Type to search

अग्रलेख संपादकीय

मी मारल्यासारखे करतो, तू रड…!

Share
केंद्रसत्ताधारी भाजपत वाचाळवीरांचे सध्या पेव फुटले आहे. ‘ट्रोल’सारखीच दुसरी मोठी फौज दिमतीला आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंहला सध्या भलतेच तोंड सुटले आहे. आठ वर्षे जेलमध्ये गेल्याचा तो परिणाम असेल का? लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साध्वीला भाजपत दाखल करून घेण्यात आले. लगोलग भोपाळमधून उमेदवारीही दिली गेली. त्यानंतर तिच्या वाचाळपणाला महापूरच आला आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी ती अद्वातद्वा बोलली. परिणामी प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या. भाजप नेत्यांनी नेहमीप्रमाणे कातडीबचाव धोरण स्वीकारले. ‘साध्वीचे ते व्यक्तिगत मत आहे’ असे सांगून तोंड लपवले. नाईलाजाने साध्वीनेही बरेच आढेवेढे घेत माफी मागितली.

निवडणूक आयोगाने तिच्यावर तीन दिवसांची प्रचारबंदी लादली. बंदीनंतर तिने मंदिरात भजन-कीर्तनाचे नाटक केले. वातावरण निवळल्याचे वाटून भाजपेयी नेते सुटकेचा नि:श्वास सोडणार तर साध्वीला पुन्हा बरळण्याची उबळ आली. ‘राष्ट्रपित्याचा मारेकरी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता’ असे वक्तव्य अभिनेता कमल हसनने केल्यावर साध्वीने नथुरामला ‘देशभक्ती’चेे प्रमाणपत्र देऊन अकलेचे दिवे पाजळले. गांधीजींच्या मारेकर्‍याचा गौरव करणार्‍या साध्वीविरोधात पुन्हा जनक्षोभ उसळला आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीआधीच साध्वीच्या बरळण्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले. भाजपने साध्वीला ‘कडक शब्दां’त समज देऊन तत्काळ माफी मागायचा आदेश दिला.

‘पक्षाचे जे विचार तेच माझे’ अशा निरर्थक शब्दांत साध्वीने आपले खरे दहशतवादी मत लपवले. साध्वीच्या उमेदवारीचे समर्थन करणार्‍या पंतप्रधानांनी आता मात्र ‘साध्वीला कधीच माफ करणार नाही’ अशी गर्जना केली आहे. हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाच्या पक्षाच्या धोरणानुसार साध्वीला भाजपने सामावून घेतले या ‘हातच्या काकणाला आरसा कशाला’? त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते असोत वा पंतप्रधानांचे बोलणे; ‘मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर’ इतके भारतीय समाजाला निष्कपट वाटेल का? धार्मिक विभाजनाचा यज्ञ सतत धगधगता ठेवण्याच्या हेतूनेच साध्वीच्या वाचाळपणाला मोकळे रान दिले असावे, अशीही शेरेबाजी ऐकू येते. भोपाळचे मतदार कोणता निर्णय घेतात ते 23 तारखेला समजेलच. अर्थात जनता हुशार आहे. नेत्यांची नाटके ती जाणून आहे; पण यदाकदाचित साध्वी प्रज्ञा खासदार बनली तर पाच वर्षे भाजपेयी नेत्यांच्या डोक्यावर मिरे वाटल्याशिवाय राहील का? त्यावेळी भावी पंतप्रधान काय करतील याचीही जनतेला आतूरता असेल का?

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!