कोपर्डी प्रकरण : मृत्यूपूर्व चौकशीआधीच पोस्टमार्टम, व्हिसेरा देखील गायब

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – कोपर्डी प्रकरणातील पीडितेचा मृतदेह रुग्णालयात आणल्यानंतर दोन पंचांच्या समक्ष या मृतदेहाची तपासणी करून मुत्यूपूर्व पंचनामा करणे कायद्याने बंधनकारक होते. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात तसे केलेले नाही. आधी सकाळी 11 च्या सुमारास शवविच्छेदन आणि त्यानंतर दीड वाजता पंचनामा केला.
पोलिसांनी सर्वप्रथम पंचनामा करणे आवश्यक होते, असा युक्तीवाद आरोपी संतोष भवाळचे वकील अ‍ॅड. खोपडे यांनी केला. त्यामुळे मृत्यूचे कारण काय आहे, याची माहिती समोर आली नाही. पोलीस व डॉक्टर यांचा हा बेजाबादारपणाचा कळस आहे. मृत्यूचे मूळ कारण शोधण्यासाठी व्हिसेरा देखील राखून ठेवलेला नाही. तो गायब केला आहे. त्यामुळे या प्रकरणात सर्व घटना बनावट असून खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली असल्याचा युक्तीवाद अ‍ॅड. खोपडे यांनी केला.
मंगळवारी (दि.31) दुपारनंतर दुसरा आरोपी भवाळच्यावतीने अ‍ॅड. खोपडे व अ‍ॅड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी युक्तीवाद केला. घटनास्थळी पीडितेच्या अंगावर जे कपडे होते. ते जप्त केले नाहीत. आजीने त्यांची नऊवारी साडी पीडितेच्या अंगावर टाकली होती. तीही जप्त नाही. पीडित रुग्णालयात आणताना तिच्या आईच्या मांडीवर तिचे डोके होते. त्यावेळी आईच्या साडीवर देखील रक्ताचे डाग असावेत. ती साडी देखील जप्त करण्यात आली नाही.
त्यामुळे हा कपड्यांचा खेळ संशयास्पद आहे. पीडितेला ज्यावेळी रुग्णालयात दाखल केले, तेव्हा तिचे शरीर पूर्ण स्वच्छ केलेले होते, असे डॉक्टारांच्या जबाबात आहे. त्यामुळे हा सर्व घटनाक्रम बनावट असल्याचा युक्तीवाद खोपडे यांनी केला.
घटनास्थळावर आरोपीची गाडी जप्त करण्यात आली. मात्र, कागदपत्रांचा आधार घेता लक्षात येते की, ही गाडी 14 जुलैला नगरमधील शोरुममध्ये असल्याचे समोर येते. पीडितेच्या अंगावरील जखमांमध्ये माती व छोटेछोटे खडे नाहीत. त्यामुळे पोलिसांनी सर्व घटना बनावट केल्याचा आरोप अ‍ॅड. खोपडे यांनी केला. आज या खटल्याची सुनावणी नियमित सुुरू राहणार आहे.

इंट्रेस्टेड विटनेस –
पीडितेच्या मैत्रीणीला न्यायालयाचे समन्स नसताना तिची साक्ष घेण्यात आली. त्यामुळे ती इंट्रेस्टेड विटनेस ठरली आहे. पहिल्या वेळी तिघांनी पीडितेची छेडछाड केल्याचे तिने पाहिले होते. त्यात तारीख सांगण्यात आली नाही. त्यानंतर 13 जुलै रोजी अत्याचाराची घटना घडली. मात्र 14 जुलैनंतर ही मैत्रीण पीडितेच्या घरी होती. तरीदेखील तिने वाच्यता केली नाही. घटनेनंतर अन्य चौघांचे जबाब घेण्यात आले. तेव्हा तिने छेडछाडीचे अचानक जबाब दिले. यापूर्वी छेडछाडीचा प्रकार कोणाला सांगितला होता का? असे विचारले असता ती म्हणाली, हा प्रकार वडिलांना सांगितला होता. मात्र तिच्या जबाबत वडिलांचा कोठेही उल्लेख नाही. या विसंगतीमुळे मैत्रिणीचा जबाब देखील इंट्रेस्टेड विटनेस बनला आहे.

घटनेनंतर पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी ती मृत होती. हे कोणाच्याही जबाबात नाही. ती घटनास्थळीच मयत झाली की, रुग्णालयात आणतांना किंवा रुग्णालयात असताना हे डॉक्टरांना देखील सांगता आले नाही. तिचा गळा दाबून मृत्यू झाला असे डॉक्टर म्हणतात. मात्र, तोंडातून फेस नाही, चेहरा सुजलेला नाही, जीभ अकुंचन पावलेली नाही, गळ्याच्या अंतर्भागात जखमा नाहीत, उजव्या बाजूस रक्त साठलेले नाही. त्यामुळे तिचा घटनास्थळी मृत्यू झाला असा कोणताही पुरावा नाही. मग तिचा मृत्यू झाला कधी असा संशयित प्रश्न अ‍ॅड. विजयालक्ष्मी यांनी युक्तीवादात उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

*