या रे या, सारे या… चला जमुनि रंगवूया! नाशिक

0

नाशिक | दि. ४ प्रतिनिधी- भिंत रंगवणे म्हणजे लहान मुलांसाठी आनंदाची गोष्ट असते. संधी मिळाली तर मोठी माणसेही अगदी मनापासून भिंत रंगवून आपल्यातील चित्रकलेला उजाळा देतात. नाशिकमधील लहानथोर अशा सर्वांनाच भिंत रंगवण्याची संधी येत्या ९ मार्च रोजी उपलब्ध होणार आहे. ‘देशदूत’तर्फे ‘चला रंगवूया नाशिक’ हा स्पर्धात्मक उपक्रम यंदाही राबवला जात आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था आणि सिका केमिकल्स या स्पर्धेचे सहआयोजक आहेत.

गुरुवारी (दि.९) गंगापूररोडवरील केटीएमएम महाविद्यालयाबाहेरील भिंत चित्र रंगविण्यासाठी उपलब्ध असेल. जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा आयोजित होणार्‍या या भिंत रंगवा स्पर्धेला विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता शुभारंभ होईल.

या स्पर्धेत नाशिकमधील चित्रकार, कलावंत, विद्यार्थी, विविध संस्था आणि संघटना, व्यावसायिक, उद्योजक असे सर्व स्तरातील लोक सहभागी होणार आहेत. लहान मुलांचा भिंत रंगविण्याकडे असलेला विशेष ओढा लक्षात घेता, त्यांच्यासाठी रंगविण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेत यशस्वी होणार्‍यांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.

या स्पर्धेत वैयिक्तिक किंवा समुहाने सहभागी होता येईल. स्पर्धेसाठी मुक्त प्रवेश असून प्रशांत अहिरे (मोबाईल क्रमांक : ९७६७१३४५४६) यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करता येईल. तसेच ऑनलाईन स्वरूपातही देशदूतच्या संकेतस्थळावर नावनोंदणीची सोय उपलब्ध आहे. मागील वर्षी गोल्फ क्लब आणि माई लेले श्रवण विद्यालय येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यावेळी नाशिककरांनी अपूर्व उत्साहात सहभाग नोंदविला होता.

LEAVE A REPLY

*