यंदा तीन हजार 689 हेक्टरवर फळबाग लागवड

0

उद्दिष्टपूर्तीसाठी कृषी विभाग लाभार्थ्यांच्या शोधात

अहमदनगर (प्रतिनिधी) – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गत वर्षाचा लक्ष्यांक मिळून जिल्ह्यात 2017-18 या वर्षात तीन हजार 689 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. तात्काळ कार्यक्रम राबविण्याबाबत विभागीय कृषी सहसंचालकांनी गेल्या 9 मे रोजी निर्देश दिले आहेत.
फळबाग लागवड उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृषी साहाय्यकांना प्रत्येक 10 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी लाभार्थी निवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. वास्तविक एप्रिल-मे दरम्यान वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदकाम पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्याप वृक्षलागवड कार्यक्रम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जून ते नोव्हेंबर दरम्यान प्रत्यक्षात लागवड होणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

फळबाग लागवड कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा शासनाचा हेतू साध्य होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरुवातीपासून लक्ष घालणे गरजे असताना संबंधित विभाग वरिष्ठ कार्यालयाचे पत्र प्राप्त झाल्यावर कार्यवाही सुरु करते हे विशेष.

सध्या आपल्याला दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी कृषी सहायक वृक्ष लागवड करण्यास इच्छुक असणार्‍या लाभार्थी शेतकर्‍यांच्या शोधात असल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी तालुकानिहाय प्रत्येक 480 हेक्टरप्रमाणे जिल्ह्यासाठी एकूण 6 हजार 720 हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवडीचे टार्गेट होते. त्यापैकी केवळ 2 हजार 146 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

टार्गेट पूर्ण करण्याचा कृषी खात्याचा दावा
जिल्ह्याला दिलेल्या लक्ष्यांकानुसार तालुका कृषी अधिकार्‍यांना फळपीकनिहाय लक्ष्यांकाचे वाटप करण्यात येत आहे. यापूर्वीच खड्डे पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, अगामी दिवसांत कामाला अधिक गती देण्यात येऊन दिलेला लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा दावा जिल्हा कृषी अधीक्षक पंडित लोणारे यांनी केला आहे. 

गतवर्षी 2146 कामे पूर्ण
सन 2016-17 मध्ये एकूण 6 हजार 720 पैकी केवळ 2 हजार 146 कामे पूर्ण करण्यात कृषी विभागाला यश आले. या परिस्थितीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत राज्यात नगर जिल्ह्याचे काम आघाडीवर असल्याचा दावा संबंधित अधिकार्‍यांकडून केला जात आहे. तालुकानिहाय (हेक्टर) पूर्ण कामे: नगर-63, पारनेर-53, पाथर्डी- 172, कर्जत-122, जामखेड-460, श्रीगोंदा-156, श्रीरामपूर-46, राहुरी-72, नेवासा-129, शेवगाव-416, संगमनेर-242, अकोले-96, कोपरगाव-51, राहाता- 60 आदी.

अहवाल पाठविण्याचे आयुक्तालयाचे आदेश
जिल्ह्याला दिलेल्या लक्ष्यांकानुसार जिल्हा कृषी अधीक्षकांनी आपल्या अधिनस्त तालुका कृषी अधिकार्‍यांना फळपीकनिहाय लक्ष्यांकाचे वाटप करून साप्ताहिक व मासिक प्रगती अहवाल आयुक्तालयास सादर करण्याच्या सूचना विभागीय कृषी सहसंचालकांनी संबंधित जिल्ह्याच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

*