मृत्युदर घटतोय; पण?

0
कर्करोगाचा विळखा कमालीच्या गतीने वाढत चालला असला तरी 1991 पासून आतापर्यंत कर्करोगाच्या मृत्युदरात 23 टक्के घट नोंदवण्यात आली आहे. सद्यस्थितीत 3.2 कोटी लोक कर्करोगाला मात देऊन सर्वसाधारण जीवन जगत आहेत. कर्करोग नियंत्रणात आणण्यासाठी विकसनशील देशांमध्ये या रोगाच्या तपासणीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवण्याची गरज आहे.

जगभरातील वैज्ञानिक कर्करोगावरील आजारावर प्रभावी उपचार शोधण्याचे सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्याचाच परिणाम असा की गेल्या चार दशकांमध्ये कर्करोगावर मात करणार्‍या लोकांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. जिनिव्हा विद्यापीठ आणि स्वित्झर्लंडमधील बासेल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी असा विषाणू तयार केला आहे ज्यामुळे रोगप्रतिकारक्षमता अधिक सक्रिय होते आणि कर्करोगाचे विषाणू नष्ट होण्यास मदत होते. लंडनमधल्या इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चच्या वैज्ञानिकांनी अंडाशयाच्या कर्करोगावर प्रभावी औषध तयार केले आहे. सद्यस्थितीत 3.2 कोटी लोक कर्करोगाला मात देऊन सर्वसाधारण जीवन जगत आहेत.

भारताचा विचार करता इथे एकूण वार्षिक मृत्यूंमध्ये 6 टक्के मृत्यू कर्करोगामुळे होतात. आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 3.5 लाख लोकांचा मृत्यू कर्करोगामुळे होतो. कर्करोगाने मृत्यू होण्याच्या सर्वाधिक घटना उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये घडल्या आहेत. पण गेल्या काही वर्षांत कर्करोगामुळे होणार्‍या मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. भारताबाबत विचार करायचा तर कर्करोगाची काही प्रमुख कारणे आहेत. त्यात निरक्षरता, कुपोषण, गरिबी, व्यसनाधिनता कमी वयातील विवाह, सततची बाळंतपणे आणि अनारोग्य यांचा समावेश आहे. या दिशेने सुधारणा करण्यासाठी पावले उचलली तर अधिक चांगले परिणाम दिूसन येतील.

तज्ञांच्या मते कर्करोगावरील उपचारांचे पर्याय तीन प्रकारे वापरता येतील. त्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे जागतिक संघटनेला विकसनशील देशांमध्ये कर्करोगाच्या तपासणीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवण्यासाठी मदत केली पाहिजे. त्याअंतर्गत रेडिओथेरपीची मशीन उपलब्ध करण्याबरोबरच भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेप्रमाणे सर्वसामान्य लोकांसाठी पायाभूत आरोग्य विमा योजना राबवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. काही तज्ञांच्या मते दरवर्षी कर्करोगाच्या उपचारांमध्ये जगातील तीनशे-चारशे अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली गेली तर मृत्यूची संख्या निम्म्याने कमी होईल.

सर्व्हायकल आणि स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त महिलांच्या वेळीच पॅपस्मीअर आणि मॅमोग्रॅम या चाचण्या केल्या तर त्यावर त्वरित उपचार करता येणे शक्य होईल आणि या आजारापासून त्यांची मुक्तता होऊ शकते. आयएआरसीनुसार उत्तम उपचार होण्याच्या शक्यतेमध्ये पाच रुग्णांपैकी चार विकसनशील देशातील असतील. दुर्दैवाची गोष्ट अशी कर्करोगाने पीडित रुग्णांमध्ये विशेषतः स्त्री रुग्णांमध्ये या आजाराविषयी जागृतीचा अभाव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर योग्य वेळी उपचार होत नाहीत. पण चांगली गोष्ट अशी की, 2016-2018 सालादरम्यान ‘वी कॅन आय कॅन’ही थीम निर्धारित केली गेली ज्याचा उद्देश प्रत्येक व्यक्तीकडून वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर जागतिक स्तरावर कर्करोगाला रोखण्याच्या दिशेने प्रयत्न केले जातील. या थीमअंतर्गत लोक आपली जीवनशैली आरोग्यदायी ठेवतील. कुटुंब व समाजात जागृती निर्माण करून कर्करोगाला थोपवणे आणि त्यापासून बचाव करण्याच्या दिशेने महत्त्वाचे योगदान देतील.

गेल्यावर्षी अमेरिकन कॅन्सर सोसायटी आणि प्रतिष्ठित मेडिकल जर्नल लान्सेट यांनी एक दावा केला होता की, 2030 पर्यंत कर्करोगाने होणार्‍या मृत्यूंमध्ये 60 टक्क्यांनी वाढ होईल. या मासिकाने असेही सांगितले होते की, कर्करोगामुळे वार्षिक 55 लाख महिलांना मृत्यूला सामोरे जावे लागते. तज्ञांनी घेतलेल्या शोधानुसार सद्यस्थितीत जगातील सात महिलांच्या मृत्यूमध्ये एक मृत्यू कर्करोगामुळे होतो. इतर संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की, 2030 पर्यंत गर्भाशयमुखाचा म्हणजेच सर्व्हायकल कर्करोगाने पीडित स्त्रियांच्या संख्येत 25 टक्के वाढ होऊ शकते. सद्यस्थितीत गर्भाशयमुखाचा कर्करोग जडलेल्या जगातील तब्बल 2 लाख 75 हजार महिलांचा मृत्यू होतो.

आकडेवारीकडे लक्ष दिल्यास गर्भाशयमुखाच्या कर्करोगाने मृत्यू होणार्‍या महिलांची 85 टक्के संख्या ही केवळ विकसनशील देशांमधील आहे. 2012 मध्ये कर्करोगांचे 1 कोटी 40 लाख रुग्ण समोर आले. यापैकी 82 लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी 1 कोटी 40 लाख रुग्णांमधील 60 टक्के लोक आफ्रिका, आशिया आणि दक्षिण अमेरिका या देशांचे निवासी होते. कर्करोगाने मृत्यू होणार्‍या लोकांपैकी 70 टक्क्यांहून अधिक लोक याच तीन खंडातील असतात.

चिंतेची बाब अशी की, कर्करोगाने पीडित महिला रुग्णांचे सर्वाधिक प्रमाणदेखील गरीब देशांमधीलच आहेे. आकडेवारीनुसार 2012 मध्ये महिलांच्या कर्करोगाच्या प्रकरणात 56 टक्के मृत्यू हे गरीब देशांमध्येच झाले होते. गरीब देशांमध्ये कर्करोगाने होणार्‍या मृत्यूपैकी दोन तृतीयांश मृत्यू स्तनाच्या कर्करोगाने आणि 10 पैकी 9 मृत्यू गर्भाशयमुखाच्या कर्करोगाने होतात.

संशोधकांच्या मते आर्थिक बदलांमुळे शारीरिक निष्क्रियता, असंतुलित आहार, स्थूलता, प्रजनन आरोग्य यामुळे गरीब देशांमध्ये कर्करोगाने पीडित महिलांच्या संख्येत वाढ होत आहे. नियमित शारीरिक हालचाल केल्यास शरीर संतुलित राहण्यास मदत होते आणि एक तृतीयांश कर्करोगाची प्रकरणे रोखता येतील. ‘इंडस हेल्थ प्लस’च्या अहवालानुसार, शहरांमध्ये वाढत्या स्थूलतेमुळे 10 ते 12 टक्के लोकसंख्येला पोटाच्या कर्करोगाची जोखीम आहे. 25 ते 30 वर्षे वयाच्या वर्गातील 17 टक्के लोकसंख्येला तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाच्या आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका अधिक प्रमाणात आहे.

वैद्यकीय तज्ञांच्या मते, कर्करोग हा तंबाखू किंवा त्यापासून तयार झालेल्या उत्पादनांच्या सेवनामुळे होणार्‍या कर्करोगाचे प्रमाण एकूण कर्करोग्यांमध्ये एक तृतीयांश इतके असते. एक तृतीयांश कर्करोग हा आहार-विहार, जीवनशैली किंवा अन्य
कारणांमुळे होतो. महिलांनी तंबाखू सेवन करणे टाळावे, कारण स्त्रियांचे शरीर तंबाखूप्रती अतिसंवेदनशील असते. तंबाखूच्या सेवनाने महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. याव्यतिरिक्त घर आणि बाहेर होणारे वायुप्रदूषणदेखील कर्करोगाचा धोका वाढण्याचे कारण आहे. भारतात वाढत्या वायुप्रदूषणामुळे 35 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांना विविध प्रकारच्या कर्करोगांचा धोका आहे. त्यामुळे वायुप्रदूषणही कर्करोगासाठी जबाबदार आहे.

जागतिक कर्करोग दिवसाचे संस्थापक युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल यांच्या दाव्यानुसार, विकसनशील देशांमध्ये पसरणारा हा रोग केवळ उपचारांच्या पर्यायांच्या कमतरतेचा नमुना आहे. युनियनच्या मते एचपीव्ही लस जर कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वितरीत केली तर गर्भाशयाचा कर्करोग संपवता येईल. विकसनशील देशांमध्ये ही लस मिळत नसल्याने कर्करोगामुळे मृत्यू होण्याची संख्या वाढते आहे. कर्करोगासारख्या भयानक विकारावर नियंत्रण मिळवायचे असेल तर सर्व जगाला मिळून प्रयत्न करावे लागतील.
– डॉ. संजय गायकवाड

LEAVE A REPLY

*