Type to search

ब्लॉग

‘यात्रां’ची मात्रा लागू पडणार?

Share

राजकीय पक्षांच्या यात्रांचा आता सुकाळ सुरू झाला आहे. लालकृष्ण अडवाणी यांना राजकीय यात्रांचे जनक मानले जात असले तरी प्रत्यक्षात हा मान एन. टी. रामाराव यांना जातो. देश, प्रांतांच्या समस्या समजून घेण्यासाठी यात्रा काढल्या जात. आता त्यांना प्रचार यात्रांचे स्वरूप आले आहे. राजकीय पक्षांच्या या यात्रांना मतयात्रांचे स्वरूप आले आहे. येत्या निवडणुकीत यात्रांची मात्रा चालणार का?

महात्मा गांधी, विनोबा भावे यांनी देश पायी पिंजून काढला होता. त्यांचा उद्देश वेगळा होता. विनोबांची भूदान चळवळ होती. यात्रेत गर्दी होते, तिथे अनेक लोक भेटत असतात. देशाच्या समस्या समजून घेण्यासाठी यात्रा काढण्याचा एक काळ होता. तिथे राजकीय लाभाचा आणि मतांचा विचार केला जात नव्हता. एन. टी. रामाराव यांनी रथयात्रा काढली. त्यानंतर यात्रांचे स्वरूप बदलले. भाजपचे भीष्माचार्य म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या लालकृष्ण अडवाणी यांच्या रथाचे सारथ्य प्रमोद महाजन यांच्याकडे होते. राजकीयदृष्ट्या यशस्वी झालेली ती पहिली पंचतारांकित यात्रा. आता समाज माध्यमांचे युग असतानाही राजकीय पक्षांना राजकीय यात्रा काढाव्या लागतात. सत्ताधारी असो की विरोधक; दोघांचाही स्वतःच्या कामांवर विश्वास नाही आणि संसदीय माध्यमातून, दैनंदिन लोकसंपर्कातून आपली कामे लोकापर्यंत पोहोचवू, याचा भरवसा राहिलेला नाही. त्यामुळे निवडणुकीच्या काळात अशा यात्रा काढण्याची वेळ आली आहे. त्याचा दुसरा एक अर्थ असा की, संबंधित मतदारसंघातले आमदार आणि कार्यकर्ते अकार्यक्षम आहेत म्हणून थेट राज्यप्रमुखांना यात्रा काढत आपल्या पक्षाचे काम सांगत फिरण्याची वेळ आली आहे. चांगल्या कामाचा गवगवा करताना विरोधक कसे अकार्यक्षम आहेत, ते कसे भ्रष्ट आहेत आणि आपण कसे धुतल्या तांदळासारखे आहोत हे सांगण्यासाठीही या राजकीय यात्रांचा उपयोग होत आहे. महाजनादेश, शिवस्वराज्य, जनआशीर्वाद, माऊली, आक्रोश अशी काहीही नावे दिली जात असली तरी राजकीय पक्षांचा या यात्रांमागचा उद्देश राजकीय प्रतिसाद मिळवण्याचा आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. विधानसभा निवडणुकीचा फड जसा जवळ येत आहे तशी महायात्रांची मांदियाळी सुरू झाली आहे. भाजपची महाजनादेश यात्रा, शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा, या दोघांना प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची शिवराज्य यात्रा, या यात्रांमुळे राज्यातील जनता यापुढील काळात यात्रा सोहळ्यात न्हाऊन निघणार आहे. महाजनादेश यात्रेचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे, जनआशीर्वाद यात्रेची सूत्रे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे तर शिवराज्य यात्रेचे नेतृत्व अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे करीत आहेत. राज्यातील विविध राजकीय पक्षांचे वारकरी आपापल्या दिंड्या-पताका घेऊन या सोहळ्यात सामील होतील. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील महापुरामुळे तूर्तास या यात्रा स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र काही दिवसांनंतर त्या लगेच सुरू होतील यात शंका नाही.

भाजप-शिवसेनेमध्ये सध्या विरोधी पक्षातल्या मातब्बरांना फोडण्याची एक जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. या दोन मित्रपक्षांतील मतभेदास मुख्यमंत्रिपदाचा सुप्त संघर्ष कारणीभूत आहे. ज्या पक्षाचे आमदार जास्त तोच मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असे सूत्र एकदा ठरल्यानंतर आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील, याची व्यूहरचना करण्यात भाजप आणि शिवसेनेची नेतेमंडळी दंग आहेत. केवळ सरकार चालवण्यासाठी हे दोन पक्ष एकत्र आहेत, एकत्र राहतील. अन्यथा गेल्या पाच वर्षांमध्ये सत्तेत राहून शिवसेनेने कडव्या विरोधी पक्षाचीच भूमिका बजावली आहे. म्हणूनच दोन्ही पक्षांची नेतेमंडळी विरोधी पक्षातल्या ताकदवान नेत्यांना चुचकारत आहेत. मुख्यमंत्रिपद गमावल्याचे शल्य उद्धव ठाकरे यांना निश्चित असणार. या सत्ता स्पर्धेतूनच शिवसेनेने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. सध्या शिवसेनेत ‘आदित्य ट्रेंड’ जोरात आहे. कारण शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून आदित्य ठाकरे यांना पुढे आणल्यास भाजपला आपण चांगली टक्कर देऊ शकतो, असा मोठा मतप्रवाह शिवसेनेत आहे. मते मागण्यासाठी नव्हे तर ही तीर्थयात्रा असल्याचे उद्गार आदित्य यांनी काढले आहेत. ज्यांनी मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी मतदान केले नाही त्यांची मने जिंकण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जनआशीर्वाद यात्रेला जोडूनच शिवसेनेची आणखी एक यात्रा निघाली आहे. तिचे नाव माऊली यात्रा असे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांमध्ये भावोजीचे स्थान मिळवलेल्या आदेश बांदेकर यांच्यावर या माऊली यात्रेची जबाबदारी आहे. आदेश बांदेकर यांच्या लोकप्रियतेचा फायदा उठवायचा आणि महिलांमध्ये आपली मतपेढी अधिक बळकट करायची, असा शिवसेनेचा या यात्रेमागचा हेतू आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी शिवसेना आणि भाजपचाही मुख्यमंत्री आहे, असे सांगत आदित्य यांना मुख्यमंत्रिपदासाठी प्रोजेक्ट करण्याच्या प्रयत्नांमधली हवा काढून घेतली आहे. आदित्य यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी दाखवून शिवसेनेला कायम दुय्यम भूमिकाच स्वीकारावी लागेल, असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून दिला आहे. गेल्या 15 वर्षांमध्ये काँग्रेस आघाडीने जे केले नाही ते युती सरकारने पाच वर्षांमध्ये करून दाखवले, याचा ताळेबंद जनतेसमोर मांडण्यासाठी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महाजनादेश यात्रेला 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली. या यात्रांना प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेदेखील शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे.

आभाळ फाटले, त्याला कुठे कुठे ठिगळ लावणार, अशी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था झाली आहे. अनेक आमदारांनी पक्ष सोडला आहे. अजून कितीजण पक्ष सोडणार, याचा ताळमेळ नाही. अशा अवस्थेत पक्षातल्या कार्यकर्त्यांना उमेद देण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे आणि खासदार उदयनराजे यांच्यासारख्या वलंयाकित नेतृत्वावर शिवस्वराज्य यात्रेची जबाबदारी सोपवून शरद पवार यांनी पक्षाला सावरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काश्मीरच्या प्रश्नाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फायदा भाजप आणि शिवसेनेला होणार आहे. अशा परिस्थितीतही विरोधकांनी हार न मानता उभे राहणे आवश्यक आहे. पवार यांनी त्या दिशेने पाऊल टाकले असले तरी काँग्रेस मात्र सावरायला तयार नाही. काँग्रेस नेतृत्वहीन झाली आहे. आघाडीतील इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे.

त्यातच सध्या यात्राकाळ आहे. निवडणुकीच्या तोंडावर विधानसभेच्या दर्शनासाठी लगबग सुरू असून भाजप-शिवसेनेच्या गाडीचे तिकीट मिळते का, याची चाचपणी विरोधी पक्षातले नेते करत आहेत. यात्राकाळात भाजप-शिवसेनेने ‘जादा गाड्यांची सोय आणि विशेष पॅकेज’चे नियोजन केले आहे. प्रवाशांची गर्दी हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पात्र प्रवाशांनाच एसटीत प्रवेश देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना जाहीर करावे लागले, हे इथे लक्षात घ्यायला हवे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना सर्वच राजकीय पक्षांना अचानक पुतना मावशीचे प्रेम दाटून आले आहे. श्रावणाला सुरुवात झाली आहे. तसेही श्रावण महिन्यात यात्रांना महत्त्व असते. हे लक्षात घेता सर्वच पक्षांनी आता जनता जनार्दनाला मतांचे साकडे घालण्यासाठी राजकीय यात्रा सुरू केल्या आहेत. यात्रा काढणे गैर नाही. यात्रेदरम्यान सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा जनतेला सांगण्यातही काही गैर नाही; पण हे करत असताना वारंवार विरोधी पक्ष किती नालायक होता आणि त्यांनी काहीच कसे केले नाही, असे सांगत आत्मप्रौढी मिरवणे गैर आहे. राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री केवळ मंत्रिमंडळाला नाही तर जनतेला जबाबदार असतात. जनता हीच आपली मालक आहे, असे भाजपसह सर्वच राजकीय पक्ष वारंवार सांगतात; पण प्रत्यक्षात असे काहीच दिसत नाही.

एकीकडे आपल्या पक्षाची कामगिरी आणि ध्येयधोरणे सांगताना मुख्यमंत्र्यांना जनतेच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. धनगर समाजाच्या आरक्षणाचे काय झाले? नागपूरसह विदर्भात सातत्याने आंदोलन करत असलेल्या हलबांचा प्रश्न सोडवण्याच्या आश्वासनाचे नेमके काय झाले? दुष्काळ निवारणात राज्यातले प्रशासन कमी का पडले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जनतेला हवी आहेत. मराठा समाजाला आरक्षण दिल्याने आपल्यावर अन्याय झाल्याची भावना खुल्या प्रवर्गात बळावली आहे. मुख्यमंत्र्यांची यात्रा सुरू होत असताना नागपुरात ब्राह्मण समाज संघटनेने पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत घंटानाद आंदोलनाची घोषणा केली.

महाराष्ट्र सरकारच्या मेगा नोकर भरतीचे काय झाले हे माहिती नसले तरी भाजपमध्ये मात्र राष्ट्रवादीसह इतर पक्षांमधल्या आमदारांची मेगा भरती सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीत आमदारकी शाबूत ठेवण्यासाठी दोन्ही काँग्रेसमधल्या प्रस्थापित कुटुंबातल्या नेत्यांनी सोयीनुसार सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करण्याचा धडाका लावला आहे. अशा वातावरणात राज्यातल्या युवक-युवतींना तसेच मतदारांना आकर्षित करणार्‍या डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीच्या गेल्या पाच वर्षांमधल्या कारभाराचा पंचनामा करणार आहे. अलीकडच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून अनेक प्रस्थापित नेते बाहेर पडून सत्ताधार्‍यांच्या आश्रयाला जात आहेत. अशा काळात कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकून पुन्हा नव्या दमाने आगामी निवडणुकीस सामोरे जाण्यासाठी पक्षाच्या फौजफाट्यात उत्साह आणि ऊर्जा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.

राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही भाजपच्या कथित शेतकरीविरोधी धोरणाचा पाढा वाचण्यासाठी यात्रेची घोषणा केली आहे. या घडामोडींमुळे राज्यातले वातावरण ढवळून निघणार आहे. काहीही करून राज्यात आपली सत्ता आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत. याचाच एक भाग म्हणून राजकीय पक्षांनी आता लोकांमध्ये समरस होण्यासाठी जनयात्रांचे आयोजन केले आहे. राजकीय पक्षांना पाच वर्षांमध्ये अनेक आमदार, खासदार निवडून दिले. मात्र त्यांना आपल्या मतदारसंघांमध्ये कामे करता आली नाहीत. ही निष्क्रियता लपवण्यासाठीच या यात्रा आहेत, अशी टीका होत आहे. जनतेला भुलवण्यासाठी यात्रा काढल्या जात आहेत. खरेच जनतेच्या प्रश्नांची जाण असेल तर एसी गाड्यांऐवजी एसटी महामंडळाच्या बस किंवा वडापच्या गाडीतून प्रवास करून राजकीय पुढार्‍यांनी जनतेशी संवाद साधावा, असा सूर ऐकायला मिळत आहे.
– अजय तिवारी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!