Type to search

ब्लॉग

युतीत ‘कशाला उद्याची बात?’

Share

स्वबळावर लढल्यास शिवसेनेतील अनेक आमदार फुटू शकतात. मात्र अन्य पक्षांतून मोठे इनकमिंग झाले तर पर्यायी उमेदवार मिळणार आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना स्वबळावर लढून स्वतःची ताकद वाढवून राज्यात एक हाती सत्ता मिळवण्याचे धाडस करणार की नाही ते काही दिवसांतच स्पष्ट होईल. मात्र युती करायची किंवा नाही, याची फार मोठी शक्ती त्यांच्या हाती नाही. भाजपने गेल्यावेळेप्रमाणे यावेळी केले असे दाखवले जाईल, मग ‘आमचं ठरलंय’च्या फॉर्म्युल्यानुसार लुटूपुटूची भांडणे, त्वेषाची भाषणे आणि ‘चितभी मेरी पटभी मेरी’चा प्रयोग केला जाईल. याची खबरबात विरोधकांना असेल का?

राज्यात सध्या वरुणराजाने ब-यापैकी कृपा केली असून पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ बहुतांश दूर झाला आहे. शेतीसाठी पाण्याचा प्रश्न काही अंशी असला तरी आगामी विधानसभा निवडणुकांचे भरघोस मतांचे पीक राज्यातील शहरी भागात असलेल्या 165 तर निमशहरी भागात असलेल्या 35 म्हणजे 200 मतदारसंघातून घेण्याचा इरादा सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचा आहे. त्याशिवाय शेतकरी जसे नांगरणीसाठी भाड्याने वळू किंवा रेडे घेतात, त्याच धर्तीवर अन्य पक्षातून आयारामांचे उदंड इनकमिंग सुरू असल्याने त्यांच्यात निवडून येण्याची क्षमता आणि सोबत राहण्याचे निकष यावरून ‘कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’ म्हणजे ‘कुणी सेनेत जा, कुणी भाजपत या’ असे सुरू झाले आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात अस्तित्वात येणार्‍या राज्य विधानसभेत सध्याच्या विरोधी पक्षात बसलेले किमान 60 ते 70 जण सत्ताधारी पक्षाचे सदस्य झाल्याचे पहायला मिळाल्यास नवल ते काय?

पण मग इतके सारेजण समोर निघाले आहेत तर निवडणुका लढायच्या कुणा विरोधात? हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि मग ‘आमचं ठरलंय’ म्हटल्यानुसार मागच्या पाच वर्षांत सत्तेवर राहून विरोधकांची भूमिका मतदारांच्या वचनाशी शिवबंधन असल्याने निभावल्याचे सांगणार्‍या सेनापतीनी भाजप विरोधात लढायचे असे चित्र हळूहळू निर्माण होत आहे. ‘मुख्यमंत्री कुणाचा’, या स्पर्धेत भाजप-सेना यांच्या युतीमध्ये दरी पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. कालपर्यंत फिफ्टी फिफ्टी म्हणताना आता कट्टी-बट्टीचे राजकारण पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. विरोधीपक्षातून येणार्‍यांचे 50-50 वाटप करून घ्यायचे आणि स्वबळावर निवडणुका लढायच्या जेणेकरून समोर आव्हान देण्यासाठी येणार्‍या उरल्या सुरल्यांचेही पानीपत होईल! असा या मागचा कयास असल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील विधानसभेत भाजप-सेना वेगळे लढले होते. त्यावेळी भाजपकडून शिवसेनेच्या परंपरागत जागांवर तिकीट देण्यात आलेल्यांपैकी पाच हजारांहून कमी मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येत आहे. अशा जवळपास 30 जागांवर भाजपने हमखास निवडून येऊ शकणारे उमेदवार शोधण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या 64 जागा अशा आहेत, ज्या ठिकाणी भाजप उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर अगदी 500 ते 1000 मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत. अशा उमेदवारांना उमेदवारी जवळपास निश्चित करण्याबाबत एकमत झाले आहे. यातील अनेक जागा युतीमध्ये शिवसेनेला यापूर्वी देण्यात आल्या होत्या. मात्र, मागील वेळी युती नसताना तेथे भाजप उमेदवारांनी दुसर्‍या क्रमांकाची मते घेतली. युतीचा 50-50 चा फॉर्म्युला अंतिम झाला तेव्हा भाजपच्या आताच्या 122 जागांमध्ये अधिकच्या फक्त 18 ते 20 जागांची भर पडली. मात्र मागच्या निवडणुकीच्या निकालांचा आधार घेतला तर किमान 60 ते 70 जागांवर भाजपचे कमळ स्वबळावर फुलण्याची क्षमता आहे म्हणजे भाजपच्या आताच्या 123 मध्ये 60 जागा वाढल्या तर पक्षाला स्वबळावर 183 पेक्षा जास्त जागा घेत सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ‘हीच संधी असल्याचे मानून संघटनात्मक कौश्यल्य असणार्‍या अशा व्यक्तीला प्रदेशाध्यक्ष पदावर आणले आहे’ असे या सूत्रांचे मत आहे. त्यात नव्याने अन्य पक्षातून इनकमिंग झाल्याने बळ वाढेल आणि युती करण्याची गरज राहणार नाही. अशा परिस्थितीत भाजप स्वबळावर लढून ‘शत-प्रतिशत’ राज्यात एक हाती सत्ता मिळवण्याचे धाडस करणार नसेल तरच नवल! ही वेळ शिवसेनेसोबत राहून युती धर्माचे पालन करण्याची नाही. आता नक्की काय होणार आहे, ते काही दिवसांतच स्पष्ट होईल.

परंतु, पूर्वी अफजलखानच्या या चालीबाबत टीका केलेल्या मातोश्रीवरदेखील याची पूर्वकल्पना आहे. तेथे सध्या विधानसभा मतदारसंघनिहाय तालुकाप्रमुखांच्या बैठका सुरू आहेत, या बैठकांमध्ये युती झाली तर आणि नाही झाली तर काय करायचे? असा सवाल पक्षप्रमुखांनी विचारला आहे. शिवसेनेला 144 जागा भाजपकडून अपेक्षित आहेत. तसेच सत्तेतला समसमान वाटा, अडीच वर्षे मुख्यमंत्री पदही शिवसेनेला हवे आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांना अध्यक्षपदी आणल्यानंतर सेनेत शंकेची पाल चुकचूकली आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्राकांत पाटील, सरोज पांडे यांच्या वक्तव्यांमुळे शिवसेनेत नाराजी आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून भाजपला झालेले मतदान आणि भाजपच्या बालेकिल्ल्यातून शिवसेनेला झालेले मतदान यांची आकडेवारी समोर ठेऊन शिवसेनेची रणनीती सुरू आहे. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवत महाराष्ट्रात शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. नेता म्हणून त्यांना महाराष्ट्रात प्रस्थापित होण्याची हीच योग्य वेळ आहे आणि स्वबळावर शंभरपेक्षा जागा येण्याची स्थिती असेल तर भविष्यात त्यांना राजकारणात स्थिरावणे सुलभ होणार आहे. त्यामुळे त्यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगावातून जनआशीर्वादाची सुरुवात केली आहे. या यात्रेत आदित्य ठाकरेंवरच फक्त भर देण्यात आला. गेल्या 15 दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांना शिवसेनेने पक्षात घेतले आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसचे गणेश नाईक, अवधूत तटकरे, कालीदास कोळंबकर, अस्लम शेख यांच्यासारखे किमान 20 बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत. यासाठी 2014 च्या विधानसभेत 10 हजारांहून कमी मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांची यादी करण्यात येत आहे.

2014 मध्ये 30 जागांवर शिवसेना कमी फरकाने पराभूत झाली होती. अशा 30 मतदारसंघ आणि विद्यमान 63 अशा एकूण शंभर हमखास निवडून येण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांची शिवसेनेकडून चाचपणी सुरू आहे. युतीचा 50-50 चा फॉर्म्युला अंतिम झालाच तर शिवसेनेच्या आताच्या 63 जागांमध्ये अधिकच्या फक्त 81 जागांची भर पडेल. 2014 मध्ये शिवसेना एकूण 30 जागांवर दोन नंबरवर होती, आता त्या 30 जागांवर शिवसेनेचा डोळा आहे. युती झाल्यास सध्याचे 63 आमदार आणि 2014 ला नंबर दोनवर असलेले उमेदवार असे महाराष्ट्रात 90 जागांवर भगवा फडकू शकतो. स्वबळावर लढल्यास शिवसेनेतील अनेक आमदार फुटू शकतात. मात्र, अन्य पक्षातून मोठे इनकमिंग झाले तर पर्यायी उमेदवार मिळणार आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना स्वबळावर लढून स्वतःची ताकद वाढवून राज्यात एक हाती सत्ता मिळवण्याचे धाडस करणार की नाही? ते काही दिवसांतच स्पष्ट होईल. मात्र युती करायची किंवा नाही, याची फार मोठी शक्ती त्यांच्या हाती नाही. भाजपने मागच्यासारखे यावेळी केले असे दाखवले जाईल, मग ‘आमचं ठरलंय’च्या फॉर्म्युलानुसार लुटूपुटूची भांडणे, त्वेषाची भाषणे आणि ‘चितभी मेरी पटभी मेरी’चा प्रयोग केला जाईल, याची खबरबात सध्या सर्वार्थांने वंचित असलेल्या आणि ‘अवसान गळाले तरी अवसानघातकीपणा न सोडणार्‍या विरोधकांना नाही.’

‘सर्वभक्षी शेळी’ जसे सारे हिरवे खाऊन जाते, तसे शिवसेना आणि भाजप मिळून सर्व 288 जागा घेण्याची ही खेळी मागच्या काळात कोणत्याच राजकीय पक्षाने खेळली नसेल. त्यात वंचित आघाडीला टीम बी-1 आणि 2 असे दोन तुकड्यांत खेळवून काँग्रेसमुक्ती साधण्याचा अनोखा सारीपाट मांडला जात आहे, पण सध्याच्या सत्ताधार्‍यांचे वैशिष्ट्य हेच आहे की, त्यांना परिस्थिती अनुकूल आहे. पाऊस पाणी चांगले झाले आहे तर ‘कशाला उद्याची बात, बघ उडून चालली रात!’ म्हणत त्यांना राजकीय डाव साधावा लागणार आहे. ‘कालाय तस्मै नम:’ दुसरे काय!
– किशोर आपटे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!