‘मुली पळवू’ आमदाराची जाहीर धमकी?

0
‘तुमचे कोणतेही काम असेल तर मला भेटा. तुम्हाला एखादी मुलगी आवडली असेल. तुम्ही तिला लग्नासाठी विचारले असेल. तिच्या आई-वडिलांना आणि तिलाही ते मान्य नसले तरी चालेल. तुम्ही माझ्याकडे या. मी तुमच्यासाठी त्या मुलीला पळवूनही आणेन.

माझा मोबाईल क्रमांक सांगतो. तो तुमच्याजवळ ठेवा व कधीही मला फोन करा’ अशी बेफाट मुक्ताफळे भाजपचे मुंबईतील प्रवक्ते राम कदम यांनी उधळली आहेत. कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित होते. ते गेल्यानंतर या रामाच्या सवंग बडबडीला बहर आला. नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी एल्गार परिषदेशी संबंधित पाच जणांना अटक केली आहे.

या अटकसत्राने अनेक वळणे घेतली. प्रकरण कमालीचे संवेदनशील आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि त्यात कागदपत्रे सादर केली. पोलिसांच्या या कृतीचा न्यायसंस्थेने कडक भाषेत समाचार घेतला. एल्गार परिषद प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली कशी? असा सवाल न्यायसंस्थेने केला आहे.

न्यायसंस्थेच्या कडक पवित्र्यामुळे खुलासा करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने नुकताच घेतला. आठवडाभरात घडलेल्या या घटनांचा म्हटले तर काहीच परस्परसंबंध नसावा. तरीही जनतेच्या मनात शंका निर्माण झाल्याशिवाय कशा राहतील? दहीहंडी कार्यक्रमाला हजारोंची गर्दी जमवून कदम यांना मुख्यमंत्र्यांना आपला दबदबा दाखवून द्यायचा असावा. तो दबदबा यापुढे कसा वापरला जाणार हे इतक्या उच्चरवाने जमावाला सांगण्याची गरज त्यांना का वाटली? कायद्यापेक्षा कदमांचा ‘राम’ श्रेष्ठ आहे हेच ते सिद्ध करू इच्छितात का?

नक्षलवादी चळवळीसारख्या संवेदनशील प्रकरणी पोलिसांनी माध्यमांशी थेट संवाद साधणे राजशिष्टाचाराला (प्रोटोकॉल) धरून आहे का? माध्यमांशी संवादाचा निर्णय घेण्यामागे पोलिसांना कुणाचे अभय असावे? पोलीस महासंचालकांना तीन महिनेच मुदतवाढ का दिली असावी? इतक्या कमी काळात त्यांनी कोणत्या कामांना प्राधान्यक्रम देणे अपेक्षित असेल? सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते काहीही बरळू शकतात.

पोलीस न्यायप्रविष्ट प्रकरणी परस्पर पत्रकार परिषद घेऊ शकतात. ही सर्व कसली चिन्हे मानावीत? महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात कायद्याला कस्पटाचे स्थान आहे हे भाजपचा प्रवक्ता इतक्या जाहीरपणे सांगू शकतो का? राज्याची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू असावी असे जनतेने समजावे? पण जनतेला सध्या विचारतो कोण?

LEAVE A REPLY

*