मुंबईला वीजपुरवठा करणारा ‘उदंचन’ प्रकल्पच अंधारात

0
भंडारदरा (वार्ताहर)- घाटघर जलविद्युत उदंचन प्रकल्पाच्या अनागोंदी कारभाराने या प्रकल्पाला गेल्या सहा महिन्यांपासून अजूनही अंधारात दिवस काढावे लागत आहेत. ज्या उदंचन प्रकल्पातून अर्ध्या मुंबईला वीजपुरवठा केला जातो, तोच प्रकल्प जर अंधारात दिवस काढत असेल तर यासारखी दुर्देवी बाब दुसरी असूच शकत नाही.
भंडारदर्‍यापासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावर ठाणे-अहमदनगर या सरहद्दीवर आशिया खंडातील दोन नंबरचे विद्युतगृह उभारण्यात आले आहे. या विद्युत गृहातून महाराष्ट्राच्या राजधानीला वीजपुरवठा केला जातो. पंरतु या डॅमलाच वीजपुरवठा नसल्यामुळे अंधारात राहण्याची वेळ आली आहे. डॅमच्या संरक्षणासाठी ज्या कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे त्यांना आपले कर्त्तव्य बजावण्यास अनंत अडचणी येत आहेत.
पाण्याची आकडेवारी अधिकार्‍यांना कळविणे आवश्यक असते. त्यातच पावसाळा तोंडावर आल्याने प्रत्येक तासाला पाणी किती वेगाने वाढते आहे हे कळविणे अतिशय गरजेचे आहे. मग विजेचाच पत्ता नसेल तर ती आकडेवारी अंदाजेच देणार का? याशिवाय पावसाळ्यात या धरणावर दाट धुके पसरलेले असते. सापासारख्या सरपटणार्‍या जिवांचा धोका असतो.
एखाद्या कर्मचार्‍याच्या बाबतीत काही अघटीत घटना घडली तर याला जबाबदार कोण? डॅमवर ड्युटीसाठी असणार्‍या कर्मचार्‍यांना राहण्यासाठी सुविधा नाहीत. या धरणावर शासनाने अनेक सौरदिवे हे बसविलेले आहेत. पण वीजच नसल्यामुळे सौरदिव्यांच्या बॅटरी व पॅनल कधी गायब झाले हे सुद्धा कळलेले नाही. डॅमच्या सर्व भिंती शेवाळलेल्या आहेत. अनेक मशिनरींना या धरणाच्या अधिकार्‍यांनी कलरच दाखविलेला नाही.
या धरणाचे शाखा कार्यालय हे भंडारदरा येथे कॉलनीत आहे. या कार्यालयाची अवस्था अतिशय वाईट आहे. वॉकी टॉकी सारखी मशिनरी येथेही धूळखात पडली आहे.

घाटघर जलविद्युत उदंचन प्रकल्पाचा चार्ज हा एका टेक्निकल असिस्टंटकडे सोपविण्यात आलेला आहे. हे असिस्टंट साहेब फोनवर सगळ्या हालचाली सांभाळून घेतात. ज्या ठिकाणी आपली ड्युटी आहे तेथे या अधिकार्‍यांनी राहणे गरजेचे असतानाही केवळ आपल्या सोयीसाठी यांनी तालुक्याला निवासस्थान केलेले आहे . डॅमवर अंधाराच्या साम्राज्यात जे काही मोलामहागाचे सौर दिवे गायब झाले आहेत, त्यांची भरपाई आता शासनाने या असिस्टंट साहेबांच्या पगारातूनच वसुल करायला हवी. या विजेच्या प्रश्नासंदर्भात अनेकदा पेपरबाजी होऊनही अधिकार्‍यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. अधिकारी वर्गाकडे विजेसंदर्भात चौकशी केली तर आमचे भंडारदरा येथील कार्यालय बंद होणार असून तो दुसर्‍या कार्यालयाला जोडणार आहे अशा पद्धतीचे उत्तर देऊन पत्रकारांंच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.

LEAVE A REPLY

*