Type to search

ब्लॉग

मुंबई नगरी बडी बाका…!

Share

जोरदार पावसाने पाणी साचून मुंबई जलमय होणे ही मुंबईकरांसाठी नवी घटना नाही. वर्षानुवर्षे मुंबईकर त्याचा अनुभव घेत आहेत. दरवर्षी नालेसफाईवर मुंबई मनपाचे कोट्यवधी रुपये खर्च होतात. तरीही दरवेळी मुंबई पाण्याखाली का जाते? सात बेटांची मिळून बनलेल्या मुंबईचे नैसर्गिक नाले कोणी बंद केले? त्याबद्दल मनपा प्रशासन आणि राज्य सरकार अवाक्षरही काढायला तयार नाही. भ्रष्टाचार, गैरप्रकार, नियमांचे उल्लंघन आणि मनमानीमुळे मुंबई दिवसेंदिवस बकाल होत आहे. मुंबईची स्वच्छता कागदावरच राहिली आहे. मात्र पावसाळ्यात पाणी तुंबल्यावर दोष पावसालाच देण्याचा सोपा मार्ग सत्ताधारी अवलंबत आहेत.

‘ए दिल है मुश्कील जीना यहाँ, जरा हसके, जरा बचके यह मुंबई हे मेरी जान’ किंवा ‘मुंबई, कभी थकती नही, रूकती नही’ असे जगभरात ज्या मुंबईचे वर्णन लोक करतात ती मुंबई मागील सप्ताहात दोन दिवस आधी तुंबली, मग थांबली आणि त्यानंतरही तिच्या हालांना कोणीच वाली नाही का? असे विचारण्याची आज वेळ आली आहे. कारण मुंबई पालिकेत सत्तेवर असलेले शिलेदार आणि त्यांचे ‘पहारेकरी’ सध्या ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ म्हणत एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत.

गेल्या पंधरा-वीस वर्षांत मुंबईच्या बकालपणात सातत्याने भर पडत आहे. ताजमहालापेक्षा धारावीच्या झोपडपट्टी पर्यटनाला जगात सर्वाधिक पसंती मिळाल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. मात्र राज्यकर्त्यांना त्याचे काहीच वाटेनासे झाले आहे. मुंबई पालिकेत सध्या आयुक्त असलेल्या मुख्यमंत्र्याच्या मर्जीतील प्रवीण परदेशी यांच्या म्हणण्याची ‘री’ ओढत मुख्यमंत्री म्हणाले, ‘अहो, काय करणार? चार तासात 400 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडला. पाणी वाहून कसे जाणार?’ केवळ नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च करणार्‍या पालिकेत नालेसफाईचे गेल्या पाच ते दहा वर्षांतील खर्चाचे लेखापरीक्षण ‘कॅग’सारख्या संस्थेकडून करून घेतले तरी आपण ‘पहारेकरी’ म्हणून चांगले काम केले, असे संबंधितांना म्हणता येईल. ‘नालेसफाई नव्हे हातकी सफाई’ असे म्हणण्याची वेळ याबाबतीत आली आहे.

26 जुलै 2005 रोजी मुंबईत अतिवृष्टी झाली होती. त्या दिवशी 950 मि.ली. पाऊस कोसळला. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख यांना माध्यमांनी सळो की पळो करून सोडले होते. एकदा तर अनौपचारीक चर्चामध्ये विलासराव मिश्किलपणे म्हणाले होते की, त्यावेळी मला मी मुख्यमंत्री आहे की महापालिकेचा आयुक्त असा प्रश्न पडला होता. यावेळी मात्र ना आयुक्तांना कुणी जाब विचारला, ना मुख्यमंत्र्याना, ना ‘भरून दाखवलें’ना! नालेसफाईच्या कंत्राटाचा मलिदा दरवर्षी कसा हडपला जातो याचे अनेकदा माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदा घेऊन वास्तव मांडले होते. त्यामुळेच तर ‘मातोश्री’ने नाराज होत त्यांना यावेळी निवडून आणण्यास मज्जाव केला! असो.

200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळला की मुंबई तुंबतेच असे प्रशासनाचे म्हणणे आहे. पण मुंबईत रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि ब्रीमस्टोवँड या प्रकल्पांचे काय झाले? याची चौकशी चौकीदार नगरविकास खाते का करत नाही? इंग्रजांच्या काळातील पावसाचे पाणी वाहून नेणारी यंत्रणा आता कुचकामी झाली आहे, जागोजागी भुयारी मेट्रोसाठी किंवा एलिवेटेड मेट्रोसाठी मुंबई खोदून ठेवली आहे.

मोकळ्या जागा भूमाफियांच्या आणि विकासकांच्या घशात घालण्यात आल्या आहेत त्यामुळे नैसर्गिक पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. भरतीच्या वेळी मुंबईत पाणी तुंबते पण आता ते उपनगरी भागातही का तुंबले आहे? कारण नालेसफाईत हात की सफाई झाली आहे, रेल्वेमार्गातील घाण तशीच पडून आहे. ती स्वच्छ करण्याची जबाबदारी पालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा महानगर प्राधिकरण कुणाचीच नाही. स्वच्छ भारत सांगत फिरणार्‍या सत्ताधारी पक्षाच्या मुंबईतील गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नवनेत्यांना याच्याशी काहीच देणेघेणे नाही. ज्या दिवशी मुंबईची दाणादाण उडाली त्या दिवशी विधानसभेचे अधिवेशन सुरू होते. 14 वर्षांनंतर पुन्हा 2 जुलै 2019 रोजी 26 जुलै 2005 ची पुनारावृत्ती मुंबईत झाली. मुंबईमध्ये त्या दिवशी 400 तर दिंडोशीला 450 मिलीमीटर पाऊस पडला. मुंबईची ‘तुंबई’ झाली आणि तुंबली म्हणून थांबली आमची मुंबई, असे म्हणण्याची वेळ आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वांद्य्रातील ‘मातोश्री’, जहू येथील बिग बींचे ‘जलसा’ ही अतिमहत्त्वाच्या मंडळींची निवासस्थाने पाण्याने वेढली होती. मुंबईतील डझनभर पोलीस ठाण्यांत, शेकडो हाऊसिंग सोसायट्यांत पाण्याने वेढा घातला किंवा घुसले होते.

मुंबई उपनगरी गाड्यातून 85 लाख प्रवासी प्रवास करतात. त्या दिवशी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील सेवा अतिवृष्टीमुळे ठप्प झाल्या, तर बेस्टची बससेवाही थंडावली. अतिवृष्टी मुंबईत झाली, लोकल विस्कळीत झाली तरी कामावर पोहोचायचे हा मुंबईकर यांचा खाक्या असल्यामुळे त्या दिवशी लक्षावधी मुंबईकर संकटात सापडले. मुंबईच्या आर्थिक राजधानीला निश्चितच हे शोभादायक ठरणारे नव्हते.

25 वर्षांहून अधिक काळ मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. सत्ताधारी, प्रशासन, भाई-दादा आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्ट व अभद्र युतीमुळेच मुंबईच्या टेकड्या-डोंगरांचा, नाले-मैदानांचा आणि नैसर्गिक व्यवस्थांचा बळी विकासकांनी घेतला आहे. काँक्रिटच्या जंगलात चटई क्षेत्रफळांचे पीक घेतले जात आहे. त्याचे कोट्यवधीचे हिशेब करून तुंबड्या भरण्याचे काम सुरू आहे. अनधिकृत फेरीवाल्यांनी मुंबईतील पथपद ताब्यात घेतले आहेत. युती सरकारच्या काळात झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू झाली. बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेत दहा वर्षांत मुंबईला झोपडपट्टीमुक्त करायचे होते. पण तरी बेकायदा झोपडपट्ट्यांची संख्या सतत फुगतच आहे. झोपडीदादांच्या कृपेने नियम धाब्यावर बसवून सर्वत्र बांधकामे सुरूच आहेत. नाले वळवले जात आहेत किंवा त्यावर सर्रास बांधकामे करायची आणि सत्ताधार्‍यांनी नंतर ती जनतेच्या भल्यासाठी नियमित करून कोट्यवधींचा मलिदा घ्यायचा असा मुंबई गहाण टाकण्याचा उद्योग गेल्या अनेक वर्षांत झाला आहे. पाणी वाहून जाण्याचे सर्व मार्गच बंद होत असल्यामुळे पाणी तुंबण्याच्या जागा सतत वाढत आहेत. परिणामी जोरदार पाऊस तथा अतिवृष्टी नाही झाली तरी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नालासोपारा, वसई, विरार अशा सर्व भागातील निवासी इमारतींभोवती, उपनगरी रेल्वे स्टेशनांच्या परिसरात आणि बाजारांत पावसाच्या पाण्याचे तलाव वर्षोनवर्षे दिसून येतात. मग पावसाचे प्रमाण जास्त होते म्हणून वेळ मारून न्यायची हा भयानक उद्योग सुरू आहे.

हे वास्तव असताना भ्रष्टाचार आणि गैरकारभार झाकण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनातील अधिकारी निसर्गाला दोष देताना दिसतात. अनधिकृत बांधकामांमुळे मुंबई तुंबते अशी कारणे पुढे करून आपली जबाबदारी झटकताना आढळतात. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची हीच खरी दुर्दैवी शोकांतिका ठरली आहे. भ्रष्टाचार आणि गैरकारभार झाकण्यासाठी ही भ्रष्ट मंडळी निसर्गाला दोष देत राहणार आणि सामान्य मुंबैकर हे कसे आणि का सहन करत राहणार आहे, हाच खरा प्रश्न आहे. ‘मुंबै नगरी बडी बाका जशी रावणाची दुसरी लंका’ असे शाहीर पठ्ठे बापूराव का म्हणाले असतील याची कल्पना यावरून यावी! जनाची नाही तर मनाची ठेवा असे या भ्रष्ट कडबोळ्यांना सांगणारा मुंबईला कुणी वाली राहिला आहे
की नाही?
– किशोर आपटे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!