Type to search

मुलांशी बोलू काही..!

ब्लॉग

मुलांशी बोलू काही..!

Share

वयात येणार्‍या मुलांना काहीतरी वेगळे वाटत असते. कोणाशी बोलावे तेही कळत नसते. संकोच आणि सगळाच गोंधळ असतो. या अडनिड्या वयात काय गंमत असते ते आपण समजून घेणार आहोत या लेखमालेत..

सेक्स या विषयावर आपल्याकडे खूप मोठा टॅबू आहे, सेक्स ही चारचौघात न बोलण्याची गोष्ट आहे, खूप खासगी गोष्ट आहे, असे मानले जाते. सेक्स हा शब्द उच्चारणेसुद्धा निषिद्ध मानले जाते, तर त्यावर बोलणे तर दूरचीच गोष्ट.

वयात येतानाचे मधले वय म्हणजे धड मोठेही नाहीत आणि लहानही नाहीत. अर्धवट (अडनिड) म्हणावे असे व यालाच टीन एज, प्युर्बटी किंवा पौगंडावस्था असे म्हणतात. पौगंडावस्थेत प्रवेश करताना काहीतरी वेगळे होतेय, वेगळे वाटतेय, वेगळे घडतेय असे जाणवायला लागते. पण नक्की काय ते कळत नसते. अनेक शंका- कुशंका, चिंतांनी मन त्रस्त असते. कोणा सोबत मन मोकळे करावे कळत नसते.

वयात येणार्‍या मुलांशी लैंगिकता या विषयावर बोलणे खूप गरजेचे आहे. याविषयी शास्त्रीय माहिती वेळेवर न मिळण्याचे दुष्परिणाम एकतर या वयात किंवा पुढे आयुष्यभर पाठ पुरवतात. या वयात मित्रांकडून अर्धवट माहिती घेतली जाते किंवा उत्सुकतेपोटी पोर्न साईटस् बघितल्या जातात. यामुळे याविषयीची माहिती त्यांच्यापर्यंत खूप चुकीच्या पद्धतीने किंवा अर्धवट पोहोचते.

पालकच एखाद्या वेळेला मुलांना म्हणतात, ‘एवढे साधे कळत नाही तुला? मोठा झाला आहेस, ताडा-माडासारखा वाढला आहेस’ आणि एखाद्या वेळेस ‘अमूक अमूक गोष्ट सांगण्याइतका अजून तेवढा तू मोठा झाला नाहीयेस’. असे काहीसे गोंधळाचे वय, धड मोठाही नाही आणि लहानही नाही.

तर काय काय गंमत असते या वयाची ते आपण समजून घेणार आहोत या लेखमालेत. लैंगिक शिक्षण या शब्दाऐवजी लैंगिकता शिक्षण असाच शब्द वापरायला हवा. कारण हे फक्त शारीरिक क्रियांचे ज्ञान नाही तर त्याबरोबर प्रेम, नातेसंबंध, व्यक्तिमत्त्व, स्त्रियांचे समान स्थान आणि जबाबदार नागरिक म्हणून आवश्यक गोष्टी यात येतात म्हणून ते लैंगिकता शिक्षण. एरव्ही पालकांचे सगळे ऐकणारे, अभ्यासाला बस, आता बास झाला टीव्ही बघणे.. असं सांगितले की आज्ञाधारकपणे ऐकणारे मूल अचानक नाही म्हणायला लागते, ऐकेनासे होते. हा पालकांसाठी खूप मोठा धक्का असतो. कुठेतरी पालकांचा इगो दुखावला जातो आणि आपले शहाणे मूल बिघडले तर नाही ना? अशी शंका यायला लागते.

मग आपण त्यांना वाढवण्यात कुठे चुकलो तर नाही ना.. इथपासून ते त्याचे किंवा तिचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, त्यांच्यामुळे तर असे वागत नाहीये ना? काही वाईट संगतीच्या नादाला तर लागला नाही ना? व्यसनाच्या आधीन झाला नाही ना? अशा शंका-कुशंकांचे डोक्यात थैमान माजायला लागते आणि पालक बिथरून जातात. या सगळ्या गोष्टी पालकांसोबत होत असताना आपण एक गोष्ट लक्षातच घेत नाही की मुलांनाही स्वतःमधला हा बदल नवीन, अनपेक्षित आहे. त्यांनाही हे असे का होतय? आपल्याला काय होतेय? आपण असे का वागतोय आई-बाबांशी हे कळत नसते. याचा विचार आपल्याकडून केला जात नाही. पालक आणि मुलांमध्ये चांगला संवाद असेल तर हे समजून घेणे सोपे जाते. परंतु कधी कधी वाढत्या वयात भरपूर बडबड करणारी मुलगी किंवा मुलगा अबोल होतो, काहीच शेअर करेनासे होते त्यामुळे मुलांशी कसे वागावे हे पालकांनाही कळेनासे होते.

या सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये होणार्‍या हार्मोन्सच्या बदलामुळे घडत असतात. हे मानसिक आणि शारीरिक होणारे बदल मुलांना समजले तर त्यांना स्वतःला समजून घ्यायला मदत होईल.
मेघा मनोहर 8275584173

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!