मोबाईल कंपन्यांना सहा दिवसांचा अल्टिमेटम

महापालिकेच्या थकबाकी कारवाईमुळे सेवा ठप्प होण्याची शक्यता

0

नाशिक | दि.४ प्रतिनिधी- शहरातील सुमारे २०० च्या वर मोबाईल कंपन्यांनी महापालिकेची परवानगी न घेता मोबाईल टॉवर उभारणी केली आहे. या टॉवर विरुद्ध आता महापालिका विविध कर विभागाने नोटिसा पाठवत कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या १० मार्चपर्यंत कर न भरल्यास संबंधित कंपन्यांचे टॉवर सील करण्याचा अल्टिमेटम महापालिकेने दिला आहे.

नाशिक शहरातील सहा विभागांत अनेक इमारती, मोकळ्या जागांवर अनेक मोबाईल कंपन्यांनी मोबाईल टॉवरची उभारणी केली आहे. या टॉवर उभारणीसाठी महापालिकेचे काही नियम असून त्यांचे पालन झालेले नाही. त्याचबरोबर टॉवर उभारणी करताना संबंधित बिल्डिंगमधील नागरिकांची सहमती आवश्यक असून ही प्रक्रिया पार पाडण्यात आलेली नाही. यासंदर्भात महापालिकेने नियमांचे पालन करून रितसर कर भरण्यासाठी संबंधित मोबाईल टॉवर कंपन्यांना नोटिसा पाठवल्या होत्या.

मात्र याविरुद्ध मोबाईल कंपन्यांनी महापालिकेच्या जप्तीच्या प्रक्रियेला व करवसुली नोटिसीला स्थगिती मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यात कारवाईचा अधिकार महापालिकेला नाही, असा मुद्दा मोबाईल कंपन्यांनी न्यायालयात उपस्थित केला होता. मात्र यावर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने संबंधित कंपन्यांना कर भरण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महपाालिकेने मोबाईल कंपन्यांविरुद्ध कारवाईस प्रारंभ केला आहे.

याच पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून आजपासून नोटिसा पाठवत आता शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या मोबाईल टॉवरच्या माध्यमातून महापालिकेला सुमारे ४ कोटींचा महसूल मिळणार असून त्याकरिता कारवाई केली जाणार आहे. यात महापालिकेच्या करांचा भरणा न केल्यास येत्या ११ मार्चपासून शहरातील मोबाईल टॉवर सील करण्यात येणार आहेत. याकरिता महापालिका विविध कर विभागाने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे शहरातील मोबाईल सेवा ठप्प किंवा विसस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॉवर सील करणार : उपायुक्त
शहरात मोबाईल टॉवर उभारणार्‍या जीटीएल इन्फ्रा, रिलायन्स, टी-२४ या कंपन्यांकडे जवळपास सुमारे ४ कोटींची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी शनिवारी संबंधित कंपन्यांना अंतिम नोटिसा देण्यात आल्या आहेत.

येत्या गुरुवार (दि.१०) पर्यंत थकबाकी न भरल्यास शुक्रवार (दि.११) पासून थेट मोबाईल टॉवर्स सील करण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.

लाखो ग्राहकांना बसणार फटका
कर थकबाकीच्या कारणास्तव महापालिकेने मोबाईल टॉवर सील केल्यानंतर ग्राहकांची मोबाईल सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. कंपन्यांच्या कारभाराचा फटका शहरातील लाखो ग्राहकांना बसणार आहे.

महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी केलेल्या तयारीवरून कंपन्यांनी थकबाकी न भरल्यास शहरात मोबाईल सेवा बंद होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*