मुंबईत आज मराठा महामोर्चा

0

मुंबई । दि. 8 वृत्तसंस्था-‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणा देत उद्या बुधवारी मुंबईत मराठा मोर्चा धडकणार आहे. मोर्चात होणारी गर्दी व उद्भवणारी वाहतुकीची समस्या लक्षात घेता खबरदारी म्हणून उद्या दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. या मोर्चात मुंबईचे डबेवालेही सहभागी होणार असून उद्या सेवा बंद राहील, अशी माहितीही देण्यात आली.

मुंबईतील भायखळा येथील जिजामाता उद्यानापासून सकाळी 11 वाजता मराठा मोर्चाला सुरुवात होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानात मोर्चाची सांगता होणार आहे.

या मोर्चात अंदाजे 5 लाख लोक सहभागी होतील, मुंबईतील मोर्चात सर्वाधिक गर्दी उसळेल, असा दावा आयोजकांनी केला आहे.

मोर्चादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मोर्चावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीने मुंबई पोलिसांची करडी नजर असणार आहे. सुरक्षेसाठी 7 हजार पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत. मोर्चात अहमदनगर, औरंगाबाद, मराठवाडा, विदर्भातून मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील. भायखळा येथील जिजामाता उद्यानापासून सुरू झालेल्या मोर्चाची आझाद मैदानावर सांगता होईल.

मुंबई महापालिकेनेही मोर्चेकर्‍यांंसाठी मोफत आरोग्य सुविधा तसेच पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली आहे. सात ठिकाणी फिरती स्वच्छतागृहे, आठ ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर, सहा ठिकाणी डॉक्टरांचे पथक आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातून एक लाख समाज बांधव रवाना


कोपर्डीतील लेकीवर अत्याचारानंतर न्याय मिळण्यास होत असलेली दिरंगाई, मराठा समाज आरक्षण, शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव मिळावा आदी प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे उद्या दि.9 रोजी मुंबईत महामोर्चा होणार आहे. या महामोर्चाला जिल्ह्यातील जवळपास 1 लाख समाजबांधव रवाना झाल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.
मुंबई येथे उद्या दि.9 रोजी सकाळी 11 वाजता मुंबईतील जिजामाता उद्यान, भायखेळा येथून सुरुवात होऊन आझाद मैदानावर समारोप होईल. महामोर्चाच्या अनुषंगाने जिल्ह्याभरातील समाजबांधव रेल्वे, बस, खाजगी वाहनाने रवाना झाले आहेत. रेल्वे स्थानकावर सकाळपासून रात्री उशीरापर्यंत गर्दी दिसून आली. जिल्ह्यातून जवळपास 90 हजार समाजबांधव मुंबईत पोहचले असून काही समाजबांधव खाजगी वाहनाने रवाना झाले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. मुंबईतील महामोर्चासाठी राज्यासह इतर राज्यातूनही जवळपास दीड कोटी समाजबांधव सहभागी होणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली.

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

*