मुख्यमंत्र्यांविरुध्द फिर्याद

0

शेतकरी आत्महत्या प्रकरण 9 रोजी सुनावणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना कर्जमाफी न देता आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असा आरोप करणारी खासगी फिर्याद नगरच्या न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत बाबूराव पाटील यांनी ही फिर्याद दाखल केली आहे. त्यावर सुनावणी 9 मे रोजी होणार आहे.

 
पाटील यांनी न्यायालयात दाखल केलेल्या खासगी फिर्यादीत म्हटले आहे की, विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, कर्जमाफी केल्याने शेतकरी आत्महत्या थांबतील याची हमी काय? त्यानंतर सरकार कर्जमाफी देणार नाही, हे उघड झाले. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात विष्णू बुरकुले या शेतकर्‍याने आत्महत्या केली. याशिवाय आणखी काही शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

 

त्यांच्या आत्महत्यांना मुख्यमंत्रीच जबाबदार असून त्यांच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पाटील यांनी फिर्यादीत केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. बनकर यांच्या न्यायालयात ही फिर्याद देण्यात आली आहे.
पाटील यांच्यावतीने पुण्यातील वकील अ‍ॅड. वाजेद खान (बिडकर) यांनी बाजू मांडली. आत्महत्यांचे प्रमाण मराठावाड्यात जास्त आहे. नगर हे मध्यवर्ती ठिकाण आहे, त्यामुळे येथे फिर्याद देत आहोत. तसेच लोकप्रतिनिधींविरूद्ध फिर्याद दाखल करण्यासाठी परवानगीची गरज नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. कोर्टाने फिर्याद दाखल करून घेत पुढील सुनावणी 9 मे रोजी ठेवण्याचा आदेश दिला.

 पाटील यांच्या खासगी फिर्यादीत राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा सगळ्यात गंभीर विषय आहे. मुख्यमंत्र्यांच्या त्या भाषणानंतर राज्यात 19 शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. मुख्यमंत्री हे लोकसेवक असल्याने त्यांनी भाषण करतांना जबाबदारीने भाषण करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणामुळे समाजात अराजकता निर्माण झाली आहे. इतर राजकीय व्यक्तींनी देखील या गोष्टीचे राजकीय भांडवल करून राजकीय लाभ मिळवला असल्याचे नमुद केले आहे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2014 मध्ये स्वत: आंदोलने करत शेतकर्‍यांची बाजू मांडली होती. मात्र, निवडून आल्यानंतर आपली भूमिका बदलत कर्जमाफी केल्यास आत्महत्या थांबेल का? असा गंभीर सवाल उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

*