवे भान देणारं आहे. तरुणाईला दिशादर्शन करणारं आहे. यात काय नाही ? गणेशाची वंदना, संतांची शिकवण, शब्दांची बाग, आईची अंगाई, सुटीचा धमाल, रविवारचा थरार, गांवाची कथा. युवकांच्या स्वप्नाळू वृत्तीला जोजवणारं आणि संस्काराची शिंपडण करणारं खिडकी बाहेरचं जग अबालवृध्दांना आवडेल असंच आहे. अशोक नि. सोनवणे यांच्या शब्दांना प्रासादिकता आहे.

वाचकाला गुंतवून ठेवण्याची जादू आहे. सहज, सुलभ शब्द रचना, अकृत्रिमता आणि कृतीयक्ततेचा ध्यास ही सोनवणे यांच्या कवितेची ओळख आहे. तिच्यात ठायी ठायी खेळकरपणा, कल्पनारम्यता दडली आहे. या पुर्वी त्यांनी बालनाट्य, बाल कथा-कविता विपूल लेखन केलं आहे. बंडू जातो त्यांच्या वंशा या बालनाटिकेसाठी त्यांना राज्य शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचे नील अंश, माय आणि इतर कविता, रुप-अरुपाचे हे काव्यसंग्रह महाराष्ट्रभर गाजले. हल्ली बालवाड्मयाकडे गंभीरतेने फार थोडे साहित्यिक पाहताय. त्यात विजया वाड, निशिगंधा वाड, अशोक सोनवणे, एकनाथ आव्हाड, आबा महाजन, संजय वाघ यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. यांनी बाल साहित्य रंजक, रोचक आणि कलात्मक करुन ते सर्वदूर पोहचवले आहे. संस्कृती प्रकाशनाने प्रकाशीत केलेल्या या संग्रहाचे मुखपृष्ठ धनंजय गोवर्धन यांनी रेखाटले आहे. युवकांना संग्रहाच्या आत डोकावायला भाग पाडेल इतकं ते सुंदर आणि उत्कंठावर्धक झालं आहे.

आतील सप्तरंगी सजावट आणि चित्रे ही या संग्रहाची श्रीमंती आहे. किरण पाटील आणि सौ. भाग्यश्री पाटील यांनी मुलांच्या भावविश्वात रंग-रेषांची जोड देवून बोलकं केलं आहे. बालक, युवक आणि प्रौढांनाही गुंतवून ठेवण्याचं सामर्थ्य त्यात आहे. या चित्रांमुळे कवितेतले शब्द थेट हृदयात पोहचतात. 37 पृष्ठांच्या या संग्रहाची किंमत 80 रु. असून या दिवाळीत हा संग्रह घराघरात दिसला तर नवल वाटायला नको.

फटाक्यांच्या एका पॅकपेक्षाही कमी किमतीत हा संस्कार आणि आनंदाचा खजिना आपली दिवाळी आनंदाने प्रकाशमान केल्याशिवाय राहणार नाही. अशोक सोनवणे (94239 36552) यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस आभाळभर शुभेच्छा व्यक्त करुन मी हा लेखन प्रपंच थांबवतो.
प्रा.बी.एन.चौधरी, मो. 9423492593

देवरुप, नेताजी रोड, धरणगांव जि.जळगांव.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!