म्हसरूळमध्ये घरफोडी करणारे गजाआड ; जागरुक नागरिक, सतर्क पोलिसिंगमधून कारवाई तडीस

0

पंचवटी : म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभातनगर परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून दोघा चोरट्यांनी प्रवेश करीत मौल्यवान ऐवज लंपास केला. मात्र याचदरम्यान परिसरातील जागरुक नागरिकांना या घरात चोरटे घुसल्याची चाहूल लागल्याने त्यांनी त्वरित पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर म्हसरूळ पोलिसांनी कुठलाही विलंब न करता घटनास्थळी दाखल होत पलायन करणार्‍या दोघा सराईत चोरट्यांचा पाठलाग करून जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात म्हसरूळ पोलिसांना यश आले आहे.

जागरुक नागरिक व सतर्क पोलिसिंगमधून सराईत चोरट्यांना जेरबंद करणे शक्य झाले आहे. रविवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास म्हसरूळमधील प्रभातनगर येथील गोकुळधाम अपार्टमेंटमधील स्वप्नील अनिल बेदरकर यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा कटावणीच्या सहाय्याने तोडून दोन सराईत गुन्हेगारांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 6 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन करीत असताना त्यांच्या शेजारी राहणार्‍यांना याची चाहूल लागली.

त्यांनी त्वरित म्हसरूळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सावळा, पोलीस हवालदार भुसाळ, शिरसाठ, बीट मार्शल नंदू जाधव, राजू लोखंडे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, विधाते, माळोदे, गावित तसेच कांगणे व रोकडे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, यावेळी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित राजेश वाघमारे (30, रा. ता.लोणार, जि. बुलडाणा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दुसरा संशयित हा ओमकारनगरच्या दिशेने पळून गेला. यादरम्यान पोलिसांनी ओमकारनगर परिसर पिंजून काढला असता येथील साईशिल्प अपार्टमेंटच्या गच्चीवर पोलिसांना संशयित हालचाली लक्षात आल्याने पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला.

या संशयिताने गच्चीवरील दाराची कडी लावून घेतल्याने पोलिसांनी शिडीच्या सहाय्याने गच्चीवर चढून दुसरा संशयित नामदेव अंबोरे (25, रा.मोजा इंगोले, ता.रिसोड, जि.वाशिम) यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेला ऐवज तसेच लोखंडी कटावणी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, संशयित राजेश वाघमारे व नामदेव अंबोरे यांच्यावर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

*