याला शिक्षण कसे म्हणावे?

0
मुलांना शाळेत पाठवून केवळ पुस्तकी ज्ञान पढवले तर मुलांच्या डोक्यात भरपूर ज्ञान कोंबल्याचे समाधानच फक्त मिळेल. तथापि शिक्षणामुळे बुद्धी, विचारशक्ती आणि तर्कशक्तीचा विकास होणार नसेल तर असे शिक्षण तरी कितीसे अर्थपूर्ण ठरेल? अशी शंका ‘देशदूत’ने उपस्थित केली होती.

दुर्दैवाने काही घटनांनी त्या शंकेला आणखी बळकटी मिळाली आहे. ट्रॉम्बे येथील एक उच्चशिक्षित पती-पत्नी भोंदूबाबाच्या अत्याचारांना बळी पडले. पती शास्त्रज्ञ आहेत. या दाम्पत्याचा मुलगा कॅन्सरपीडित आहे असे निदान झाले. यामुळे आई-वडील भावनिकदृष्ट्या कोलमडले. याचा फायदा एका भोंदूबाबाने घेतला.

धार्मिक उपचार करून मुलाचा कॅन्सर बरा करण्याची बतावणी त्याने केली. उपचारांच्या नावाखाली भोंदूबाबाने मुलाच्या आईवर बलात्कार केला. त्या घटनेचा व्हिडीओ बनवला. तो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार पैसे उकळले. दरम्यानच्या काळात मुलाचे निधन झाले तरी बाबाचे त्रास देणे सुरूच राहिले. शेवटी वैतागून पत्नीने हा घटनाक्रम पतीला सांगितला. मग प्रकरण पोलिसात गेले. कोणताही भोंदूबाबा कॅन्सर बरा करू शकत नाही. तरी एक शास्त्रज्ञ भोंदूबाबाकडे कसा गेला? आईवर बलात्कार करणे हा मुलाच्या आजारावरचा उपचार कसा?

हा साधा प्रश्न या शास्त्रज्ञ पत्नीलाही पडू नये? दुसरी घटना औरंगाबादची! एका कुटुंबाने आपल्या डॉक्टर सुनेचा हुंड्यासाठी छळ केला. तिच्या मनाविरुद्ध तिला दोनदा गर्भपात करायला लावला. अखेर वैतागून विवाहितेने पोलिसात तक्रार दाखल केली. तथापि डॉक्टर महिलेने हा अन्याय दीड-दोन वर्षे का सहन करावा? मनाविरुद्ध गर्भपात करायला ती कशी तयार झाली? शिकलेली असूनही अन्यायाविरुद्ध लढायची धमक ती का दाखवू शकली नाही? तिसरा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील सैलानीबाबांच्या उरुसात घडला. दरवर्षी होळीनंतर तो उरूस पाच दिवस सुरू असतो.

सुया, बिब्बे, काळी बाहुली आणि खिळे ठोकलेले नारळ मनोरुग्णांच्या अंगावर ओवाळून बाबांच्या उरुसातील होळीत टाकले तर त्यांचा आजार बरा होतो, असा भ्रम त्या परिसरातील समाजात आढळतो. त्या समजापोटी पहिल्याच दिवशी दहा ट्रक भरतील एवढ्या नारळांची होळी केली गेली. नारळे जाळून मनोविकार कसे बरे होतील हा साधा प्रश्न कोणालाही पडू नये? माणसांची विचारशक्ती बोथट होणार असेल व त्यांना प्रश्नच पडणार नसतील तर त्यांच्या शिक्षणाचा उपयोग तरी काय?

ते बिनतक्रार अन्याय सहन करणार्‍यांना सुशिक्षित तरी कसे म्हणावे? सध्याच्या पुस्तकी शिक्षणाचा फोलपणा तर यातून स्पष्ट होतोच; पण राज्यातील शिक्षण पद्धतीचे व शिक्षण खात्याचे वाभाडे काढणारे असे गैरप्रकार या ‘पुढारलेल्या’ राज्यातून कधी हद्दपार होणार?

LEAVE A REPLY

*