मुंबईकडे जाणारा शेतीमाल, दूध रोखले!

0

नगर-कल्याण महामार्गावर आंदोलन सुरुच; सरकारचा निषेध

 

पारनेर (प्रतिनिधी) – शेतकरी संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दर्शवित सरकारशी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेणार असून विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

 
टाकळी ढोकेश्‍वर – शिवप्रहार, भूमीपूत्र शेतकरी व मराठा महासंघासह मराठा क्रांती मोर्चा व शेतकर्‍यांनी नगर-कल्याण महामार्गावर मुंबई, पुणे, ठाणेकडे जाणार्‍या भाजीपाला व दूध अडविला. दुसर्‍या दिवशीही नगर-कल्याण महामार्गावर पहारा देत मुंबईकडे जाणारी भाजीपाला व शेती उत्पादनांची रसद तोडण्यात शेतकर्‍यांना यश आले आहे.

 

 

टाकळी ढोकेश्वर वासुंदे चौकात दूध ओतून फडणवीस सरकारचा जाहीर निषेध केला. यावेळी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर व भूमिपुत्र संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, अनिल देठे, मराठा महासंघाचे किरण तराळ, प्रवीण भोर, पांडुरंग गागरे, संजय खिलारी, विकास आल्हाट, अमोल आल्हाट, अल्ताफ शेख, अमोल झावरे, पप्पू जगधने, प्रसाद खिलारी, अलंकार कडनर, गणेश चव्हाण, प्रशांत तराळ, प्रवीण निवडुंगे, जालिंदर वाबळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खडकवाडी व पळशी येथील गावात आठवडे बाजार बंद ठेउन दोन हजार लिटर दूध ओतून देऊन संकलन बंद करण्यात आले आहे.

 
पाडळी रांजणगाव (वार्ताहर) – तालुक्यात सुमारे 4 लाख लिटर दूध संकलन ठप्प झाले आहे. यातून कोट्यवधी रुपयांचा तोटा शेतकरी सहन करत आहेत. शेतकर्‍यांचा हा संप असाच सुरू राहिल्यास शहरातील नागरिकांचा दूध आणि भाजीपाल्याच्या प्रश्‍न गंभीर बनणार आहे. शेतकर्‍यांच्या संपाला पाठिंबा देऊन दूध संकलन केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे गणेश डेअरी फार्मचे विठ्ठलराव साठे यांनी सांगितले. सध्या दररोज 100 लिटर दुधाचे नुकसान सहन करायची वेळ या शासनाने आमच्यावर आणली आहे, अशी प्रतिक्रीया दूध उत्पादक शेतकरी गोवर्धन खेसे यांनी व्यक्त केली.

 
निघोज (वार्ताहर) – पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या पाठिंब्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. परिसरात आंदोलनकर्त्यांच्या आक्रमकतेने पहिल्या दिवशी हजारो लिटर दुधाचे टँकर रस्त्यावर ओतून देण्यात आले. निघोजमधील छोटे-छोटे दूध संकलन केंद्रांमार्फत कन्हैया दूध उद्योग समूह व पराग दूध उद्योग समूह यांना दूध पाठवितात. परंतु आंदोलनकर्त्यांच्या आक्रमकतेने सर्व दूध संकलन केंद्र बंद ठेवण्यात आले. आठ दिवसांपूर्वी रामदास घावटे व अवैध धंद्यावाल्यांची वादावादी झाली होती. शेकडो आंदोलनकर्त्यांमधून फक्त घावटे यांच्यावरच दुधाचा टँकर ओतण्याचा गुन्हा का दाखल केला? याविषयी भुमिपूत्र संघटना व शिवबा संघटनेसह आंदोलनकर्ते पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचे समजते. शेतकरी रामदास भुकन यांनी 300 लिटर दुधाने मुलाचा अभिषेक घालून सरकारचा जाहीर निषेध केला.

यावेळी राजू लंके, सुधीर भुकन, निलेश भुकन, दिलीप राठोड, नवनाथ भुकन, सुभाष भुकन, राहूल शेटे, सुभाष शेटे, एकनाथ भुकन आदी शेतकरी उपस्थित होते.

 
जामगाव – पारनेर तालुक्यातील जामगाव येथे पंचायत समिती सदस्या सुनंदाताई धुरपते, उद्योजक सुरेश धुरपते, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणिस बाळासाहेब माळी व कार्यकर्ते यांच्या आवाहनानुसार शेतकरी संपात सर्व शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मुकुंदा शिंदे व कार्यकर्त्यांनी सारोळा येथील दूध संकलन केंद्र बंद पाडले.

 
जवळा (वार्ताहर) – तालुक्यातील बागायती पट्ट्यातील जवळा येथे शुक्रवारी आठवडे बाजार ग्रामस्थांनी एकजुटीने बंद ठेवला.

 
सुपा – सुप्याचे सरपंच विजय पवार, पारनेर पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, वाळवणेचे सरपंच उत्तम पठारे, अपधूपचे माजी सरपंच जयसिंग गवळी, ओबीसी सेलचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी संतप्त होत सरकारचा निषेध केला. दुसर्‍या दिवशीही पळवे परिसरातील शेतकरी मारूती तरटे, दादा पाचार्णे, बाळासाहेब मगर, सुदाम मगर, तारांचंद जाधव, पोपट शेलार, पोपट पाचार्णे, सुधीनाथ देशमुख, तात्यासाहेब देशमुख यांनी शुक्रवार दि.2 रोजी म्हसणे फाटा येथे पळवे येथील शेतकर्‍यांनी रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध केला.

 

यावेळी रस्त्यावर दुधाचा महापूर आला होता. सुपा, वाळवणे, पिंप्रीगवळी, रांजणगाव मशिदी, रायतळे, अस्तगाव, रुईछत्रपती, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा, कडूस, आपधूप, पळवे, जातेगाव, घाणेगाव, म्हसणे, मुंगशी, हंगा येथे संपाचा निर्धार कायम असून वेगवेगळे पध्दतीने आंदोलन सुरू आहे.

 

 
गारखिंडी – येथील शेतकर्‍यांनी रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध केला. यावेळी विनायक झिंजाड, निवृत्ती चौधरी, बाजीराव शिंदे, संपत निमसाखरे, मनोहर झिंजाड, संतोष झिंजाड, संतोष झिंजाड, उध्दव चौधरी, सोमनाथ झिंजाड, गोरख झिंजाड, लक्ष्मण उजघरे, बाळासाहेब झिंजाड, भगवंता झिंजाड, अमित चौधरी, दौलत चौधरी, गोपाळा झिंजाड, महादू चौधरी आदी शेतकर्‍यांनी सुमारे हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला.

 

ही तर सरकार व प्रशासनाची दडपशाही : संजीव भोर

 

पारनेर (प्रतिनिधी) – शेतकरी संपात सामील होऊन नगर-कल्याण महामार्गावर शेतमाल व दुधाचे टँकर अडविले. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी (दि.2) जून रोजी सकाळी 11.30 वाजता शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांना अहमदनगर येथील राहत्या घरातून अटक केली. पारनेर न्यायालयात हजर केले असता भोर यांनी मंजूर केलेला जामीन नाकारला.

 
सध्या भोर यांची पारनेर पोलीस स्टेशनला रवानगी करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या क्षणापासून पोलीस कोठडीत शेतकरी संप सुरू असेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असून वैद्यकिय उपचार व जामीनही घेणार नसल्याचे सांगत जिवीताची जबाबदारी ही पूर्णत: पोलीस व सरकारची असेल.

 

शेतकर्‍यांचा लढा यशस्वी करायचाच, असे आवाहनही भोर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

 

 

पाथर्डीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण

 

जवखेडे फाटा येथे एसटी बसच्या काचा फोडल्या; 30 जणांवर गुन्हा दाखल

 

पाथर्डी (प्रतिनिधी) – राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी करावी तसेच शेतकर्‍यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी चालू असलेल्या शेतकर्‍यांच्या संपाला आज हिंसक वळण लागले. तालुक्यातील जवखेडे खालसा फाटा येथे राज्य परिवहन महामंडळाची एसटी बसच्या काचा फोडून सरकारचा निषेध करण्यात आला. यासंदर्भात बसचालकाच्या फिर्यादीवरून जवखेडे येथील अमोल वाघ यांच्यासह 25 ते 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शहरातील नाईक चौकात माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे यांच्या नेतृत्वाखाली कांदा फेकून आंदोलन करण्यात आले.

 
भाजप सरकारच्या विरोधात दुसर्‍या दिवशी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. तालुक्यातील जवखेडे खालसा फाटा येथे अमोल वाघ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध करत शासनाचा पुतळा जाळला. यावेळी राज्य सरकार विरोधात आंदोलनकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी पाथर्डी-सोनई (बस क्रं. एमएच-12, ईएफ-6881) ही बस आंदोलनस्थळी आली असता आंदोलकांनी बसमधील प्रवाशांना खाली उतरवून बसच्या काचा फोडत सरकारचा विरोधात निषेध व्यक्त केला.

 
याप्रकरणी बसचालक ज्ञानदेव मोहन इजारे यांच्या फिर्यादीवरून अमोल वाघ, शरद गवळी, सुनील गर्कळ, संजय जाधव, पंडित वाघ, भास्कर नेहुल, अमोल सोपान वाघ, सतीश मतकर यांच्यासह अज्ञात 25 ते 30 जणांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजकीय दबावातून हा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप अमोल वाघ यांनी केला आहे.

 
शहरातील नाईक चौकात माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे यांच्या नेतृत्वाखाली कांदा फेकून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. सतीश पालवे, किसन आव्हाड, भगवान आव्हाड, विजय पालवे, रा. प. शिरसाठ, संदीप राजळे, सतीश मतकर, पांडुरंग मरकड, शशिकांत बोरुडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शेतकर्‍यांची कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव मिळावा तसेच इतर मागण्या सरकारने मान्य कराव्यात अशा मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या.

 

आज मनसेच्यावतीने तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

*