यंदाचा पावसाचा अंदाज ९६ टक्के; पण जलव्यवस्थापनाची काळजी हवीच

0

यंदा सामान्य म्हणजेच 96 टक्के पर्जन्यमान राहील, असे आयएमडीने म्हटले आहे. मात्र अल निनो सक्रिय होण्याची शक्यता नजरेआड करून चालणार नाही.

त्यामुळेच आतापासूनच जलनियोजनाबाबत आणि जलव्यवस्थापनाबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.

सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच नैऋत्य मोसमी पावसाचे म्हणजेच मान्सूनचे (monsoon) वेध लागतात. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी समाधानकारक मान्सून आवश्यक असतो.

पर्जन्यमान चांगले राहिले तर पीकपाणी चांगले राहते आणि जनता आनंदाने राहते. त्यामुळेच पावसाला ‘वरुणराजा’ म्हटले जाते.

उकाडा, थंडी यामधील चढउतारांचा सामना करण्यासाठी कूलर, हिटर आदी भौतिक गोष्टींची रेलचेल आहे, परंतु मान्सून रुसला तर त्यासाठीची पर्यायी व्यवस्था नाही.

त्यामुळेच मान्सूनागमनाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेले असते.

यंदाच्या वर्षी दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 96 टक्के मान्सून बरसेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आपण गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर 2013 मध्ये सर्वाधिक म्हणजे 106 टक्के पाऊस पडलेला दिसून येतो. याउलट सर्वात कमी पावसाचे वर्ष होते 2015.

यावर्षी केवळ 86 टक्केच पाऊस पडल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यापूर्वीच्या वर्षी म्हणजेच 2014 मध्येही सरासरीच्या तुलनेत 88 टक्केच पाऊस पडलेला होता. या लागोपाठ दोन पर्जन्यतुटीच्या वर्षांमुळे अभूतपूर्व दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

त्यामुळे गतवर्षीच्या मान्सूनवर खूप मोठी भिस्त होती. गतवर्षी सरासरीच्या 97 टक्के पर्जन्यमान झाल्यामुळे देशभरात समाधानाचे वातावरण राहिले. या पार्श्वभूमीवर यंदाच्या अंदाजाकडे पाहणे आवश्यक आहे. यंदा 96 टक्के सरी बरसण्याचा अंदाज आहे.

याचा अर्थ यंदाचा मान्सून सामान्य राहणार आहे. 96 ते 104 टक्के पाऊस पडल्यास त्याला ‘सामान्य’ म्हटले जाते. 105 ते 110 टक्के पाऊस पडल्यास ‘सामान्याहून अधिक’ म्हटले जाते, तर 90 टक्के किंवा त्याहून कमी पाऊस पडल्यास तुटीचे किंवा दुष्काळी वर्ष मानले जाते.

तशी परिस्थिती यंदा उद्भवणार नाही, हे स्पष्ट आहे. वर्तवलेल्या अंदाजामध्ये आणि प्रत्यक्ष पावसामध्ये साधारणपणे पाच टक्क्यांचा फरक  असण्याची शक्यता गृहीत धरली जाते. त्यानुसार सरासरीच्या 91 टक्के पाऊस झाला तरीही दुष्काळी परिस्थिती असणार नाही.

भारतीय उपखंडातील मान्सूनवर परिणाम करणारा एक प्रमुख घटक म्हणजे अल निनो. तो सध्या न्यूट्रल किंवा सामान्य स्थितीत आहे.

सध्याच्या अंदाजानुसार जुलै-ऑगस्टमध्ये तो सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसे झाले तर मान्सूनवर काहीसा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत निम्मा मान्सून झालेला असेल. त्यामुळे अल निनोविषयी सध्या तरी फारशी काळजी करण्याचे कारण नाही.

तसेच जूनपर्यंत येणार्‍या सुधारित अंदाजामधून अल निनोबाबतचे चित्र स्पष्ट होईल. कदाचित तो सक्रिय झाला नाही तर 96 टक्क्यांहूनही अधिक पाऊस पडू शकतो. त्यामुळे आताचा मान्सूनचा अंदाज हा दिलासादायकच म्हणावा लागेल.

वास्तविक पाहता गतवर्षीच्या मान्सूनच्या वेळी अल निनो सामान्य स्थितीकडून ला निना स्थितीकडे सरकला होता. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्याची ही स्थिती कायम होती. मात्र ती टिकली नाही. आता तो सामान्य स्थितीत आहे. ला निना स्थिती असती तर सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान झाले असते. मात्र अल निनोच्या सामान्य स्थितीतही समाधानकारक मान्सून बरसतो, हे मागील काळात दिसून आले आहे. तशीच स्थिती यंदा राहील असे आताच्या अंदाजावरून दिसत आहे. तरीही सामान्य पावसाची शक्यता आणि अल निनो सक्रिय होण्याच्या शक्यता विचारात घेता आपण आतापासूनच खबरदारी घेणे आवश्यक आहे.

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज हा संपूर्ण देशासाठीचा असला तरी आपल्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागातील पर्जन्यमानाचा अंदाज महत्त्वाचा आहे. हा अंदाज जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये अल निनोची स्थिती स्पष्ट झाल्यानंतर नेमकेपणाने येईल.

महाराष्ट्रात विदर्भामध्ये सरासरीच्या 96 टक्क्यांपर्यंत पाऊस पडतो. मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात पर्जन्यमान कमी असते. तसेच पर्जन्यातील चढउतारही अधिक असतात. त्यामुळे आपण आतापासूनच जलव्यवस्थापनासाठीच्या उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक आहे.

हा अंदाज दीर्घकालीन नियोजनासाठी आहे. विशेषतः धरणांतील पाणीसाठा, पाणीपुरवठा यासाठी आहे. तो शेतकर्‍यांसाठी नाही. कारण शेतीमध्ये एकूण पर्जन्यमानापेक्षाही पिकांसाठी पेरणीपासून काढणीपर्यंतच्या विविध टप्प्यांवर कशा प्रकारे पाऊस पडतो हे महत्त्वाचे असते.

बरेचदा एकूण पाऊसमान चांगले राहिले किंवा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडला पण मान्सूनचे आगमन लांबले किंवा मध्ये खंड पडले तर त्याचा शेतीला फटका बसतो. याउलट वेळेवर पाऊस पडला आणि त्यातील खंड, चढउतार कमी राहिले तर तो शेतीसाठी अधिक अनुकूल ठरतो आणि पिकांची बरकत होते.

अलीकडील काळात शेततळी, जलयुक्त शिवार यामुळे एखाद्या वेळी पावसात खंड पडला तरी या जलसाठ्यांच्या माध्यमातून पिके जगवता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी दीर्घकालीन अंदाजांची माहिती जरूर घ्यावी, मात्र त्यापेक्षा पुढील काळात अल्पकाळासाठी वर्तवण्यात येणार्‍या अंदाजांवर अधिक लक्ष ठेवून राहावे.

मुख्य म्हणजे पावसाचे वितरण कसे राहणार आहे याकडे लक्ष द्यावे. आजघडीला मान्सून आगमन वेळेवर होईल की नाही, त्यामध्ये खंड पडतील की नाही हे सांगता येत नाही. कारण त्या अंदाजासाठी आवश्यक असणारे घटक मे महिन्यामधील परिस्थितीवर अवलंबून असतात.

त्यामुळे 15 मेनंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकेल. सध्या तापमानाचा पारा वाढल्यामुळे मान्सूनचे आगमन लवकर होईल अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. मात्र त्यांना कोणताही शास्रीय आधार नाही. कारण मान्सूनच्या आगमनाचा अंदाज बांधताना तपासल्या जाणार्‍या गोष्टींमध्ये सध्याचे तापमान हा घटकच नाहीये.

त्यामुळे मान्सूनच्या आगमनास विलंबही होऊ शकतो किंवा तो लवकरही येऊ शकतो. त्याविषयी पुढील महिन्याच्या उत्तरार्धातच नेमकेपणाने माहिती समजू शकेल.

त्यामुळे अशा अशास्रीय माहितीवर अवलंबून न राहणेच इष्ट ठरेल.  शेतकर्‍यांनीही हवामान खात्याकडून वर्तवण्यात येणार्‍या अंदाजांची आणि इतर सूचनांची माहिती वेळोवेळी करून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासन यंत्रणेनेही ही सर्व माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. योग्य वेळी पूर्वसूचना मिळत गेल्यास अपुर्‍या अथवा अतिरिक्त पावसामुळे होणारे, खंड पडल्यामुळे होणारे नुकसान काही प्रमाणात टाळता येऊ शकते.

  • डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी

LEAVE A REPLY

*