Type to search

म्हणून धोनीने घातला मैदानावर राडा

क्रीडा

म्हणून धोनीने घातला मैदानावर राडा

Share
जयपूर । जयपूरच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला. अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सवर त्यांनी 4 गडी राखून मात केली. राजस्थानने विजयासाठी दिलेले 152 धावांचे आव्हान चेन्नईने अखेरच्या षटकात पूर्ण करत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईकडून अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी यांनी अर्धशतकी खेळी केल्या. तर मिचेल सँटनरने शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत सामना जिंकवून दिला. मात्र त्या आधी शेवटच्या षटकात एक वेगळाच राडा झाला.

अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 18 धावांची आवश्यकता असताना धोनी बाद झाला. तो माघारी परतल्यानंतर मधल्या चेंडूवर पंचांनी नो-बॉलचा इशारा केला. मात्र यानंतर दुसरे पंच ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी तो चेंडू नो-बॉल नसल्याचं जाहीर केलं. यावेळी मैदानात दोन्ही पंचांमध्ये प्रचंड सावळागोंधळ पहायला मिळाला. हा सर्व प्रकार पाहून डग-आऊटमध्ये बसलेल्या धोनीचा संयम सुटला आणि तो चक्क मैदानात आला आणि पंचांशी वाद घालू लागला. या वर्तणुकीसाठी धोनीला सामन्याच्या 50 टक्के मानधन दंड ठोठवण्यात आले.

या प्रकाराबाबत बोलताना उडघ चे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले की धोनी हा शांत खेळाडू आहे. पण ज्या पद्धतीने नो-बॉल प्रकरण मैदानावरील पंचांकडून हाताळण्यात आले आणि निर्णय बदलून नो-बॉल रद्द करण्यात आला, त्यामुळे धोनीचा संयम सुटला. तो मैदानावर राडा करण्याच्या उद्देशाने गेला नव्हता, तर नक्की गोंधळ काय आहे हे समजून घेण्यासाठी गेला होता. सहसा तो असा वागत नाही, पण त्यावेळी सामना अत्यंत नाजूक अवस्थेत होता, त्यामुळे धोनीने तेथे जाणे पसंत केले. याबाबत त्याला दीर्घकाळ प्रश्न विचारण्यात येतील याची त्याला आणि आम्हाला कल्पना आहे, असे फ्लेमिंग यांनी स्पष्ट केले.

धोनीने जे केले ते योग्य की अयोग्य? ते मला सांगता येणार नाही. पण मैदानावर नो-बॉल प्रकरणी जे काही घडले, ते घडायला नको होते. ते घडले नसते तर खूप काही टाळता आले असते, असेही फ्लेमिंगने स्पष्ट केले. दरम्यान, राजस्थानच्या सर्व गोलंदाजांनी आज टिच्चून मारा केला. मराठमोळ्या धवल कुलकर्णीने पहिल्याच षटकात शेन वॉटसनचा त्रिफळा उडवत राजस्थानला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, केदार जाधव हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतल्यामुळे चेन्नईचा संघ अडचणीत सापडला होता.

मात्र यानंतर अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. या भागीदारीमुळे काहीकाळासाठी चेन्नईचा संघ सामन्यात वरचढ होता. रायुडूने यादरम्यान आपलं अर्धशतक पूर्ण करत, राजस्थानच्या गोटात चिंतेच वातावरणही पसरवलं. अखेरच्या षटकांत रायुडू-धोनी माघारी परतल्यामुळे सामना दोलायमान झाला होता. त्यातच, अखेरच्या षटकात पंचांनी दिलेल्या निर्णयामुळे काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण अखेरीस चेन्नईच्या तळातल्या फलंदाजांनी विजयासाठीचं आव्हान पूर्ण करत राजस्थानवर मात केली.

राजस्थानकडून धवल कुलकर्णी, बेन स्टोक्स, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. चेन्नईचा एक फलंदाज धावबाद झाला. त्याआधी,चेन्नईच्या गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या मार्‍याच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने यजमान राजस्थान रॉयल्सला 151 धावांवर रोखण्यात यश मिळवले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा
महेंद्रसिंह धोनीचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!