मैत्रीपूर्ण वातावरण झाल्यास कायद्यांची गरज नाही – गटकळ

0

नाशिक : विविध समाज घटकांमध्ये मैत्री व सदभावनापूर्ण वातावरण निर्माण झाल्यास कायद्यांची गरज भासणार नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. संतोष गटकळ यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रादेशिक उपायुक्त कार्यालय आणि समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने नागरी हक्क संरक्षण आणि अनुसुचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम या विषयावरील एक दिवशीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन देशदूतचे संचालक संपादक विश्वास देवकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी उपायुक्त काशिनाथ गवळे, ज्येष्ठ विधीज्ञ संतोष गटकळ, डॉ. सचिन परब, राजयोग मेडीटेशन केंद्राच्या वासंती दिदी, सहायक आयुक्त समाजकल्याण प्राची वाजे, विविध विभागांचे अधिकारी, पोलिस अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अ‍ॅड. गटकळ म्हणाले, राज्य घटनेने समानतेचे तत्व लागू करण्यासाठी, सगळ्यांना सार्वजनिक स्त्रोतांचा व ठिकाणांचा निर्भयतेने वापर करता यावा, यासाठी मार्गदर्शक तत्वांचा मार्ग दाखवला आहे.

पण समाजातील परस्परविरोधी विचारधारांमुळे आंदोलने-मोर्चे यामाध्यमातून कायद्यांना विरोध होतो. न्याय तत्वांची अंमलबजावणी करताना योग्य विचारांची आवश्यकता निर्माण होते.

यासाठी घटनेनुसार सुरवातीस नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 निर्माण करण्यात आला, त्याला मर्यादा असल्याने नंतर अनुसुचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 लागू करण्यात आला आहे. यात 2015 मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. पण समाज घटकांतील मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होणे हा याचा उद्देश आहे.

या सगळ्यांचा वापर करून समाजातील अनुसुचित जाती जमातीच्या मागास, दुर्बल घटकांसाठी विकासाचे मार्ग खुले झाले पाहिजेत. यासाठी कायद्याचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा गटकळ यांनी व्यक्त केली. संपादक देवकर म्हणाले, समाजात मन-मनातील भेदभाव व दुर्बलांवरील अन्याय दिसतो आहे. पण आपल्या राष्ट्राला अडीच हजार वर्षांपासून समानतेच्या विचारांची परंपरा आहे.

ते विचार छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या कार्यातून आतापर्यंत आले आहेत. याच्या अंमलबजावणीनेच समाजात परिवर्तन घडून येईल असे ते म्हणाले. यावेळी राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याने वासंतीदिदी यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

*