यंदा उष्मा वाढणार दुपारी बाहेर पडणे टाळा ; आपत्ती व्यवस्थापन विभागाचा सल्ला

0

नाशिक : उन्हाळ्याच्या काळात दुपारी 12 ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे आणि शारीरिक श्रमाची कामे करणे टाळा, असा सल्ला राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. यंदाचा उन्हाळा उष्णतेच्या लाटेचा राहणार असल्याने शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याच्या शक्यतेमुळे ही खबरदारी घेण्याच्या सूचना या विभागाने दिल्या आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून होणारे परिणाम टाळण्यासाठी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी याबाबत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना परिपत्रक काढून उपाययोजना करण्याचे सुचवले आहे. उन्हाळ्याच्या काळात काय करावे आणि काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दुपारी 12 ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे करणे टाळावे तसेच या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.

गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळ्याची सुरुवात लवकर झाली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये याबाबत उपाययोजना करण्याचे या परिपत्रकात सुचवण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा नियंत्रण कक्ष, महापालिका नियंत्रण कक्ष, विभागीय स्तरावरील कक्ष, स्थानिक संस्था आणि आरोग्य विभाग यांनी एकत्रित येऊन याबाबत काम करावे. या विभागांबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्था यांनाही या कामात सहभागी करून घेण्याचे परिपत्रकात म्हटले आहे. उन्हाळ्याच्या काळात काय करावे याबरोबरच काय करू नये हेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*